म्युनिक ते रोम असा पुढचा लांब पल्याचा १६ तासांचा प्रवास होता. गाडीला इटालियन डबे. जर्मन रेल्वेच्या मानाने यथातथाच. प्रत्येक डब्यात प्रचंड गर्दी, गडबड, गोंधळ. स्वच्छतेच्या बाबतीत आपलेच भाऊ. जागोजागी कागदाचे कपटे पडलेले होते. बरेचसे इटालियन प्रवासी डब्यात होते. त्यांच्याकडे पाहून पुस्तकामध्ये वाचल्याप्रमाणे त्यांच्यावर भरवसा न ठेवणं इष्ट असं खात्रीनं वाटत होतं. त्यामुळे पाकीट व पासपोर्ट जपण्याकडे जास्त लक्ष द्यावं लागत होतं. बरोबर एक अमेरिकन प्रवासी युरेलने संपूर्ण इटली फिरण्यासाठी आला होता. तो अमेरिकन रेल्वेवरील इंजिन ड्रायव्हर होता आणि फुशारक्या मारण्यात तो एकदम वस्ताद दिसला. ‘इटालियन कसे मूर्ख आहेत, मी त्यांना पासबाबत गंडवून १५ दिवस जास्त प्रवास कसा पदरात पाडून घेतला, हे कौतुक त्याचं त्याच्याचकडून ऐकल्यानंतर मनात म्हटलं, ‘इटालियन परवडतील, पण तू तर त्यांच्याहून वस्ताद निघाला आहेस!’
संध्याकाळचे सहा वाजले होते व गाडी अतिशय वेगाने एका बोगद्यातून जाऊ लागली. कानांत घुमणाऱ्या गाडीच्या विशिष्ट आवाजाची लय थांबतच नव्हती. जवळपास २० मिनिटं बोगद्यातून चाललेला प्रवास संपतच नव्हता. तेव्हा आमचं युरेल बायबल म्हणजे टाईम टेबल काढलं. त्यावरून कळलं ते असं, की तो युरोप रेल मार्गावरील सर्वांत लांबीचा बोगदा. आता स्वित्झर्लंड ओलांडून आम्ही थेट उत्तर-इटलीत प्रवेश केला होता. रात्री गाडीचे डबे अगदी आपल्याकडील डब्यांप्रमाणे हलत होते. प्रवाशांची ये-जा चालू होती. रोम येण्याच्या आधीचा अर्धा तास म्हणजे जणू कल्याण-मुंबई रेल्वेमार्गावरून जात असल्यासारखं वाटत होतं. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस दाटीदाटीने बांधलेली मजली-दोन मजली जुनाट घरं, कचऱ्याचे ढीग, गॅलरीत वाळत घातलेल्या कपड्यांच्या रांगा. हे सर्व पार करत रोम (रोमा) स्टेशनात प्रवेश केला. या स्टेशनची भव्यता मात्र डोळ्यांत भरणारी आहे. अनेक फ्लॅटफॉर्मूस, जाणाऱ्या व येणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या, खचाखच गर्दी, मध्यात मार्बल टाईल्सच्या फरशा असलेला भव्य हॉल, अनेक चौकशीखिडक्यांवर शहराची माहिती देणाऱ्या चुणचुणीत मुली, असा सगळा माहौल होता. त्या मुलींनी आमच्या खिशाला परवडेल अशी राहण्याची जागा मिळवून दिली.
युरोपमधील प्रत्येक मोठ्या स्टेशनवर चलन बदलून देण्यासाठी खास जागा असतात. जिथे जाऊ त्याप्रमाणे आपल्याजवळील डॉलर वा पौंड बदलून त्या देशाचं चलन घ्यावं लागे. एकूणच, गणिताच्या मदतीने गुणाकार, वगैरे करून पुन्हा चलन ओळखून भरभर हाताळण्यास वेळ लागत असे. इटालियन चलन लिरेच्या १००० पासून ते १ लाख लिरेपर्यंतच्या नोटा या सर्व अतिशट जुनाट होत्या. त्यात भामटेपणा भरपूर. बाहेर पडताना तारेवरची कसरतच होती. त्यात हे सर्व चलन त्याच देशात संपवावं लागतं, कारण त्याला दुसऱ्या देशात निव्वळ कागदाची किंमत.
स्टेशनबाहेरचा भव्य चौक सामानासकट पार करताना कौशल्य पणाला लावावं लागत होतं. चोहोबाजूंनी मोटारींचे ताफेच अंगावर आल्यासारखे वाटत होते. घामाच्या धारा लागलेल्या, हॉटेलमध्ये पंखाही नव्हता. हुश्श करत तसेच स्थानापन्न झालो. ट्रेनमधलं खाणं इतकं टाकाऊ दर्जाचं होतं, की ते वाटेत अक्षरशः टाकून दिलं. पोटात कावळे कोकलत होते. पिझ्झाहटचं छोटं दुकान दिसलं आणि तत्काळ प्रवेश केला. इटलीत आल्यावर आम्हाला पाहायचा होता पिसाचा झुलता मनोरा. ‘रोमा’हून पिसाचा झुलता मनोरा गाठण्याकरता पूर्ण वातानुकूलित गाडी होती. आम्ही स्टेशनवर पोहोचलो, तो गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली. शेवटी, खिडकीच्या खाली सामान ठेवलं व त्यावर बैठक मारली. खिडकी मात्र लांबच लांब. त्यांची उत्तम काच. संपूर्ण प्रवास समुद्राच्या कडेकडेने. काही वेळा लाटा अगदी रुळांना भिडत होत्या. या एकमेव प्रवासात तिकीट तपासनीस आलाच नव्हता, नाहीतर आतापर्यंतच्या युरोप प्रवासात रेल-पास व पासपोर्ट अनेक वेळा दाखवावा लागला होता.
पिसा ते व्हेनिस हा प्रवास फ्लॉरेन्समार्गे होता. वाटेतील बेलॅगोना स्टेशनावर अतिरेक्यांनी स्फोट घडविल्याने गाड्यांचा प्रचंड गोंधळ उडाला होता. स्टेशनात प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे वाहत होते. मरणाचा उकाडा होता, त्यातच पंख्यांची वानवा होती. व्हेनिसला पोहोचेपर्यंत रात्रच झाली. चांगले ६ ते ७ तास उशिरा पोचलो. व्हेनिस हे कालव्यांचे शहर. स्टेशन येण्याच्या आधी १० मिनिटं रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंनी पसरलेला शांत समुद्र. स्टेशन छोटेसं पण सुबक.बाहेर पडतो तो कालव्यांचं जाळं, त्यांमधून जाणाऱ्या गंडोला (Gondola) बोटी. तिथे बाकी दुसरी कोणतीच वाहनं नव्हती.
व्हेनिस स्टेशनवर मी व माझे दोघे मित्र अशी आमची एकत्रित केलेल्या प्रवासाची सांगता होणार होती. मी एकटाच पुढे तीन गाड्या बदलून १८ तासांचा प्रवास करून थेट जर्मनीतील मॅनहाईमपर्यंत जाणार होतो. आम्ही तिघेही भावनिक झालो होतो. गेले ६ महिने सतत आम्ही ज्या प्रवासाचं स्वप्न पाहत होतो, जे विचार, ज्या योजना मनात घोळवत होतो, त्याची अखेरी आज सांगता झाली.
यापुढचा माझा एकट्याचा व्हेनिस ते व्हेरेनोआ असा ३ तासांचा प्रवासही मस्त झाला. रात्री ९ च्या सुमारास मला व्हेरेनोआ स्टेशनवर उतरायचं होतं. स्टेशन निर्मनुष्य. मिणमिणते दिवे. मला तर अगदी भिवपुरी रोड स्टेशनची आठवण झाली. काळोख्या रात्री एका बाकड्यावर मी एकटाच पुढील येणाऱ्या गाडीची वाट पाहत होतो. सुरुवातीला एकांताची भीती वाटत होती. मग हळूहळू गेल्या महिन्याभरातील आठवणींमध्ये रममाण झालो. मध्यरात्री १ वाजता म्युनिकला जाणाऱ्या गाडीचं आगमन झालं. अंधारातच २ मिनिटांत योग्य तो डबा शोधत एकदाची बसण्यापुरती जागा मिळाली. डब्यातील इतर सर्व प्रवासी गाढ झोपी गेलेले. परत एकदा पासपोर्ट व रेल पास तपासण्याचे सोपस्कार झाले.
सकाळी ८ वाजता म्युनिक स्टेशन आलं. आता हे स्टेशन माझ्यासाठी सरावाचं झालं होतं. आज युरेल पासचा दिवस संपला होता. रेलने युरोप पाहण्याचं स्वप्न प्रत्यक्षात सुरळीतपणे साकार झालं होतं. आयुष्यातील हे सुवर्ण दिवस आमच्या स्मृतीत चिरंतन राहणार होते.
-– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply