युजीन पॉली यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९१५ शिकागो येथे झाला.
रिमोट कंट्रोलचा शोध लावणारे अभियंता ही युजीन पॉली यांची एका वाक्यात ओळख!
युजीन यांचे कुटुंब काही मुलाला इंजिनीअर बनवू शकणारे नव्हते. तशी त्यांची ऐपतच नव्हती. हलाखीतच विसाव्या वर्षी- म्हणजे महामंदीतून अमेरिका नुकती सावरत असतानाच्या १९३५ साली- युजीन यांनी घर सोडले आणि त्यांनी ‘झेनिथ’ या अमेरिकी कंपनीत स्टॉक बॉयची नोकरी पकडली. ती करतानाच त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्याच कंपनीची सेवा ४७ वर्षे केली. वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांनी रिमोट कंट्रोलचा शोध लावला.. त्यापूर्वी चित्रवाणी संच दुरून किंवा कोचावर बसल्या बसल्या बंद करायचा, तर दहा फुटी वायर जोडावी लागत असे. बिनतारी रिमोट नव्हतेच, ते युजीन यांच्या कल्पनेतून साकारले. तेव्हा रिमोट म्हणजे रेडिओ लहरी सोडणारी आणि आजच्या ‘हेअर ड्रायर’यंत्रासारखी दिसणारी एक बंदूकच होती ती.. या रिमोट कंट्रोलने चार कामे करता येत असत. टीव्ही बंद-सुरू करणे, चॅनेल एकेक करून मागेपुढे नेणे, चित्राची तीव्रता आणि आवाज वाढवणे वा कमी करणे. या कामांसाठी टीव्हीच्या पडद्याच्या चार कोपऱ्यांत रेडिओ लहरींचे संवेदक बसवावे लागत. असा चित्रवाणी संच युजीन यांनी ‘झेनिथ’साठी १९५५ साली बनवला आणि पुढल्याच वर्षी तब्बल ३० हजार संचांची मागणी आली.
महायुद्धाच्या काळात युजीन यांनी रडार तंत्रज्ञानावरही काम केले होते. पुढे मोटारीतला पुश-बटन रेडिओ आणि आजच्या ‘डीव्हीडी’चे आद्यरूप ठरलेली ‘व्हिडीओ डिस्क’यांची संकल्पना त्यांचीच होती. त्यांचे पेटंटही त्यांच्याकडे होते. एकूण १८ पेटंट त्यांच्याकडे होती.
युजीन पॉली यांचे निधन २० मे २०१२ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply