नवीन लेखन...

इस्टेट एजंट गोमु (गोमुच्या गोष्टी – भाग ५)

आधी मुंबईमध्ये आणि नंतर नव्या मुंबईत जागांच्या किंमती कशा आणि किती पटींत वाढल्या याच्या गोष्टी आम्हाला कोणी ना कोणी ज्येष्ठ नेहमीच ऐकवत असतो. त्या अरेबियन नाईटस् मधल्या गोष्टीप्रमाणे सुरस आणि चमत्कारिक वाटतात.

सीबीडीला आजच्या रद्दीच्या किलोच्या भावाने म्हणजे एक चौरस फुटाला दहा बारा रूपयेप्रमाणे लोकांनी जागा चाळीस वर्षांपूर्वी घेतल्या आणि आजच्या सोन्याच्या भावापेक्षा जास्त किंमतीत विकून पैसा केला. अशा त्या गोष्टी.

१९८५मध्ये गद्र्यांना ४०,००० रूपयांत तीन हजार चौरस फूटाचा एक बैठा बंगला सीबीडीत मिळाला होता. त्याला त्यांनी नांव दिले होते “सावली”. खरं तर गद्रे तेव्हां तरूण होते तरी त्यांनी सावली नांव कां दिलं कुणास ठाऊक. बहुदा निवृत्तीनंतर बंगल्यात रहायला यायचा विचार असावा, म्हणून सावली. पुढे त्यानी त्या बंगल्यावर एक मजला वाढवला होता आणि तो चार हजार फुटाचा मोठा बंगला झाला होता.

गद्रे स्वत: ‘सावली’त रहायला कधीच आले नाहीत. ते कायम उन्हांत, माफ करा, मुंबईत राहिले. सीबीडीतला बंगला नेहमी लिव्ह अँड लायसन्सवर देत राहिले. मात्र त्यांनी बंगला उत्तम स्थितीत ठेवला होता. आता त्यांच्या मनांत तो विकायचा विचार होता. सीबीडीतल्या किंमती खूपच वाढल्या होत्या. दहा रूपये चौरस फूटाचे आता दहा हजार रूपये चौरस फूट झाले होते. त्या बंगल्याची त्यांना कमीत कमी चार कोटी रूपये किंमत अपेक्षित होती आणि सर्व अवांतर खर्चही विकत घेणाऱ्याने करायचा होता. मध्य मुंबईत राहून हे सर्व काम त्यांना करणं शक्यच नव्हतं. मग त्यांनी हे काम एखाद्या इस्टेट एजंटवर सोपवायचे ठरवले.

गोमु नेहमीप्रमाणे तात्पुरती कामे करत होता. मुदत संपली की काम सोडत होता. नुकताच तो एका मोठ्या इस्टेट ब्रोकरकडे काम मिळवण्यांत यशस्वी झाला होता. त्याच नांव होत गुप्ता. तो गुप्ता अँड सन्स ह्या नावाने प्रोप्रायटरी कंपनी चालवत असे. इस्टेटशी संबंधित सर्व कामे गुप्ता करत असे.

३० वर्षांपूर्वी गुप्ता उत्तर हिदुस्तानांतून मुंबईत आला, तेव्हां एका वळकटीशिवाय कांही नव्हतं त्याच्याकडे. आता तो तीन फ्लॕटस्, दोन हॉटेल्स आणि एक दुकान यांचा मालक होता. अनेक नव्या प्रॉपर्टीज नव्या मुंबईत तयार होत होत्या, त्या सर्वांत त्याला फ्लॕट विकल्यास ब्रोकर म्हणून भरपूर दलाली मिळत असे. त्याने हाताखाली पांच सहा माणसे ठेवली होती. बरेच परप्रांतीय ब्रोकर इथे येऊन श्रीमंत झाले होते. म्हणजे बघा, मूळची जागा मराठी माणसांची आणि खरेदी करणारेही बरेचसे मराठीच. पण ब्रोकरचं म्हणजे दलालीचं काम मराठी माणसाला कमीपणाच वाटे आणि कदाचित त्यामुळेच जमतही नसे. गोमुला मात्र आपण एक यशस्वी ब्रोकर होणार याबद्दल शंका नव्हती. गोमु तसा गोडबोल्या होता. ह्या कामांत गोड बोलणे हा अतिशय महत्त्वाचा गुण होता. ब्रोकरकडे काम करणे ही सुरूवात होती.

गुप्ताने गोमुला प्रॉपर्टीज ग्राहकांना दाखवण्याचे काम दिले होते. इच्छुक ग्राहकाला उपलब्ध फ्लॕट किंवा बंगला दाखवायचा. त्यांत असलेल्या सुविधा सांगायच्या. तिथे रहाण्याचे फायदे सांगायचे. वैगुण्यांबद्दल शक्यतो बोलायचे नाही. शक्यतो गिऱ्हाईक हातचे जाऊ द्यायचे नाही. अशा कांही सूचना देऊन त्याने गोमुला कामाला ठेवले होते.

जागा बघायला आलेल्या ग्राहकाला चहापाणी द्यायलाही परवानगी होती. पण सध्या तो खर्च गोमुने आपल्याच खिशातून करायचा होता. गुप्ता ते पैसे नंतर देणार होता. वळकटी घेऊन आलेल्या गुप्ताने उगीच एवढी इस्टेट इथे केली नव्हती. जेवढी पेमेंटस पुढे ढकलतां येतील तेवढी पुढे ढकलायची हे त्याचं सुरूवातीपासूनचं धोरण होतं.

गेल्या तीन आठवड्यांत गोमुने तब्बल ५० जणांना वेगवेगळ्या जागा दाखवल्या होत्या आणि त्या पन्नास जणांच्या चहापाण्यावर पंधराशे रूपये खर्च केले होते. ते त्याला अजून मिळायचे होते.

गद्रेंनी बंगला विकायला काढायचे ठरवल्याच्या बातमीचा वास लागतांच गुप्ता त्यांना भेटला व गोड शब्दांत त्यांनी त्यालाच ब्रोकर म्हणून नेमणे कसे त्यांच्या फायद्याचे आहे हे पटवू लागला. विनंती करू लागला. त्याची इच्छा होती की गद्रेनी त्याला एकट्यालाच ब्रोकर नेमावं, तो त्यांना खात्री देत होता की तो त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळवून देईल.

गुप्ता या बाबतीत जातिवंत दलाल होता. तो जागा विकत घेणाऱ्याची खात्री पटवी की तो त्याच्या बाजूचा आहे आणि जागा त्याला गुप्तामुळे स्वस्तांत मिळते आहे. तर विकणाऱ्याला वाटे की गुप्ताने आपल्याला जास्तीत जास्त, किंबहुना बाजारभावापेक्षाही जास्त, किंमत मिळवून दिली आहे.

पण गद्रेही व्यवहारांत मुरलेले होते.

ते म्हणाले, “हे पहा गुप्ताजी, मला मी ठरविलेली किंमत मिळाली की पुरे आहे. मी तुम्हांला हे काम देतो. पण इतर ब्रोकरनाही मी संधी नाकारणार नाही. जो पहिल्यांदा मला हवी असणारी किंमत देणारं गिऱ्हाईक आणेल, त्याला मी ब्रोकरेज देईन. चार कोटींचा अर्धा टक्का म्हणजे सुध्दा दोन लाख रुपये होतात. तेवढेच मी द्यायला तयार आहे. त्यापेक्षा जास्त कमिशन हवं असेल तर मिळणार नाही.”

गुप्ताला त्यांच्या अटी मान्य करण्यावांचून गत्यंतर नव्हतं. गुरूजींच्या पूजेला जशी मान हलवावीच लागते, तशी गुप्ताने त्यांच्या म्हणण्याला हलवली.

गुप्ताने हा बंगला आलेल्या ग्राहकांना दाखवायचं काम गोमुलाच दिलं. गोमुने प्रथम बंगला नीट पाहून घेतला. आतापर्यंत ५० जणांना वेगवेगळ्या जागा दाखवून गोमु विकावयाच्या जागेच रसभरीत वर्णन करण्यात पटाईत झाला होता. तसंच कुठल्याही जागेची वैगुण्ये कशी लपवायची हेही शिकला होता. जागा स्टेशनपासून कितीही लांब असली तरीही ती दहा मिनिटांच्या अंतरावरच आहे असं सांगायचं, एखाद्या जागेला लिफ्ट नसली तर जिने चढण्या-उतरण्याचा व्यायाम शरीराला कसा चांगला याबद्दल बोलायचं, नवीन जागेला पाणी पुरवठा जरी टँकरने होणार असला तरी ‘२४ तास पाणी उपलब्ध’ असे मोघम सांगायचे, हे सगळं तो शिकला होता.

हा तर स्वतंत्र बंगला होता. त्याचे सौंदर्य, फायदे, वैभव, इतिहास, वास्तू गुण हे सर्व गोमुने मुखोद्गत करून टाकलं. बंगल्याच्या आर्कीटेक्टच्या नांवापासून सर्व माहिती त्याने तोंडपाठ केली होती. एक गोष्ट मानायलाच हवी की गोमुला अजून यश मिळतं नसलं तरी तो होमवर्क पक्कं करत असे. आतांही चांगलं होमवर्क करून तो चांगल्या ग्राहकाची वाट पहात होता.

ग्राहक शोधण्याचं काम गोमुकडे नव्हतं. ते काम स्वत: गुप्ताच करी. गुप्ताच्या चार पैसे बाळगून असणाऱ्या लोकांशी ओळखी होत्या. तो दोन तीन क्लबचाही मेंबर होता. त्यामुळे त्या मित्रांच्या मार्फत तो जागा घेऊ इच्छिणाऱ्यांची बरोबर माहिती मिळवत असे. त्यामुळे लौकरच नाना देशपांडे हे गिऱ्हाईक त्याला सांपडले.

नाना देशपांडे माहिमला रहात होते. माहिमचा फ्लॕट विकून आता नव्या मुंबईच्या शांत आयुष्याची त्यांना ओढ वाटू लागली होती. त्यांच्या बीएआरसीतील बरीच निवृत्त मित्रमंडळी नव्या मुंबईत स्थायिक झाली होती. त्यांचे बंगले आणि तिथला सुंदर परिसर त्याने पाहिला होता. त्यांची माहिमची जागा लहान होती आणि रस्त्यालगत असल्यामुळे प्रदूषणाचा खूपच त्रास होता.तिथल्या अफाट किंमतीमुळे त्यांना बंगला घ्यायला हवे तेवढे पैसे मात्र ती जागा विकून सहज मिळणार होते.

गुप्ताने गद्रेंच्या बंगल्याबद्दल सांगताच त्यांनी सरळ त्याला “जागा पहायला कधी येऊ ?” असाच प्रश्न केला.

गुप्ताने त्यांना शनिवार सकाळची वेळ दिली.

गुप्ताने गोमुला ताबडतोब सूचना दिल्या.

“देशपांडे साबको ‘सावली’का ॲड्रेस दिया है. वह अपनी पत्नीके साथ दस, साडे दस तक जगहपे आजायेंगे. अपनी कारमे आयेंगे. उनको रिसीव्ह करना और बंगला ठीकसे बता देना. और अपने शहरका भी अच्छा परिचय बता देना. क्या समझे ?”

खरं तर गुप्ताला मराठी येत होतं. पण गोमुशी बोलतांना तो हिंदीतच बोले. ह्या बाबतीत गोमुही आपला बाणा सोडत नसे. तो मराठीतच बोले.

तो म्हणाला, “गुप्ताजी, देशपांडेला मी कसा गारेगार करून टाकतो बघा. तो चेक देऊनच जाईल इथून.”

गोमु शनिवारी सकाळी माझ्याकडे आला आणि माझ्या कपड्यांतला नवा रेघांरेघांचा, इस्त्री करून ठेवलेला, निळा शर्ट त्याने उचलला.

मी म्हणालो, “अरे, आज ऑफिसमध्ये काॅन्फरन्स आहे. तो शर्ट मला हवाय. तो घेऊ नकोस.”

गोमु म्हणाला, “अरे, तीस हजार रूपयांचा सवाल आहे. देशपांडेनी खूश होऊन बंगला घेतला की मला तीस हजार रूपये देणार आहे गुप्ता. मग मी तुला असे डझन शर्ट आणून देईन.”

मित्राच्या भल्यासाठी मला दुसऱ्या एका सफेद शर्टाला घाईघाईने इस्त्री करावी लागली.

गोमु तय्यार होऊन साडेनऊ वाजतांच गद्रेंचा बंगला ज्या गल्लीत होता तिच्या टोकाशी जाऊन उभा राहिला. देशपांडेंची गाडी आली तर तो आता रेडी होता. गाड्या अधूनमधून जात येत होत्या. त्या बहुतेक स्थानिक होत्या हे सुरूवातीच्या नंबरवरूनच त्याला कळत होतं. गुप्ताने सांगितले होते देशपांडे दहा-साडेदहाला येतील. पण दहाला पांच मिनिटं असतांनाच एक बीएमडब्लू गाडी तिथे येऊन थांबली. तिचा सुरूवातीचा एमएच झीरो वन नंबर पाहून गोमुची खात्री झाली की ही देशपांडे साहेबांचीच गाडी.

तो ताबडतोब तिकडे धांवला. त्याने गाडीचं दार उघडलं आणि आतून एक उंच, गोरे, सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेले, साधारण साठीच्या आसपास वय असेल असे स्मार्ट गृहस्थ बाहेर आले. गोमु त्यांना पाहून प्रभावित झाला. इतक्या सुंदर बंगल्याला असाच मालक हवा, अशी त्याने मनाशी खूणगांठ बांधली. त्यांची पत्नी बरोबर आलेली दिसत नव्हती. पण तसं विचारणं बरं दिसलं नसतं.

गोमुने त्यांना विचारलं, “आपण “सावली” बंगला पहायला आलात ना ?”

ते गृहस्थ म्हणाले, “हो. आणि आपण ?”

“मी आपल्याला बंगला दाखवायलाच आलो आहे. माझं नांव आहे, मुचकंदराय गोविंदराय गोरेगांवकर. पण मला सर्व गोमाजी म्हणतात. आपणही गोमाजी म्हणा.”

असे म्हणून गोमु जवळच असलेल्या बंगल्यात घेऊन गेला.

पुढचा अर्धा तास गोमुच्या तोंडुन प्रत्यक्ष सरस्वती अस्खलित शब्दांत बंगल्याचं वर्णन करत होती.

पु. ल. देशपांडेना त्यांच्या एका परिचिताने हातांत वीट धरून नव्या बंगल्याचं “वीट” येईपर्यंत वर्णन ऐकवल्याची कथा तुम्ही वाचलीच असेल.

तसचं वर्णन गोमुने केलं.

“असा प्रशस्त हॉल आख्या नव्या मुंबईत नाही. बाथरूम्स ताज हाॕटेलच्या डिझाईन प्रमाणे सजवल्यात. सर्व बेडरूम्सना मोकळी हवा येईल अशी व्यवस्था आहे. किचनची रचना मुद्दाम मोठ्ठ्या फर्निचर कंपनीचा सल्ला घेऊन केलेली आहे. इथे राहिलेल्यांची खूप भरभराट झाली.”

गोमुची टकळी चालूच होती.

पण हे ‘देशपांडे’ वीटलेले दिसले नाहीत कारण ते बंगला बघून इंम्प्रेस झाले होते.

ते म्हणाले, “गोमाजी, हा बंगला मी घेतलाच समजा.”

हे शब्द ऐकून, एखाद्या नेहमी नापास होणाऱ्या मुलाला पास झाल्याचं कळल्यावर जो आनंद होतो, तसा गोमुला झाला.

गोमुने त्यांच्यासाठी खास नारळपाण्याची व्यवस्था केली होती.

ते पिऊन होतांच ते गोमुला म्हणाले, “बसा गाडीत. मी सोडतो तुम्हांला हवं तिथे.”

गोमु गाडीत बसत असतांनाच तिथे रिक्षांतून एक जोडपं उतरलं.

इकडे तिकडे बघत त्यांनी गोमुला प्रश्न विचारला, “सावली” बंगला कुठे आहे ?”

गोमुने त्यांना ताडकन् उत्तर दिलं, “आता तो बंगला विकला गेलाय. तुम्ही बघून कांही फायदा नाही.”

तो गाडीत बसला आणि गाडी निघाली.

पंधरा मिनिटांनी गाडीतून उतरताना तो देशपांडेना म्हणाला, “देशपांडे साहेब, तुम्ही लौकर ॲडव्हान्स भरा.”

ते गृहस्थ म्हणाले, “हो, हो, नक्कीच. पण मी देशमुख, देशपांडे नाही. गोमाजीशेट, मनपसंत जागा दाखवल्याबद्दल धन्यवाद.”

एवढं बोलून त्यानी आपली बीएमडब्लू स्टार्ट केली आणि ते भर्रकन गेले.

गोमु बुचकळ्यांत पडला. देशपांडेंचे देशमुख कसे झाले ?

तो असा विचार करत असतांनाच गुप्ताचा फोन आला, “तुला एवढं बजावून सांगून तू बंगला दाखवायला वेळेवर हजर राहिला नाहीस. मिस्टर आणि मिसेस देशपांडेनी मला फोन केला आणि आतां मला स्वतःला इथे यावं लागलं. युजलेस, केअरलेस. मी तुला कामावरून काढून टाकतोय, तेही आतापासून. पुन्हां तोंड दाखवू नकोस.”

रागावलेला गुप्ता गोमुला मराठीत सुनावतां झाला.

देशपांडेंचे देशमुख कसे झाले ते आतां गोमुच्या लक्षांत आले. देशमुख कुणा दुसऱ्या एजंटच्या सांगण्यावरून आले असावेत आणि नंतर भेटलेलं जोडपं हे श्री व सौ. देशपांडे असावेत. नोकरी गेल्याच फारसं दुःख नाही वाटलं गोमुला. पण त्याने पाहुण्यांच्या चहापाण्यासाठी खर्च केलेले पंधराशेहून अधिक रूपये तर त्याला मिळायलाच हवे होते.

पण गुप्ताने पगार आणि ते पैसे दोन्ही द्यायला नकार दिला होता, ह्याची त्याला खंत होती.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..