काही दिवसांपूर्वी रात्री नेहेमीप्रमाणे माझं फेसबुक अकाऊंट पाहात असताना, माझं खातं ब्लाॅक केलं गेलं असल्याचा मेसेज मला फेसबुककडून मिळाला. मी काहीतरी नियमबाह्य, एक्स्प्लिसीट असं पोस्ट केलंय आणि त्यामुळे सोसायटीच्या नियमांचा भंग झालाय, अस कारण त्यासाठी देण्यात आलं. मला पुढे काहीच करता येईना. ना लाईक करू शकत, ना कमेंट देऊ शकत. काही पोस्ट करायचा तर प्रश्नच नव्हता कारण लगेच एक धमकीवजा सुचना यायची, की मी काहीतरी नियम व्हायोलेट करणारं अश्लील मटेरीयल पोस्ट केलंय, जे सोसायटीच्या नियमांच्या विरुद्ध आहे. मला काहीच कळेना. म्हटलं चुकून काहीतरी तांत्रीक गडबड होत असेल, म्हणून मी पुन्हा पुन्हा ट्राय केला, तर तोच मेसेज, की मी काहीतरी अश्लिल पोस्ट केल्यामुळे माझं खातं ७२ तासांसाठी सस्पेंड करण्यात आलं आहे म्हणून. नंतर पुन्हा काही पोस्ट करायचा प्रयत्न केला तर मोबाईल मधून एक हात बाहेर येईल आणि मला एक ठोसा लगावेल म्हणून मग मी काही पोस्ट करायचा प्रयत्न सोडून दिला आणि ७२ तास वाट पाहायची ठरवलं.
मला अनायासे प्राप्त झालेल्या फेसबुक फ्री ७२ तासांत, फेसबुकनं मला ब्लाॅक का क्लं असावं, याचा विचार करू लागलो. मी साधारणत: गेली ७/८ वर्ष फेसबुक वापरतोय पण या दरम्यान मी फेसबुकच्या नियमांच्या विरुद्ध काही पोस्ट केलेलं, मला डोक्यावा ताण देऊनही आठवेना. अश्लील सोडा, कुठल्याही जाती-पंथ-धर्म वा व्यक्तीवर असंसदीय भाषेत टिका केल्याचही आठवेना. कुणा स्त्री-पुरूष मित्रांना नेहेमीच्या संवादाव्यतिकीक्त कोणते मेसेजेसही जाहिररित्या पाठवल्याचं आठवेना. शेवटी दुसऱ्या कोणीतरी खोडसाळपणा करून मला टॅग क्लं असेल, असा निश्कर्ष काढून मी तो विषय डोक्यातून काढून टाकला.
काल रात्री ७२ तासांनंतर माझं खातं सुरु झालं. दरम्यानच्या काळात मी एक पोस्ट लिहून ठेवलीच होती, ती पोस्ट करू म्हणून ती फेसबुकवर पोस्ट केली आणि सेव्हचं बटन दाबल्याबरोबर पुन्हा माझं अकाऊंट पुढच्या ७२ तासांसाठी ब्लाॅक केल्याचा मेसेज मोबाईलच्या स्क्रीनवर झाळकला आणि असं का होतंय याचा लख्ख प्रकाश माझ्या डोक्यात पडला.
होय मित्रांनो, मी अश्लील मेसेजच पोस्ट करत होतो. माझी ती पोस्ट व ती पोस्ट ज्या एका मिनिटाच्या व्हिडीयोवर आधारीत होती, तो व्हिडीयो अश्लीलच होता. मी भारतीय ‘सोसायटी’च्या नियमांचा भंग केला होता, एकदा नव्हे, दोनदा. अमेरीकन मार्क झुकेरबर्गच्या फेसबुक नियमांच्या दृष्टीने तो भारतीय सोसायटीच्या भावनांना धक्का पोचवणारा गुन्हा होता व म्हणून मला वाॅर्निंग देण्यात येत होती. मी पोस्ट करण्याचा प्रयत्न कपत असलेला व्हिडीयो ‘नग्नते’चा होता व माझी पोस्ट त्या व्हिडीयोतील ‘नग्नते’वर भाष्य करणारा होता.
भारताला नग्नतेचं वावडं कधी होतं हे मला कळेना. आपल्या देशाच्या आणि आपल्याच प्राचिन संस्कृतीच्या खुणा असलेल्या गुंफा, लेणी यामधिल शिल्प पाहिली, की नग्नता किंवा अर्धनग्नता आणि त्या अवस्थेत करायचे व्यवहार, हा आपल्या देशात कधीही ‘टाबू’चा विषय नव्हता असा अर्थ काढता येतो. ती एक स्वाभाविक सामान्य अवस्था आहे हे त्याकाळी सर्वमान्य असलं पाहीजे असंही म्हणता येतं. मग एकेकाळी नग्नता हा सामान्य सभ्यतेचा असलेला मोकळा विषय एकदम असभ्य, अशिष्ट आणि अश्लील का झाला असावा हा खरंच विचार करण्यासारखा विषय आहे.
‘नग्न’, ‘नागडा/डी’ असे साधे शब्दही आपल्या सध्याच्या ‘सोसायटी’त उच्चारणं (प्रत्यक्षात तसं राहीलं तर चालतं) अशिष्ट मानलं जातं, त्यासाठी ‘न्युड’ ह्या इंग्रजी शब्दाचा आधार घेतला जातो. नग्नता आपल्या संस्कृतीला कधीच अशिष्ट वाटली नाही. भारतीयांच्या श्रद्धेचा आणि म्हणून दररोजच्या पुजेचा भाग असलेलं शिवलिंग, त्याच्या ‘लिंग’ या नांवासकट वेगळं काय आहे? प्रचिन शिल्प ते सध्याची ‘सनी’ व्हाया शेट्टींची ‘शिल्पा’ येवढा दीर्घ प्रवास आपल्या संस्कृतीने केलाय. या मधील शेकडो वर्षांच्या काळात आपला कपड्यांचा प्रवास डोक्यावरील पदर आणि पायघोळ नऊवारी साडी, पुढे गोल साडी आणि डोक्यावरचा पदर छातीवर, पुढे पो.टि.मा, बें.टि.मा. करत पदराची जागा सुटसुटीत पंजाबी ड्रेस आणि वर ओढणीने घेतली आणि आता तर ओढणीही गायब असा झालाय. हा प्रवास सध्या ‘लो वेस्ट जिन्स’ आणि कंबरेपासून फटकून वर चढलेल्या ‘क्राॅप टाॅप’ पर्यंत होत होत, पुन्हा आपल्या त्या प्राचिन संस्कृतीतल्या शिल्पांच्या जवळपास पोहोचलाय. हे सर्व ‘फॅशन’ म्हणून चालू आहे. ‘फॅशन’ नेहेमी चक्राकार फिरत असते हे म्हणणं जर खरं अस्ल, तर ‘शिल्प’ काळातील अर्धनग्न किंवा नग्नतेच्या फॅशनमधे आपण पुन्हा येऊन पोहोचलोय, असं म्हटलं तर चुकणार नाही. प्राचिन दगडी शिल्प ते आधुनिक जीवंत ‘शिल्प’ असं फॅशनचं एक चक्र आपल्या ‘सोसायटी’ने पूर्ण केलं असं म्हणता येईल. इथं कुणाला अश्लील वैगेरे वाटलेलं नाही.
घट्ट स्लॅक आणि टाईट कुर्ता घातलेली, चालती-फिरती आधुनिक जिवंत ‘शिल्पं’, त्या प्राचिन दगडी शिल्पांचीच आठवण करून देतात. अश्या समाजमान्य कपड्यांत, हाफ आणि क्वार्टर पॅन्टीत किंवा बिकीनीत काढलेले फोटो बिनधास्त फेसबुकवर शेअर केले जातात, त्यात कुणाला वावगं, अशिष्ट, अश्लील असं काहीच वाटत नाही. फेसबुकलाही वाटत नाही. आता मी फेसबुकवर पोस्ट करायचा प्रयत्न करत असलेल्या आणि फेसबुकला अश्लील वाटलेल्या ‘त्या’ अश्लील व्हिडीयोकडे वळतो.
मित्रांनो, हा व्हिडीयो एका दिड-दोन वर्षाच्या लहान मुलाचा होता. नागड्या बाळकृष्णासारखा असलेला हा गोंद्या, स्वत:च चड्डी घालायची खटपट करत असतो. कशासाठी याची जाणीव त्याला नसली, तरी चड्डी घालायला हवी याची त्या छोट्या गोंद्याला जाणीव आहे. चड्डी घालण्याचा ते बाळ जो प्रयत्न करतं ना, ते पाहून मख्ख विद्वान चेहेऱ्यावरपण आपसूक हसू येईल. ते निरागस बाळ शेवटी दोन्ही पाय चड्डीच्या एकाच भागात घालतं, चड्डी वर सरकवतं, जो मागचा-पुढचा ऐवज झाकण्यासाठी चड्डी घालायची, तो सताड उघडा आणि चड्डीचा करगोटा झालेला अशा अवस्थेत चड्डी घातल्यानंतर एखाद्या विजयी योद्ध्याच्या आवेशात तो एवढासा गोंद्या बाहेर निघून जातो. हा संपूर्ण व्हिडीयो इतका निरागस, गोड आहे ना, की कितींदा पाहीली तरी पुन्हा पाहावासा वाटतो. हा व्हिडीयो भिडतो अशासाठी, की आपण सर्वच जणांनी लहानपणी तशी चड्डी घालण्याची खटपट करून ती एकाच पायात घातलेली असते. आपण पुन्हा लहान झाल्याची अनुभुती तो व्हिडीयो देतो आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो.
हा व्हिडीयो आणि त्यावरचं माझं ‘नागडे..’ हे भाष्य व्हाट्सअॅपवर मी माझ्या मित्रांना पाठवलं होतं. दुर्दैवाने फेसबुक ‘लहान मुलांच्य् नग्नते’ला सपोर्ट करत नाही अशी ‘वाॅर्निंग’ देऊन मला तो व्हिडीयो आणि माझं भाष्य फे.बु.वर पोस्ट करण्यापासून पोखलं गेलं आणि तिन अधिक तिन, असे सहा दिवस फेसबुक वर्गाच्या बाहेर उभं राहाण्याची शिक्षा देण्यात आली. पूर्ण वाढलेल्या स्त्री-पुरुषांचे नग्न मोर्चे, स्पर्धा आणि मेळावे आयोजित करणाऱ्या आणि तसे फोटो फेसबुकवर शेअर करणाऱ्या अमेरीकेतील फेसबुकला, दिड-दोन वर्षाच्या त्या निरागस नग्नतेत काय अश्लील दिसलं कुणास ठाऊक..! आता हे आॅब्जेक्शन त्यांचं होतं की ही कुणी जी ‘भारतीय सोसायटी’ आहे, तिचं होतं हे समजणं अवघड आहे.
मित्रांनो, हा व्हिडीयो मला फेसबुकला पोस्ट करता येत नाहीय, पण त्यावरील माझं ‘नागडे..’ हे भाष्य मात्र मी नक्की पोस्ट करतोय. ते वाचताना तुम्ही तो वर उल्लेख केलेला व्हिडीयो आपापल्या कल्पना शक्तीने पाहा अशी विनंती करतो आणि थांबतो.
/articles/maan-ki-baat-nagade/
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply