देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक संस्थेची स्थापना १ जुलै १९२५ रोजी झाली. पं पलुस्कर ह्यांना जे कार्य अपेक्षित होते ते खऱ्या अर्थाने संगीततज्ञ गुरुवर्य. बी. आर. देवधर मास्तरांनीच केले. ह्या कार्याचा एक भाग म्हणून आपल्या गुरूच्या आज्ञेवरून १ जुलै १९२५ रोजी ‘देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ या संगीत विद्यालयाची स्थापना केली. गिरगावातील प्रार्थना सभेच्या जागेमध्ये विद्यालय सुरू केले. विद्यालयाचे नामकरण श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले .
विद्यालय सुरू झाले तेव्हा हातात एकही वाद्य नव्हते. त्यावेळी स्व. डॉ बाबासाहेब भाजेकर यांनी आपली किमती हार्मोनियम विद्यालय सुरू करण्यासाठी दिली. आणि त्यानंतर विद्यालय सुरू झाले आणि तेथे संगीत शिक्षण आणि संगीत प्रसाराचे कार्य सुरू झाले. आपले गुरू पं विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी त्यांना सांगितलेले शब्द तंतोतंत खरे ठरले. त्यांनी सांगितले होते की पैसे नाहीत म्हणून विद्यालय सुरू करण्याचे थांबाल तर ते कधीच सुरू होणार नाही. काम सुरू करा मदतीचे हात आपोआप पुढे येतील. श्रीमती सरोजिनी नायडू, डॉ एनी बेझेंट, श्री बीपीनचंद्र पाल, श्री मदन मोहन मालवीय, श्री भुलाभाई देसाई, जस्टीस पाटकर, सर रवींद्रनाथ टागोर अशा थोर लोकांनी विद्यालयाला भेट देऊन आपले आशीर्वाद दिले.
अजून एक ऐतिहासिक गोष्ट या विद्यालयात घडली. ती म्हणजे ६ जानेवारी १९२९ रोजी पं विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं विष्णू नारायण भातखंडे या संगीतक्षेत्रातील दोन विष्णूंना एकत्र एका मंचावर बाजू बाजूला बसवून त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान त्यांच्याच तोंडून ऐकण्याची पर्वणी श्रोत्यांना मिळवून दिली. मुंबईत प्रो. बी. आर. देवधर यांचे हे संगीताचे शिक्षण देणारे नुसते विद्यालय नाही तर संगीताचे ते एक मुक्त विद्यापीठ आहे. त्या काळी अभिजात संगीतातील घराणेदार गायकी समजावून घेण्यासाठी सगळ्या घराण्यांच्या कलावंतांना तेथे गाण्याची मुक्तता असे. त्या संस्थेत शिकणाऱ्या सगळ्या चुणूकदार विद्यार्थ्यांना ही वेगवेगळ्या कलावंतांची गाणी म्हणजे केवळ पर्वणीच नसे, तर तो त्यांच्या अभ्यासाचाच भाग असे.
कुमार गंधर्व, पंढरीनाथ कोल्हापुरे, बाबुराव रेळे, पं व्ही जी जोग, पं डी के दातार, वसुंधरा श्रीखंडे, कंचनमाला शिरोडकर, शांता आमलाडी असे अनेक देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिकचे विद्यार्थी होऊन गेले. देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिकची ही वस्तू आजही ऑपेरा हाऊसच्या कोपऱ्यावर अस्तित्वात आहे आणि संगीत शिक्षण देण्याचं कार्य आजही ह्या वास्तू मध्ये चालू आहे. सध्या संगीता गोगटे या ‘देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’च्या संचालिका आणि विश्वस्त आहेत.
‘संगीताचे उत्तम गुरू असलेल्या देवधरांचं उत्तम शिष्य म्हणून जे दर्शन होतं ते जुळलेल्या तानपुऱ्यातून आपोआप उमटणाऱ्या गंधाराइतकं सहज आणि सुंदर आहे. ‘स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’मधले देवधर जसे उत्तम गुरू आहेत, तसेच त्या स्कूलमधले उत्तम विद्यार्थीही तेच आहेत.’ पु. लं.नी नोंदवलेलं हे निरीक्षण!..
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply