“बोला अमृत बोला…‘, “आला खुशीत समिंदर…‘ “क्षण आला भाग्याचा…‘ यांसारख्या मधाळ गीतांनी एकेकाळी मराठी रसिकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणार्या ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर. त्यांचा जन्म दि ११ मे १९१४ रोजी झाला. बालपणापासून त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती. ज्योत्स्ना भोळे यांना रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळाला. ज्योत्स्नाबाईंना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती.
वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी प्रथम ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकात भूमिका केली. या नाटकाचा प्रथम प्रयोग दि. १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. या नाटकात त्यांनी नायिकेची म्हणजेच बिंबाची भूमिका केली.या नाटकाचे मुंबई व पुणे येथे शंभराहूनअधिक प्रयोग झाले. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. विवाहानंतर १९३३ साली त्यांचे पती केशवराव भोळे यांनी ‘नाट्यमन्वंतर’ ही संस्था काढली. या संस्थेने अनेक नाटकांचे प्रयोग केले. ‘अलंकार’ नाटकात वत्सलेची, ‘आराधना’त देवकीची, ‘आशिर्वाद’मधील सुमित्रा, ‘एक होता म्हातारा’तील उमा, ‘कुलवधू’ मधील भानुती, ‘कोणे एके काळी’ मधील कल्याणी, ‘धाकटी आई’ मधील वीणा,‘भूमिकन्या सीता’मधील सीता, ‘रंभा’तील सुगंधा, ‘राधामाई’ मधील राधा तर‘ विद्याहरण’ मधील देवयानी अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. या नाटकातील पदे त्यांनी गाऊन अजरामर केली.
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी शिवाजीपार्क येथे झालेल्या कार्यक़्रमात त्यांनी कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रियअमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे गीत गाऊन एक इतिहासच रचला. यागीताला शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केले. या गीताने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण भारावले.ज्योत्स्नाबाईंना अभिनय, गायन याबरोबर साहित्याचीही आवड होती.त्यांनी ‘आराधना’ या नाटकाचे लेखन केले. त्या अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कल्चरलसेंटर’च्या अध्यक्षा होत्या. १९९९ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘लतामंगेशकर पुरस्कार’ तर पुणे महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’असे अनेक पुरस्कार मिळाले. अनुबंध प्रकाशन या संस्थेने त्यांचे आत्मचरित्र ‘तुची ज्योत्स्ना भोळे’ हे प्रकाशित केले आहे. मा. ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ज्योत्स्ना भोळे यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=ytNtDJ9Yq38
Leave a Reply