व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करणे किंवा वाढवणे हा व्यायामाचा हेतू नाही. व्यायामामुळे शरीर आणि मन दोन्हीला मदत होते. व्यायामामुळे शरीरात जी रसायने आणि होर्मोनस निर्माण होतात त्यामुळे अनेक अवयवांना सुरळीत काम करण्यात मदत होते. तसेच मनाचा शीण जाण्यास आणि नवचैतन्य येण्यास मदत होते. त्यामुळे व्यायाम हा चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी गरजेचा आहे. पावसाळ्यात बाहेर मोकळ्यावर व्यायाम करणे कठीण होते. कधी चिखल, कधी तुंबलेले पाणी तर कधी जोरात आलेली पावसाची सर. पण अश्या वेळी आपण घरात किंवा जिममध्ये व्यायाम करू शकतो.
सध्याच्या धकाधकीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये स्वतःला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी अनेकजण व्यायामाचा आधार घेतात. त्यासाठी आपल्या बीझी लाइफस्टाइलमधून वेळ काढून जिमला जाणं, जॉगिंग करणं यांसारख्या गोष्टी अनेकजण करत असतात. पण पावसाळ्यामध्ये मात्र अनेकांना जिमला जाणं शक्य होत नाही. तर अनेकदा जॉगिंग करणंही शक्य होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मान्सून वर्कआउट टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुमची वेळ वाचण्यासोबतच तणावही दूर होण्यास मदत होते. पावसाळ्याचं आनंददायी वातावरण अनुभवण्यासाठी तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. तसेच पावसाळ्यातील आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची सर्व समस्यांपासून सुटका होते.
1) घरात जर व्यायाम करायचा असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे रोजची व्यायामाची वेळ कायम ठेवा. अनेकदा घरीच करायचं तर करू नंतर असे म्हणून व्यायाम राहून जातो. त्याऐवजी रोज जो वेळ आणि जितका वेळ तुम्ही व्यायामासाठी बाहेर जाता नेमका तेव्हाच घरात व्यायाम करा.
2) मान्सूनमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करणं आवश्यक आहे. तसेच वर्कआउट करण्यासाठी खास नियमावली करणंही फायदेशीर ठरेल. त्यानुसार तुम्ही कमीत कमी 45 मिनिटांचा अवधी वर्कआउट करण्यासाठी राखून ठेवणं गरजेचं असतं.
3) घरातील किंवा इमारतीतील जिने चढ उतार करणे हा देखील उत्तम व्यायाम आहे. पण व्यायाम म्हणून ठरलेला वेळ हा व्यायाम सतत करायला हवा. भाजी आणायला बाहेर पडताना, कामाला बाहेर जाताना, मुलांना शाळेला सोडायला जाताना, घरी येताना असे जिने चढ उतार करण्याचा शरीराला व्यायाम म्हणून उपयोग होत नाही. सलग १५ ते २० मिनटे जिने चढ उतार करणे म्हणजे व्यायाम झाला असे म्हणता येईल. जिने चढ उतार करताना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने व्यायाम होतो त्यामुळे ह्याचा शरीराला जास्त उपयोग होतो.
4) पावसाळ्यामध्ये जिममध्ये जाणं शक्य झालं नाही तर, घरच्या घरी स्ट्रेचिंग करून तुम्ही तुमच्या व्यायामाला सुरुवात करू शकता. त्यामुळे शरीराचा वॉर्मअप होण्यास मदत होते. त्यानंतर 5 मिनिटांसाठी स्पॉट जॉगिंग करा. जॉगिंग जाल्यानंतर 15 मिनिटांसाठी कार्डियो एक्सरसाइज करू शकता. त्यामुळे हृदयाची गती वाढून शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते.
5) तुम्हाला घरी एकटे व्यायाम करायला कंटाळा येत असल्यास हल्ली इंटरनेट वर अनेक अएरोबिक व्यायामाचे छान व्हिडीओ उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरना किंवा आहारतज्ञाला विचारून तुमच्या शरीरासाठी योग्य तो व्हिडीओ शोधून घेऊन दररोज वापरू शकता. हे व्हिडीओ फार उत्तम असतात. ह्यात स्क्रीन वर दिसणारी माणसे आपल्याला व्यायाम करून दाखवत असतात. त्याच बरोबर ते हा व्यायाम कसा आणि का करावा हे सांगत सुद्धा असतात. आणि तुमच्या बरोबरीने ते तितका वेळ ते विविध व्यायाम करत राहतात.
6) शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी दोरीच्या उड्या, पायऱ्यांची चढ-उतार, उड्या मारणं आणि जंपिंग जॅक यांसारखे व्यायाम तुम्ही करू शकता. असं केल्याने शरीराचे सांधे मजबूत होण्यासोबतच शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते.
7) घरातील बरीच कामेसुद्धा आपल्याला छान व्यायाम मिळवून देऊ शकतात. केर काढणे, फडक्याने फारशी पुसणे,भांडी घासणे, घरातील सामान पुसणे, कपाटातील खण आवरणे, माळ्यावारचे सामान आवरणे किंवा स्वच्छ करणे अशी अनेक कामं व्यायाम म्हणून उपयोगाला येऊ शकतात. तुमच्या घरात किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर त्यांच्याबरोबर घरातल्या घरात पकडापकडी, लपाछपी खेळणे किंवा चेंडूने खेळणे हा सुद्धा आनंद देणारा उत्तम व्यायाम आपल्यासाठी ठरू शकतो. लहान मुले म्हणजे उर्जेची खाण असतात आणि त्यांची हि उर्जा संसर्गजन्य असते. कारण त्यांच्याबरोबर आपणही लहान होऊन जातो ज्यामुळे तुमचा अख्खा दिवस छान ऊर्जामय होऊन जाण्यास मदतच होईल. अशा रीतीने आता आपण पावसाळ्यात सुद्धा निरोगी आणि सशक्त राहण्याचे अनेक मार्ग आपल्यासमोर उपलब्ध आहेत. तर तुम्ही ह्या पावसाळ्याचा छान आस्वाद घ्याल अशी नक्की खात्री आहे.
— संकेत रमेश प्रसादे
Leave a Reply