‘जे होतं, ते चांगल्यासाठीच’ असं आपल्यात म्हणतात. कादचित जर काही वाईट किंवा मनाविरूद्ध घडलं, तर वाईट वाटू नये किंवा मनाला फार लागू नये म्हणून असे वाक्प्रचार आपल्या सांस्कृतीक पूर्वजांनी रुजवले असावेत, असं मला पूर्वी वाटायचं. पण आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्या संस्कृतीत रुजवलं, त्यामागे त्यांचा काहीतरी अनुभव असावा हे नक्की, असंही मला आताशा वाटू लागलंय. सुरुवातीस उल्लेख केलेला वाक्प्रचारही असाच अनुभवांती आपल्या पूर्वजांनी जन्माला घातला असावा, असं मला ठामपणे वाटायला लावणारा एक प्रसंग कालच मी, खरं तर आम्ही, अनुभवला..!
मी, श्री. अशोकजी राणे आणि माझा मित्र श्री. अमरजित आमले असे आम्ही तिनजणं २६ तारखेला आमचा एक कलंदर मित्र श्रा. चारू सोमण याच्याकडे देवगडला गेलो होतो. या सर्वांच्या रसिक संगतीत तीन दिवस कसे विरघळून गेले ते समजायच्या आतच पुन्हा घरी परतायचा तो २९ तारखेचा दिवस उजाडला. दुपारी २.३०च्या जनशताब्दीचं बुकींग केलेलं पण चार आणि पाच असं वेटींग होतं. म्हटलं होईल कन्फर्म. दुपारी १२ वाजता स्टेटस पाहिलं, तर वेटींगच होतं. मग हे तिकिट कन्फर्म करण्यासाठी अनेक उचापत्या मित्रांशी संपर्क साधायला सुरुवात केली पण त्या दिवशी रविवार असल्याने ते ही काहीच करु शकत नव्हते. संपर्क केला आणि मग मात्र मी मुंबईला परत जायची आशा सोडून दिली आणि दुसऱ्या दिवशीच्या डबल डेकर गाडीची कन्फर्म तिकीट मिळवली. आमचा मुक्काम एक दिवसांने वाढला.
प्रवासाती सर्व तयारी झलेली आहे, मन कधीचंच मुक्कामी पोहोचलेलं आहे आणि आता फक्त बॅग उचलायचं आणि निघायचं, अशी परिस्थिती असताना ऐनवेळी माशी शिंकून पुढचा सर्वच बेत रद्द व्हावा, अशावेळची परिस्थिती फार विचित्र असते. माझंही तसंच झालं. भयंकर कंटाळा आला नि वाटलं की पुढचे १६-१७ तास काढणं अवघड वाटू लागलं. सोबत असलेले श्री.अशोक राणे आणि अमर आमले यांची कंपनी मला आयुष्यभरासाठी मिळाली, तरी मी सर्व सोडून त्यांच्यासोबत राहायला तयार आहे. असं असतानाही त्या क्षणी तरी मला दुसऱ्या दिवशीपर्यंतचा वेळ घालवायचा कंटाळा आला होता. कदाचित त्यांचंही तसंच झालं असावं. एक दिवसाने मुक्काम अचानक वाढल्याने, दुसऱ्या दिवशीचं पुढचं सर्व शेड्युल बिघडल्याच्या जाणिवेतून तो कंटाळा निर्माण झाला होता. मला वाटतं, सर्वांचंच असं होत असावं.
आमचं मुंबईला जाणं रद्द झालं, तेवढ्यात चारु सोमण अवतरला आणि ‘जे होतं, ते चांगल्या साठीच’ याचा अनुभव आला. चारु निमंत्रण घेऊन आला होता रात्रीच्या एक कार्यक्रमाचं. देवगडातील शिरगांव येथे त्याच रात्री ‘स्वच्छंद’ हा विंदा करंदीकरांच्या कवितांवर आधारीत कार्यक्रम होता आणि त्याचं निमंत्रण घेऊन चारू आला होता. आमचे कणकवलीचे मित्र श्री. प्रसाद घाणेकर यांचाही तेवढ्यात फोन आला आणि त्यांनीही कार्यक्रमास या असा आग्रह केला. आमचं जाणं रद्द झालंच आहे, तर जाऊ कार्यक्रमाला असा विचार करून आम्ही जायचं ठरवलं आणि मग विंदांच्या समृद्ध काव्ययात्रेची जी धुंदी आम्ही परवाच्या त्या रात्री अनुभवली, ती मात्र मागच्या तिन दिवसांच्या आनंदाच्या दुधावरची साय झाली आणि ‘जे होतं ते चांगल्यासाठीच’ या वाक्याचा अनुभव आला.
देवगडातील शिरगांव या खेड्यात डॉक्टर राजेंद्र चव्हाण हे रंगवर्ती गेली दोन दशकं तिथल्या मुलांना घेऊन एकांकिका करत आहे. मला त्यांच्याविषयी ऐकून माहित होतं, मात्र डॉक्टरांना भेटायचा योग काही आला नव्हतं. सिंधुदुर्गातील लहान मुलांना नाटकांच्या माध्यमातून घडवण्याचं, त्यांच्यातील सृजनशिलता हळुवारपणे फुलवण्याचं जे काही काम करतायत, त्याला तोड नाही. डॉक्टर राजेंद्र चव्हाणांच्या एकूणच कार्यावरचा एक सुरेख लेख माझे कणकवलीस्थित स्नेही श्री. प्रसाद घाणेकर यांनी ‘thinkmaharashtra.com’ या वेबसाईटवर लिहिला आहे, तो सर्वांनी अवश्य वाचावा. या डॉ. चव्हाणांच्या संस्थेने विंदा करंदीकरांच्या समग्र साहित्य मिर्मितीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम शिरगांवात आयोजित केला होता आणि केवळ रिझर्वेशन रद्द झाल्यामुळे आम्हाला त्यात श्रोते म्हणून सहभागी होण्याचं भाग्य लाभलं आणि होतं ते चांगल्यासाठी, नव्हे, उत्तमासाठी याचा रोकडा अनुभव आला.
रात्री ९.३० वाजता शिरगांवातील डाॅ. चव्हाणांच्या ‘रुपाली हॉस्पिटल’ कम राहात्या घराच्या गच्चीवर हा कार्यक्रम यक्ष-गंधर्वांचा केला तो, कणकवलीच्या ‘पं. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या तेवढ्याच ताकदीच्या कलावंतांनी. गावाकडली रात्रीची निरव शांतता, हवीहवीशी वाटणारी हलकीशी थंडी, काळ्याशार आकाशात वर दशमीचा चंद्र आणि चांदण्यांचा दरबार भरलेला आणि खाली डॉ. चव्हाणांच्या घराच्या गच्चीवर पन्नासेक जाणत्या श्रोत्यांच्या साक्षीने भरलेली आणि भारलेलीही, यक्ष-गंधर्वांनी सादर केलेली विंदांच्या कविता गायनाची मैफल. सुख सुख म्हणजे तरी वेगळं काय असतं, याचा जिवंत अनुभव देणारी..!
डॉ. विद्याधर करंदीकरांच्या संहितेतून कार्यक्रमाच्या दोन-अडीच तासांच्या मर्यादित वेळेत समग्र विंदा समर्थपणे समोर उभे राहात होते. पुढे जाण्यापूर्वी डॉक्टर विद्याधर करंदीकरांविषयी दोन शब्द लिहिण अगत्याच होईल. कणकवलीचे रसिक आणि व्यासंगीही असलेले डॉ. विद्याधर करंदीकर आता आपल्यात नाहीत. परंतू मी मात्र अशा असामान्य व्यक्तींच्या नांवापूर्वी ‘कै.’ किंवा ‘दिवंगत’’ असं कधीही लिहित नाही. पाप-पुण्याचा हिशोब आणि रंभा-उर्वशींच्या नाचापलिकडे फारसं काही न कळणाऱ्या देवांना, अशा व्यक्तींना त्यांच्यात घेऊन जाण्याची हिम्मतच होत नसते. डॉ. करंदीकरांसारख्या व्यक्ती देवाघरी जात नसतात, तर त्या फक्त देहत्याग करतात आणि सुक्ष्मरुपानं असतात मात्र आपल्याच आजुबाजूला कुठेतरी, आपल्याला मार्गदर्शन करत, आशीर्वाद देत..! त्या दिसत नाहीत परंतू सातत्याने जाणवत राहातात आजुबाजुच्या भवतालात..!!. अश्या रसिक आणि असामान्य डॉक्टर करंदीकरांनी कवी, लघुनिबंधकार, समीक्षक, भाषांतरकार अशा साहित्याच्या अवघ्या प्रांतात सजग मुशाफिरी केलेल्या विंदांच्या आशयघन साहित्यातून, दोन-अडीच तासांच्या कार्यक्रमासाठी निवडक साहित्य निवडण्याचं आव्हान समर्थपणे पेलल्याचं समजत होतं. डॉ. करंदीकरांनी विंदांच्या कवितांवरील संहितेतून निवडलेल्या आशयघन कवितांना श्री. प्रसाद घाणेकर, श्री. वामन पंडीत, श्री. माधव गांवकर, श्री. अनिल फराकटे, विद्यागौरी, हर्षदा दीक्षित आणि जाई फराकटे यांनी तेवढ्याच समर्थपणे सादर केलं. विंदांचा अवघा काव्यप्रवास या कलंदर कलावंतांनी अगदी सहज आणि हळुवारपणे उलगडून दाखवला. माझ्यासारख्या रुख विशाय्न्च्या प्रांतात रमणाऱ्या व्यक्तीलाही ऑक्टोबरच्या ३० तारखेची ती मंतरलेली रात्र संपूच नये असं वाटत असतानाच ती रात्र संपली. हवंहवंस वाटतानाच थांबण, यातच खरं सार्थक असतं. अवघ्या तिन तासांच्या त्या काव्य मैफलीची धुंदी अद्याप ओसरलेली नाही..!
विलऱ्क्षण तरल अनुभव देणारा हा कार्यक्रम, विंदांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निनित्ताने महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’ने प्रायोजित केलेला आहे, या एकाच गोष्टीसाठी शासनाच्या फसलेल्या शंभर योजना माफ करायची माझी तयारी आहे. अधिसूचना, अधिवेशन, अधिनियम इत्यादी शब्दप्रयोगाने सामन्यांच जीवन रुक्ष करणाऱ्या शासनाच्या पुढाकाराने येवढा ‘अधिक’चा रसरशीत काव्यसोहळा, तो ही एका लहानशा खेड्यात, साजरा होतो हे मला अजुनही खरं वाटत नाहीय. ‘जे होतं, ते चागल्यासाठी’ ही म्हण खरीच असतं यावर आता माझा विश्वास बसलाय, असं म्हणतो, ते त्यामुळेच.
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply