पुण्यातील प्रभात स्टूडियो सोडून चित्रपती व्ही. शांताराम यांनी मुंबईला चित्रपट निर्मितीसाठी ९ नोव्हेंबर १९४२ साली राजकमल कला मंदिरची सुरुवात केली. व्ही. शांताराम यांनी होमी वाडिया यांच्या कडून मुंबईच्या परेल भागात वाडिया मूवी टाउनची पाच एकर जागा विकत घेतली व त्यावर राजकमल कला मंदिरची उभारणी केली.
ज्या वेळी राजकमल कला मंदिरची उभारणी त्या वेळी येथे चारही बाजूंनी जंगल होते. सुरुवातीला या जागेवर एक शेड उभी करण्यात आली, त्यातच राजकमल कला मंदिर प्रा.लि.चा पहिला चित्रपट शकुंतलाचे चित्रीकरण पार पडले. राजकमलच्या सेहरा, गीत गाया पत्थरों ने, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनिस की अमर कहानी, भारताची पहीला टेक्नीकलर ‘नवरंग’ या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. याचे आऊट डोअर बाहेरील मोकळ्या जागी केले जायचे.
नंतर व्ही. शांताराम यांनी राजकमल कला मंदिर अद्यावत बनवले. राजकमल बद्दल त्या काळी असे म्हणले जायचे की निर्मात्याने स्क्रिप्ट घेऊन यावे व चित्रपटाची रिळे घेऊन जावी. व्ही.शांताराम यांनी राजकमल मध्ये एडिटींग, रेकॉर्डिग, डबिंग, मिक्सिंगचे स्टूडियो बनवले होते. या स्टुडिओमध्ये ब्लॅक आणि व्हाइट चित्रपटाची प्रोसेसिंग लॅबही होती. त्या काळी राजकमल कला मंदिर मध्ये २७० लोक काम करत असत. या मुळे भारतात राजकमल कला मंदिर हे निर्माते व दिग्दर्शक यांचा आवडीचा स्टुडिओ बनला.
व्ही.शांताराम यांनी १९६० साली याचे दरवाजे बाहेरील लोकांच्या साठी उघडले. बी. आर. चोपडा, यश चोपडा, सत्यजीत रे, मनमोहन देसाई, स्वतंत्र घटक, सुभाष घई, ऋषीकेश मुखर्जी, शक्ति सामंत, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, मृणाल सेन अशा दिग्दर्शकांचा आवडीचा स्टुडिओ बनला. यश चोपडा यांच्या पहिल्या ‘धूल का फूल’ पासून शेवटच्या ‘जब तक है जान’ या चित्रपटापर्यत सर्व चित्रपटाचे चित्रीकरण राजकमल कला मंदिर मध्ये झाले. ‘शोले’ चे डबिंग भी राजकमल कला मंदिर मध्ये झाले.
सध्या राजकमल कला मंदिरचे व्यवस्थापन व्ही.शांताराम यांचे चिरंजीव किरण शांताराम बघतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply