बॉर्डर सिक्युअरिटी फोर्सची स्थापना १ डिसेंबर १९६५ रोजी झाली.
सीमा सुरक्षा दल हे सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवून सीमेचे शांतता काळात संरक्षण करण्यासाठी नेमलेले सैन्यदल. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे संरक्षण हे सैन्यदलाचे प्राथमिक कर्तव्य असले, तरी सदासर्वकाळ-विशेषतः शांतताकाळातही-सैन्य तैनात करणे, हे एकूण सैन्याच्या युद्धक्षमतेला हानीकारक आहे. काही अशांत व जागृत सीमांवर सैन्यदलांच्या तुकड्यांची उपस्थिती अपरिहार्य असली, तरी बाकीच्या सीमांवर सैनिकीसम दलाची ( पॅरामिलिटरी फोर्स ) योजना करणे, हे सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने इष्ट ठरते. या सैनिकीसम दलाचे किंवा पोलीस दलाचे प्रमुख काम हे सीमोल्लंघन आणि तस्करीविरोधी स्वरूपाचे असते. किंबहुना हे काम सैन्यदलांच्या कक्षेबाहेरील आहे. यासाठी १९४७ ते १९६५ दरम्यान भारताच्या धोकाविरहित सीमापट्ट्यांवर संबंधित राज्यांच्या जबाबदारीखाली राज्य सशस्त्र पोलिसांच्या (स्टेट आर्म्डा पोलीस) तुकड्या तैनात केल्या जात असत. जम्मू व काश्मीरमधील काही भाग वगळता बाकी सर्व सीमापट्टा या पोलीस दलाच्या अधिक्षेत्राखाली होता. पाकिस्तानने कच्छ विभागातील सरदार पोस्ट, छाड बेट आणि बेरिया बेट या गुजरात राज्यातील सशस्त्र पोलिसांच्या चौक्यांवर ९ एप्रिल १९६५ रोजी अचानक हल्ले चढवल्यानंतर मात्र हे सर्व बदलावे लागले. राज्य सशस्त्र पोलीस दल शत्रूच्या सैन्याकडून होणाऱ्या पद्घतशीर हल्ल्याचा प्रतिकार करण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी लागणारे युद्धसाहित्य, प्रशिक्षण आणि सैनिकी सामर्थ्य स्वाभाविकच सशस्त्र पोलिसांकडे नव्हते. त्यामुळे शत्रूच्या हल्ल्यानंतर माघार घेण्याशिवाय त्यांच्यापुढे अन्य कोणताच पर्याय उरला नव्हता.
या बाबतीत सर्व दृष्टींनी विचारविमर्ष झाल्यावर पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर एका विशेष, केंद्रनियंत्रित आणि शत्रूच्या हल्ल्याचा समर्थपणे प्रतिकार करु शकणाऱ्या पोलीस दलाची आवश्यकता असल्याची खात्री केंद्र शासनाला पटली आणि सीमा सुरक्षा दल या विशेष पोलीस दलाची रचना करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार १ डिसेंबर १९६५ रोजी भारतीय सीमा सुरक्षा दलाची स्थापना झाली. भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी के. एफ्. रुस्तमजी यांची पहिले दलप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत या दलाचे कार्य चालते.
भारताच्या सीमांची सुरक्षितता आणि त्याच्याशी निगडित असलेले विषय ही सीमा सुरक्षा दलाची प्राथमिक भूमिका होय. सीमा सुरक्षा दलाचे काम शांतताकाळ आणि युद्धकाळ या दोन्हींत सातत्याने चालू असणे आवश्यक असल्याने या दोन वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांच्या कामांची जंत्री अशी :
शांतताकाळात : सीमा प्रदेशात राहणाऱ्या जनतेत सुरक्षिततेच्या भावनेची जोपासना करणे; सीमापार गुन्हे आणि अवैध प्रवेश-निर्गमनावर प्रतिबंध लादणे आणि चोरीची आयात-निर्यात आणि इतर अवैध कारवायांवर नियंत्रण ठेवणे.
युद्धकाळात : दुय्यम धोक्याच्या क्षेत्रांमध्ये शत्रूच्या हल्ल्याविरुद्घ संरक्षणफळी उभी करून महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे. तसेच विस्थापितांचे नियंत्रण-पुनर्वसन करून निर्देशित क्षेत्रात घुसखोरीविरुद्घ कारवाई करणे.
सीमा सुरक्षा दलाच्या स्थापनेपासून आजतागायत हे दल राष्ट्रसेवेसाठी झटत आहे. भारत-पाक यांच्यामधील १९७१ चे बांगला देश युद्ध आणि १९९९ चे कारगिल युद्ध या दोन्हींमधील त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून सीमासंरक्षण करणाऱ्या या दलाचे कार्य सुकर आणि परिणामकारक होण्यासाठी भारतपाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा आणि जम्मू व काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर लोखंडाचे अभेद्य कुंपण बांधून रात्री दोन्ही बाजूंचे क्षेत्र स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे घुसखोरांचे प्रमाण कमी होऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या कामास मदत मिळाली आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्षेत्रास वेगवेगळे नवे पैलू प्राप्त झाले आहेत. या दलाच्या तुकड्या संयुक्त राष्ट्रांमार्फत शांतता प्रस्थापनेसाठी कोसोव्हो आणि बोस्नियामध्ये पाठवल्या गेल्या. केवळ पाकिस्तान सीमेपर्यंतच मर्यादित न राहता सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्या उपद्रववादी विरोधी कार्यवाहीसाठी मणिपूर राज्यातही तैनात आहेत. गुजरातमधील जानेवारी २००१ मधील भूकंप आणि इतर जातीय दंगलींदरम्यान सीमा सुरक्षा दलाने लक्षणीय कामगिरी बजावली आहे. या दलाच्या उपलब्धींचा धावता आढावा घ्यायचा म्हटल्यास १९९० ते २००८ या एकोणीस वर्षांच्या कार्यकाळात दलाने ४,८११ दहशतवादी ठार केले, ११,७८७ घुसखोर पकडले, १५,७५६ शस्त्रे जप्त केली, १,९२३ कोटी रुपये मूल्यांची चोरटी आयात-निर्यात पकडली आणि १३,६५४ किग्रॅ. स्फोटके जप्त केली. या कालखंडात सुरक्षा दलांच्या १,३७३ जवानांनी प्राणाहुती दिली, तर ५,६६५ जवान जखमी झाले. ही आकडेवारी सीमा सुरक्षा दलाच्या सर्वोच्च राष्ट्रसेवेची द्योतक होय.
सीमा सुरक्षा दलाला १ महावीरचक्र, ४ कीर्तिचक्रे, ११ वीरचक्रे, १० शौर्यचक्रे आणि ५६ सेनापदके या वीरसन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय अनेक सन्मान त्याच्या अधिकारी आणि जवानांना व्यक्तिगत पातळीवर प्राप्त झाले आहेत.
राष्ट्रसेवेसाठी वाहून घेतलेल्या सीमा सुरक्षा दलाचे हे धवल राष्ट्रकार्य भविष्यातही चालू राहील यात तीळभर संदेह नाही.
सीमा सुरक्षा दलाच्या सर्व जवानांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा.
Leave a Reply