१० आणि ११ मार्चला दादरच्या दादर सार्वजनिक वाचनालयातील ” छंदोत्सव २०१७ ” या विविध छंद जोपासणाऱ्यांच्या छंदांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. होळीच्या सणाची सुट्टी, दुसऱ्या शनिवारची सुट्टी , उत्कंठा शिगेला पोचलेल्या उत्तरप्रदेश निकालांची घोषणा आणि मुलांच्या परीक्षांचे दिवस यामुळे प्रदर्शनाला कसा प्रतिसाद मिळणार याबद्दल साशंकता होती. पण उ.प्र. च्या निकालांप्रमाणेच या प्रदर्शनाला छंदप्रेमी प्रेक्षकांनी अतिशय अनपेक्षित आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला. परीक्षा तोंडावर आलेल्या असूनही, कित्येक पालक आपल्या मुलांना ” चांगले काही ” पाहायला मिळावे म्हणून आवर्जून घेऊन येत होते.कितीतरी रसिक हे कल्याण, अंबरनाथ, वसई-विरार, पालघर अशा लांबच्या ठिकाणाहूनही आले होते.
दादरचा अभूतपूर्व छंदोत्सव
Exhibition of Hobbies at Dadar
वेगळेच क्रोशाचे काम, फेल्टच्या कापडाच्या कलाकृती,सुसंगत अशा कविता लिहिलेल्या छत्री- बुकमार्क्स- टीशर्ट- पिशव्या-किचेन्स- पिगीबँक अशा वस्तू, कागदाच्या घड्या घालून केलेली फुले आणि विविध वस्तू, ओरिगामी, पार्चमेंट आणि आयरिश फोल्ड यांच्या वापराने बनविलेल्या कलाकृती,नारळ आणि बांबू यांच्या वापरातून बनविलेल्या श्रीकृष्ण मूर्ती- गणपती- दिवे-कलश-अशा कलाकृती,केवळ कागदाच्या जेमतेम पाव सेंटिमीटरच्या विविधरंगी पट्ट्या वापरून केलेली देखणी चित्रे, झाडांची पाने- झावळ्यांच्या पट्ट्या– हिराच्या काड्या इत्यादींपासून बनविलेल्या पर्यावरण स्नेही वस्तू आणि छोटी खेळणी, कॅनव्हासवर उतरविलेली छायाचित्रे,रद्दी कागदापासून बनविलेले दणकट फर्निचर, नैसर्गिक रंगांमधील सुलेखन, वेगळ्या प्रकारच्या भरतकामातून तयार केलेले घड्याळ- कोंबड्याच्या आकाराचा
टिकोझी- पर्स- फ्रेम्स- अशा अनेक गोष्टी,करवंटी आणि लाकूड यापासून बनविलेल्या लामणदिवा- मोटारसायकल- पिस्तूल- अशा वस्तू अशा असंख्य कलाकृती प्रदर्शनामध्ये होत्या.
चित्रविचित्र आकाराचे – खूप जुने आणि नवे- विविध उपयोगाचे पत्ते आणि गंजिफा, विविध मुखवटे, महाराष्ट्रातील सर्व बस सेवेची तिकिटे, नाणी-नोटा- टपाल तिकिटे- प्रथम दिवस आवरणे,सुप्रसिद्ध व्यक्तींच्या सह्या आणि हस्ताक्षरे , जुन्या / नव्या काड्यापेट्यांची लेबल्स यांचे संग्रहही खूप छान होते.
कागद कोरून साकारलेला आयफेल टॉवर- २ x २ इंचाचा कॅरम बोर्ड- २ इंचाचा फ्लॉवरपॉट अशा वस्तू सत्तरी ओलांडलेल्या चंद्रहास पटवर्धन यांनी बनविल्या होत्या. उपनिषदांचा अभ्यास केलेल्या यास्मिन श्रॉफ या ज्येष्ठ पारसी बाई स्वतः: काढलेल्या पक्ष्यांच्या आणि निसर्ग छायाचित्रांवरून ” जगात सर्व गोष्टी शक्य आहेत, कधीही निराश होऊ नका, सकारात्मक विचार करा ” असा प्रत्येकाशी व्यक्तीश: बोलून संदेश देत होत्या. मालती मेहेंदळे या सर्वात ज्येष्ठ म्हणजे ८१ वर्षांच्या छंद कलाकारांनी बनविलेली सध्या आणि क्रेप कागदाची फुले शब्दश: अचंबित करणारी होती. त्यांनी बनविलेली बकुळ, सोनचाफा, जास्वंद, आंबोली,नागचाफा अशी फुले ही कागदाची आहेत यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी बनविलेल्या कागदाच्या जरबेरा फुलांच्या शेजारी खरी जरबेरा फुले ठेवून मी एक छायाचित्र घेतले. यातील खरे कुठले आणि खोटे कुठले हे ओळखणे कठीण होते.
छंद जोपासला की वय, जात-धर्म, भाषा असे बांध राहतच नाहीत पण खूप सकारात्मक आणि सृजनशील जीवन जगता येते.
— मकरंद करंदीकर.
Leave a Reply