मुंबईत पावसाळ्यानंतर हवामानात अचानक कोरडेपणा आपल्यामुळे सगळीकडे धूळ मिश्रीत हवामान आहे. सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, धूळ आणि धुराळामिश्रीत बदलती हवा मुंबईकरांच्या समस्या रोज वाढवतच आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा चेंबूर, देवनार, सायन या भागात राहणाऱ्या अनेकांनी आरोग्याच्या तक्रारींमुळे राहती घर भाड्याने देऊन उपनगरांमध्ये शिफ्ट झाले आहेत. कचऱ्याच्या डम्पिंगमुळे होणारे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.
एसपीएम (सस्पेंडेड पार्टिक्युलेटेड मॅटर) मध्ये धुके, धूळ आणि धूर या घटकांचा समावेश असतो. तर आरएसपीएम (रेस्पीरेटेल सस्पेंडेड पार्टिक्यूलेटेड मॅटर) मध्ये आठ मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या कणांचा समावेश असतो. या घटकांचे हवेतील प्रमाण इतर घटकांपेक्षा वाढले की श्वास घ्यायला त्रास होणे, खोकला येणे, नाक चोंदणे, सर्दीमुळे हैराण होणे, नाकातून पाणी गळत राहण्याचा त्रास वाढतो. साथीच्या आजारांचा जोर शहरात असताना या भागातील धूर व धुळीमुळे त्वचेवर लाल पुरळ उठणे, चट्टे येणे, अंगाला खाज सुटणे, पांढरे चट्टे असे त्रास होतात. मुंबईतील काही भागांमध्ये या प्रकारच्या आजारांचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. स्त्रियांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण आधीच कमी असते, लोहाची रक्तात तूट असेल तर त्वचाविकार, श्वसनविकारांचा संसर्ग लगेच होतो. धुळीमुळे केवळ श्वसनविकार, दमा बळावत नाही तर धुळीचे कण कानात गेले तर श्रवणक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो. हा परिणाम दृश्य स्वरूपातील व पटकन होणारा नसला तरीही कालांतराने ही क्षमता कमी होत जाते.
वडाळा, चेंबूर, देवनार, सायन या परिसरात राहणारे अनेकजण घरात धूळ येऊ नये म्हणून खिडक्या दरवाजे सतत बंद ठेवतात, पण धुळीला चाप लावताना सूर्यप्रकाशही अडवला जातो, असे कान नाक घसा तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे लहान मुलांना नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या कॅल्शियमचाही अभाव येथे आढळून येतो. वारंवार श्वास लागण्याच्या, धाप लागण्याच्या तक्रारींमुळे मुलांना कमी वयात नेब्युलायझर, अस्थमा पंप वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्याचा अधिक प्रमाणातील वापरही आरोग्यास हितावह नसल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात. या धुळीच्या अॅलर्जीमुळे त्वचा व डोळ्यांवरही परिणाम होतो. प्रदूषणामध्ये सल्फरची पातळी वाढली की फुफ्फुसाचे आजार बळावत असल्याचेही या प्रदूषणयुक्त भागात दिसून आले आहे. डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येण्यासारखा त्रास होतो. कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असेल श्वासातून तो शोषला जातो, त्याची रक्तातील पातळी वाढली तर लोह तयार करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ऑक्सिजन पातळी खालावून चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळणे, डोक्याचा मानेखालील भाग दुखत राहण्याचा त्रास हवेतील धुळीमुळे वाढतो. धुळीचे लोट वाऱ्यासोबत वाहत राहिले वा कोंडीमुळे प्रदूषित धूर, धूळ उडत राहिली तर श्वास घेण्याच्या क्षमतेसह शरिरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते. त्यामुळे सतत झोप येणे, उदास वाटणे या मानसिक तक्रारींमध्ये वाढ होते. कार्बनचे प्रदूषित हवेतील वाढते प्रमाण नाक चोंदण्याच्या तक्रारींसह कोणत्याही वस्तूचा गंध घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम करते. गर्भवती महिलांमध्ये प्रदूषणामुळे त्वचाविकार बळावले तर प्रतिजैविकेही घेता येत नाही. खोकल्याची उबळ वाढल्याने मूत्रमार्गावरील ताबाही जातो, त्यामुळे गर्भावस्थेमध्ये त्रास होण्याची शक्यता असते.
उत्तरेच्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुके, धूळ, धूर आणि विषारीवायूंमुळे वायूप्रदूषण चांगलेच वाढले आहे आणि त्यामुळे दृश्मानता कमालीची खालावली आहे आणि त्याचा परिमाण स्वरूप महामार्गांवर सतत अपघात होतांच्या बातम्या येत आहेत. दिल्ली मध्ये गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शास्त्रीय नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या माहितीनुसार शहरातील १० मायक्रोमीटर पेक्षा लहान कणांत २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांचे प्रमाण ७० टक्यांपेक्षाही जास्त आहे. हे प्रमाण दोन तीन दशकांपूर्वी ५ टक्यांपेक्षाही कमी होते. भारतातील सर्वच मोठी शहरे या प्रदूषणाच्या विळख्यात असून दिल्ली, कानपूर, पुणे, बंगलोर ही शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मोडतात. सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांची आरोग्यासाठी मर्यादा काही तासांसाठी ५० पीपीएम इतकी आहे. परंतु वर नमूद केलेल्या शहरात जवळपास वर्षातील सर्वच ३६५ दिवस ही मर्यादा ५० पीपीएम पेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. नायट्रोजन ऑक्साईड, व्ही.ओ.सी. व ओझोनवर भारतातील शहरातून फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर यांचे प्रमाण वाढणे अपरिहार्य आहे. यावरून भारतातील नागरिक अत्यंत घातक हवा श्वसन करत आहेत हे लक्षात येते. याचा परिणाम एकूणच सामाजिक आरोग्यावर होत आहे. डॉक्टरांकडे येत असलेली सर्दी, ताप, पडसे, दमा इत्यादी तक्रारींकरितार वाढलेली गर्दी हे याचे प्रतीक आहे. हे रोग अतिघातक नसले तरी सातत्याच्या प्रादुर्भावाने माणसाची शारीरिक व मानसिक क्षमता कमी करण्यात हातभार लावतात.
वायू प्रदूषणात प्रदूषके एकाच जागी तयार होतात केंद्रीय उत्सर्जन अथवा सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात सार्वत्रिक उत्सर्जन तयार होतात. केंद्रीय उत्सर्जन होण्याचे उदाहरण म्हणजे औद्योगिक ठिकाणे, वीजनिर्मिती कारखाने, तर सार्वत्रिक उत्सर्जनाचे उदाहरण आपली वाहतूक व्यवस्था धरता येईल तसेच मोठमोठ्या शहरांमधून होणाऱ्या इमारतींचे बांधकामही याला जबाबदार आहे. जर प्रदूषण एकाच जागी होत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे असते परंतु सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात होणार्या सार्वत्रिक उत्सर्जन प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे खूपच अवघड आहे. विविध प्रकारचे कडक नियम व कायदे यांनी औद्योगिक क्षेत्रातून होणार्या प्रदूषणावर विकसित देशात बर्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. परंतु भारत व इतर विकसनशील देशात अजूनही म्हणावी इतके यश मिळालेले नाही. कायद्याची कडक अंमलबजावणी मधील त्रुटी, तंत्रज्ञान वापरण्याबद्दल असलेली आर्थिक उदासीनता म्हणजे तंत्रज्ञान महाग पडते म्हणून न वापरणे व माहितीचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत.
सार्वत्रिक उत्सर्जनाच्या प्रदूषणावर तंत्रज्ञानातील सुधारणा व ऊर्जेचा कमी वापर यातूनच सुधारणा करता येते. सध्याचा विकसनशील देशांची वाढती अर्थव्यवस्था व ऊर्जेचा वाढता वापर तसेच विकसित देशातील दरडोई असलेला मोठ्या प्रमाणावरील वापर यामुळे ऊर्जेचा वापर कमी होणे सध्यातरी शक्य दिसत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानातील सुधारणा किंवा प्रदूषणरहित नवीन व स्वस्त ऊर्जास्रोताचा शोध यावर अवलंबून रहाणे आवश्यक आहे.
वाहनांमध्ये तंत्रज्ञान सुधारण्यास मोठा वाव आहे. विविध प्रकारचे कॅटॅलिटिक कन्व्हहर्टर, फिल्टर यांच्या वापराने वाहनातून बाहेर पडणार्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येते. वाहन रचनेत सध्या होणार्या आमूलाग्र बदलांमुळे, वाहनातून बाहेर पडणार्या प्रदूषकांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा दिसून येईल. यावर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती व त्याचा सार्वजनिक ट्रान्स्पोर्टसाठी जास्तजास्त वापर थोड्याबहुत प्रमाणात वायू प्रदूषण कमी करू शकते. परंतु कोणत्या प्रकारच्या ऊर्जास्रोताने जागतिक तापमान वाढ रोखता येईल, यावर अजूनतरी समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. यावर तोडगा म्हणजे भविष्यात लोकसंख्या आटोक्यात ठेवणे आणि आपल्या गरजा कमी करणे हाच सर्वात चांगला आणि सोपा उपाय ठरू शकेल असे वाटते.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply