मौसमी चॅटर्जी यांचे खरे नाव इंदिरा. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९४८ रोजी झाला. १९६७ मध्ये बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांच्या बालिका वधू या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर १९७२ मध्ये रिलीज झालेल्या ‘अनुराग’ या सिनेमाद्वारे मौसमी यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. ‘कच्चे धागे’, ‘जहरीला इंसान’, ‘स्वर्ग नरक’, ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’, ‘मांग भरो सजना’, ‘दासी’, ‘अंगूर’, ‘घर एक मंदिर’, ‘जल्लाद’ हे त्यांचे काही निवडक गाजलेले सिनेमे आहेत. मौसमी आणि विनोद मेहरा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. याशिवाय जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मौसमी यांनी काम केले. मा.मौसमी चॅटर्जी या प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांच्या सुनबाई. मौसमी चॅटर्जी यांच्याविषयी म्हटले जाते की, रडण्याचे दृश्य त्या अगदी सहज करायच्या. यासाठी त्यांना ग्लिसरीनची आवश्यकता भासत नव्हती. याविषयी त्या एका मुलाखतीत म्हणतात, ”होय हे खरं आहे. हे देवाने दिलेले एक वरदान आहे. जेव्हाही मी रडण्याचे दृश्य करायची, तेव्हा ती घटना आपल्यासोबत प्रत्यक्षात घडतेय असं मला वाटायचं, त्यामुळे आपोआप डोळ्यात अश्रू तरळायचे.” मौसमी चॅटर्जी यांची मुलगी मेघा चॅटर्जीही रुपेरी पडद्यावर आली आहे. ‘रुसलान’ या चित्रपटाद्वारे ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply