हिराबाई बडोदेकर यांचा जन्म ३० मे १९०५ रोजी झाला. हिराबाई ज्या अब्दुल करीम खाँ आणि ताराबाई माने यांची मुलगी. त्यांचा जन्म मिरज येथे झाला. सुरेशबाबू , हिराबाई , कृष्णराव , कमलाबाई आणि सरस्वतीबाई ही पाच भावंडे. ताराबाई माने यांची आई हिराबाई माने . त्या बडोदे सरकरांच्या सेवेत होत्या. ही पाचही भावंडे संगीताचा वारसा घेऊन जन्माला आली. ताराबाई आणि अब्दुल करीम खाँ १९२२ मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले. त्यानंतर ताराबाई यांनी आपल्या पाचही मुलांची नावे बदलली आणि नावापुढे बडोदेकर हे आडनाव लावले.
हिराबाई यांना लहापणापासूनच संगीताची विशेष आवड होती. परंतु आपल्या मुलींनी शिकून समाजात नाव कमावावे असे ताराबाई यांना वाटत होते. परंतु एक ज्योतिषाने हिराबाई यांचा हात बघून सांगितले ही मुल्गी गाण्यात नाव कमावेल असे सांगितल्यावर ताराबाई हिराबाई यांना गाणे शिकवयाला तयार झाल्या. पुण्यामधील हुजूरपागा शाळेत हिराबाई सातवीपर्यंत शिकल्या. सुरुवातीला आपले वडील बंधू सुरेश माने यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. तर त्यानंतर अतिशय शिस्तीचे, कडक आणि संगीतातले मातब्बर अशा वहीद खाँ सारख्या गुरुंकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. रियाझ आणि प्रचंड मेहनत यामुळे मुळातच चांगला असलेला आवाज दिवसेंदिवस सुरेल झाला.
ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचे वास्तव्य फक्त माडीवरच असे , अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.
हिराबाई वयाच्या तेराव्या वर्षांपासून सुरेशबाबू यांच्याबरोबर खाजगी बैठकीत गात होत्या. वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजे १९२१ साली त्यांचे पाहिले जाहीर गाणे गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेत झाले. त्या मैफलीमध्ये त्यांनी राग पटदीप असा गायला की पुढे राग पथदीप गाव तो हिराबाई यांनीच असे ठरूनच गेले. ताराबाई यांनी १९२१ साली अर्थार्जनासाठी ‘ नूतन संगीत महाविद्यालय ‘ सुरु केले तेथेही हिराबाई शिकवत होत्या.
हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये. रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. पूर्वी त्या मुख्यत: मुंबई केंद्रावरून गात असत. परंतु पुढे साखळी कार्यक्रमाची पध्दत रूढ झाल्यावर हिंदुस्थानातील बहुतेक सर्व आकाशवाणी केंद्रावरून त्यांचे कार्यक्रम झाले. डॉ.बी.व्ही.केसकर यांनी शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी संगीताचे राष्ट्रीय कार्यक्रम सादर करण्याची प्रथा सुरू केल्यानंतर राष्ट्रीय कार्यक्रमातही गाण्याचा मान त्यांना अनेकदा मिळाला आहे. पंचेचाळीस वर्षात हिराबाई कोणत्या केंद्रावरून किती वेळा गायल्या असतील याची मोजदाद करणे कठीण आहे.
आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे २ ऑक्टोंबर १९५३ रोजी झाले त्या दिवशी प्रेक्षपित झालेल्या पहिल्या कार्यक्रमात गाण्याचा मान हिराबाईंना मिळाला. त्या रात्री हिराबाईंखेरीज पं. विनायक पटवर्धन यांची भजने, शंकरराव गायकवाड आणि मंडळीचे शहनाईवादन, कवी यशवंत यांचे काव्यवाचन, खासदार पी.आर.कानवडे यांचे भजन आणि शाहीर नानिवडेकर यांचे पोवाडे असे कार्यक्रम झाले. आकाशवाणीला पन्नास वर्षे पुरी झाली म्हणून १९७७ मध्ये आकाशवाणीने आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला. प्रभावी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे परंतू त्यामुळे आजच्या पिढीत त्यांची गाणी रसिक आवर्जून ऐकू शकतात . हिराबाई बडोदेकर ख्याल, ठुमरी, मराठी नाट्य संगीत, भजन मध्ये तज्ञ होत्या. त्यांना लोकांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत. त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होता . हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचे काम केले. हिराबाई बडोदेकर यांनी ‘ सुवर्णा मंदिर ‘ , प्रतिभा ‘ , ‘ जनाबाई ‘ अशा अनेक चित्रपटात अभिनय केला. हिराबाई ह्या फार लवकरच्या कारकिर्दीत रेकॉर्डिंग कलाकार झाल्या. ध्वनिमुद्रिकांच्या द्वारे आणि रेडिओवर नित्यनियमाने होणा-या कार्यक्रमांमुळे हिराबाई खूपच लोकप्रिय झाल्या.
त्यांच्या सुरेल आवाजातील शास्त्रीय संगीताच्या बैठकीना प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्याकाळी हिराबाईंच्या रूपाने स्त्रियांसाठी एक नवी वाट मोकळी झाली म्हणजेच आपल्या गायकीनी त्यांनी त्यावेळी क्रांती घडवून आणली. बालगंधर्वांनी सुद्धा हिराबाईंच्या गाण्याला, त्यांच्या सात्विक सूराला गौरविले होते. हिराबाईंनी गायलेली, राधेकृष्ण बोल, उपवनी गात कोकिळा, ब्रिजलाला गडे ही अविट गोडीची पदे सर्वतोमुखी झाली होती . बालगंधर्वांनी सुद्धा हिराबाईंच्या गाण्याला, त्यांच्या सात्विक सूराला गौरविले होते. लक्ष्मीबाई जाधव, गंगूबाई हनगल, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, द. वि. पलुस्कर, राम मराठे, वसंतराव देशपांडे या सर्वानी भावगीत आपलेसे केले. याच मालिकेतले महत्त्वाचे नाव म्हणजे गायिका हिराबाई बडोदेकरअसे होते.
गीतकार वसंत शांताराम देसाई १९२५ या वर्षी हिराबाईंचे गाणे ऐकण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्या कार्यक्रमानिमित्ताने बाहेर गेल्या होत्या. काही वेळाने त्या घरी आल्या. त्यानंतर त्यांना गायला कसे सांगावे या विचारात असताना ‘ पुन्हा गाते ’ असे त्याच म्हणाल्या. तानपुरा घेतला व दोन तास गाणे ऐकविले. याच देसाईंनी ‘उपवनी गात कोकिळा’, ‘सखे मी मुरारी वनी पाहिला’ आणि ‘धन्य जन्म जाहला’ ही पदे हिराबाईंना लिहून दिली. त्यातल्या उपवनी गात.. या भावपदाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. शब्द वसंत शांताराम देसाई यांचे आणि मास्टर दिनकरांची मदत घेऊन चालही त्यांनीच केली. हे भावगीत इतके लोकप्रिय झाले की महाराष्ट्रातील प्रत्येक गायक हे गीत गाऊ लागला. स्वत: गायिकेने आपल्या जलशांतून नाटय़पदासह काही पदे गायला सुरुवात केल्यावर ‘उपवनी गात कोकिळा’ या गाण्याची हमखास फर्माईश होई. त्या काळात हिराबाईंनी हे गीत गायले नाही असा एकही कार्यक्रम नसेल. पंडित भीमसेन जोशी सांगायचे, ‘ वधुपरीक्षेला आलेल्या मुलीला गाण्याचा आग्रह झाला की ती ‘ उपवनी गात कोकिळा ’ हे गीत गायची आणि त्यामुळे मुलगी पसंत व्हायची ‘
२१ डिसेंबर १९२१ या दिवशी पं. पलुस्कर यांच्या आग्रहाखातर हिराबाईंनी गायनाचा पहिला कार्यक्रम सादर केला. त्यानंतर जवळजवळ तीन पिढय़ांसाठी त्या गात राहिल्या. आपल्या गायनाच्या कार्यक्रमाला तिकीट लावून सादरीकरण करणाऱ्या हिराबाई या पहिल्या गायिका असे म्हणता येईल. तसेच सरस्वती राणे या आपल्या भगिनीसमवेत शास्त्रीय गायनाची जुगलबंदी सादर करणाऱ्या हिराबाई या पहिल्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत. त्या काळात हिराबाईंनी ठरवले, की शांतपणे बैठकीवर बसून, हातवारे न करता, शिस्तीने सादर केलेले गाणे ऐकायची श्रोत्यांना सवय लावायची आणि स्त्रियांच्या शालीन गान-मैफलीचा पायंडा पाडायचा. भारतीय संगीताला मिळालेली ही मोठी देणगी आहे. नाटयसंगीताच्या हिराबाईंच्या सुमारे ४८ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या, चित्रपटसंगीताच्या अवघ्या तीनच ध्वनिमुद्रिका निघाल्या. शास्त्रीय संगीताच्या सुमारे चाळीस ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. तसेच ‘ राधेकृष्ण बोल ’, ‘गिरीधर गोपाला ’ , ‘ पायोरे मैने ’ , ‘ चाकर राखोजी ’, यासारखी भजने आहेत. पाच ठुम-या आहेत तर, ‘ किस कदर है ’, ‘ या आकर हुआ मेहमान ’, या गझला आहेत. हिराबाईंचा भैरवी हा आवडता राग होता. १९७० पर्यंत हिराबाईंच्या सुमारे १७५ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या होत्या . १९२९ मध्ये तेव्हा रेडिओ सुरू होऊन १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. ध्वनीमुद्रिका आणि आकाशवाणी ही दोन प्रभावी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे हिराबाईंच्या सुरेल गाणे भारतभर माहीत झाले आजच्या पिढीत त्यांची गाणी रसिक आवर्जून ऐकतात.
हिराबाई बडोदेकर याना अनेक मानसन्मान मिळाले वयाच्या एकविसाव्या वर्षीच त्यांना किर्लोस्कर थिएटरमध्ये झालेल्या जलशामध्ये सर चुनीलाल मेहता यांनी त्यांना ‘ गानहिरा ‘ ही पदवी दिली. १५ ऑगस्ट १९४७ साली पहिल्या त्यांना राष्ट्रगीत गायला आकाशवाणीने आमंत्रित केले होते , संगीत नाटक अकादमी पुरस्कार , बालगंधर्व सुवर्ण पदक , विष्णुदास भावे सुवर्णपदक असे अनेक सन्मान त्यांना मिळाले तर भारत सरकारने पदमभूषण देऊन त्यांचा सन्मान केला होता.
अशा ‘ गानहिरा हिराबाई बडोदेकर ‘ यांचे २० नोव्हेंबर १९८९ वयाचा ८४ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply