हे कुटुंब तब्बल 32 जणांचे.. स्वतः जगतात,आणि आपल्या शेतीलाही मस्त जगवतात. आजच्या शहरी विभक्त कुटुंबपद्धतीत आदर्श ..
कोल्हापूरतील हे कुटुंब तब्बल 32 जणांचे आहे. साबण, मीठ आणि चहापावडर या तीनच वस्तू ते विकत आणतात. बाकी तीळ, खसखसपासून ते वर्षभर पुरेल एवढ्या भाज्या, फळे, तेल, धान्य, डाळी ते शेतात पिकवतात. आवळ्यापासून फणसापर्यंत सगळ्या फळांचा मनसोक्त आस्वाद घेतात. बहुतेक पिकांसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे हिरव्यागार टवटवीत भाज्या आहारात रोज वापरतात. सांगायची गोष्ट एवढीच, की घरातले सगळे मनापासून शेतावर राबतात आणि आनंदी, आरोग्यदायी जीवन जगतात.
कोगे (ता. करवीर) येथील लहू सावबा मोरे यांच्या कुटुंबाची ही ताजी टवटवीत करणारी एक कथाच आहे. करवीर तालुका तसा शेतीच्या दृष्टीने सधन. मोरे कुटुंबाचीही साधारण 12 एकर जमीन. सगळा नुसता ऊस लावला तरी वर्षभर व्यवस्थित जगू शकणारं हे कुटुंब. पण, शेतीत स्वतः राबून, नवे प्रयोग करून विविध पिकं पिकवण्याचा या कुटुंबाला ध्यास. त्यामुळे केवळ उसावर भर न देता त्यांनी वेगवेगळ्या पिकांवर भर दिला आणि बाहेरून घरात फारसं विकत आणावयास लागू नये, हा मनातला विचार प्रत्यक्ष त्यांच्या शेतात रुजायला लागला.
शेतात त्यांनी जरूर ऊस लावला; पण गहू, बाजरी, तांदूळ, तूर, मूग, उडीद, कुळीथ, मटकी ही धान्यं, कडधान्यं लावली. कोबी, फ्लॉवर, वांगी, मिरची, श्रावण घेवडा, भेंडी, ढबू मिरची, गवार, वरणा, चवळी, पालक, मेथी, पोकळा, कोथिंबीर, शेवगा या भाज्यांची सरीत जणू रांगच धरली. काकडी, दुधी भोपळा, दोडका यांचे वेल छपरावर चढू लागले आणि केळी, पपई, कलिंगड, संत्री, डाळिंब, रामफळ, सीताफळ, काजू, चिकू, आंबा, आवळा, जांभूळ, मोट आवळा, पेरू या फळांनी शेत सजू लागलं.
आरोग्याला पूरक म्हणून गवती चहा, नील तुळस, कापूर तुळस, कृष्णा तुळस, आडुळसा, आले, पुदिना, कोरफड, चंदन, बेल, ओवाही शेतात डोलू लागला. गुलाब, शेवंती, झेंडू, चाफ्याच्या फुलांचा दरवळ शिवारात पसरू लागला. दोनदोनशे फणस लगडलेलं झाड तर सेल्फी पॉइंट ठरू लागलं. हे झालं शाकाहारी.
पण विहिरीत राहू, करला व गृगळ या तीन जातींचे मासे सोडले. गळ टाकला की मासा मिळू लागला. शाकाहाराचा कंटाळा आला, की गोबर गॅसवर मासा रटरटू लागला. मासा नको असेल तर घरातल्याच ५० गावठी व १५ कडकनाथ कोंबड्यांपैकी दोघी-तिघींचा नंबर लागू लागला. गावठी कोंबडीच्या अंड्यांचा रस्सा अडीनडीला उपयोगी पडू लागला.
या कुटुंबात शेतातील सूर्यफुलाचं तेल वापरतात. नारळापासून खोबरेल तेल गाळून आणतात. बाकी साबण, मीठ व चहापावडर सोडून सगळं शेतातून मिळत असल्याने सात्त्विक वैविध्यपूर्ण फळं, भाज्या, पालेभाज्यांचा वापर नित्य करतात. दोन झाडांना इतके आंबे लागतात, की घरातली पोरं आंबा खाऊन कंटाळतात. हे सारं घरात वापरून इतर धान्य, फळं, भाज्या, पालेभाज्या रोज बाजारात विकतात. सणाच्या काळात एक एकरात झेंडू फुलवतात. दोन म्हशी, दोन देशी गायी, एक जर्सी गाय यांचं दूध घरात ठेवून उरलेलं डेअरीला घालतात. त्यासोबत चार खोंडं सांभाळतात आणि कालबाह्य ठरत चाललेली सर्व शेतीची अवजारं शेतात वापरतात.
शेतीलाही जगवतात…लहू मोरे व त्यांच्या पत्नी मालूबाई या साऱ्यावर देखरेख ठेवतात. शिवाजी, अलका, तानाजी, छाया, संभाजी, रूपाली, दत्तात्रेय, दीपाली व ज्योती, यश, किरण, श्रद्धा, धनश्री, संकेत, राजवर्धन, हर्षवर्धन ही सर्व मुलं आपापलं शिक्षण सांभाळून शेतात राबतात. आपण जगतात आणि शेतीलाही मस्तपैकी जगवतात.
— संतोष द पाटील
Leave a Reply