नवीन लेखन...

माया नगरीची एक साक्षीदार 

जे.जे. चा अप्लाईड आर्ट मधून पासआऊट होऊन वर्ष दिड वर्षे झाले असावे. नांदेडला माझ्या मोठ्या बंधूच्या घरा शेजारी गिरिश नार्वेकर नावाचे महाराष्ट्र शासनातील अधिकारी रहात असत. कला साहित्य सामाजिक क्षेत्रातील आवड त्यामुळे चांगला घरोबा होता. एकदा घरी आले असतानां त्यांनी माझी चौकशी केली व मला म्हणाले- ‘’ तू जे.जे.चा विद्यार्थी मग इथे काय करतोस.? माझ्या बरोबर एकदा मुंबईल ये माझ्या लहान भावाची ओळख करून देतो, तुला काही काम मिळू शकेल.’’ दिवाळीच्या सुट्ट्यात ते मुंबईला त्यांच्या कुटूंबा सोबत मलाही घेऊन् गेले. वरळी नाक्यावरील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एक लहानशा चाळीत ते मला घेऊन गेले. गोरा वर्ण, चेहऱ्यावर दाढी,पांढरा शुभ्र झब्बा आणि काळी पँट अश वेषातल्या एका तरूणाला मी नमस्कार केला. गिरिशभाऊ त्या तरूणास म्हणाले- “चंदू…हा माझ्या नांदेडच्या मित्राचा भाऊ दासू, जे.जे. मधून पास आऊट झालाय, काही काम मिळत असेल तर बघ त्याच्यासाठी !!! “ मग चंदूभाऊनी माझी विचारपूस केली. टायपोग्राफी हा माझा विषय सोडला तर माझ्या जवळ असलेला शून्य अनुभव त्यांच्या लक्षात आला. मला म्हणाले- “चल माझ्या सोबत.’’

वरळी नाक्या वरून महालक्ष्मी स्टेशनकडे जाणाऱ्या डबल डेकरमध्ये आम्ही बसलो. पाच सात मिनिटात उतरलो. ती दोन मजली इमारत बाहेरून काही विशेष जाणवली नाही. आम्ही दोघे जिने चढून वर गेलो. वर जातानां काही जण डोक्यावर पत्र्याची चौकोनी पेटी घेऊन वर खाली जातानां दिसले. ही पेटी माझ्या परीचयाची होती. आमच्या शहरात अशाच पेटीतुन सिनेमांची रिळे येत असत. इमारतीच्या आत मात्र चांगलीच वर्दळ दिसत होती. प्रत्येकजण आपल्याच तोऱ्यात असल्या सारखा जाणवत होता. या इमारतीत लहान लहान ऑफिसेसची भरमार होती. मंत्रालयाच्या इमारतीत जशी केबीनची रांग असते तशी. यातल्या एका केबीनमध्ये आम्ही शिरलो. समोर एक उंच आणि किंचित टक्कल असलेल्या इसमाला चंदूभाऊ म्हणाले- “इसे कुछ काम हो तो दिजीए. जे.जे.का स्टुडन्ट है “ मग त्या इसमाने मला आत नेले. मोट्या आकाराचे दोन तीन अल्बम माझ्या समोर ठेवले व म्हणाले- इसे अच्छी तरहसे देख लो. मुवी टायटल्स कैसे लिखे जाते है उसके ये सॅम्पल है.’’ आणि मी वेड्या सारख ते अल्बम चाळत बसलो. त्यात ६० च्या दशकातल्या अनेक चित्रपटाचे टायटल्स होते. काळ्या कागदावर फक्त पांढऱ्या रंगाने नावे लिहायची. खाडाखोड वा टचिंग करायला वावच नव्हता. कारण यातील बारीकशी चूक पण पडद्यावर भली मोठी दिसणार. खरोखर अप्रतिम अल्बम होते सर्व. अत्यंत सफाईदार व वळणदार अक्षरे…मला ज्यांनी हे अल्बम बघायला दिले त्यांचे नाव मलिक साहेब. चित्रपटसृष्टीतले नामवंत नामाकंन तज्ज्ञ मलिक ब्रदर्सचे मालक. जर तुम्ही जुने चित्रपट बघण्याचे शौकिन असाल तर नामावळीत टायटल्स या मथळ्याखाली मलिक ब्रदर्स हे नाव नक्की दिसेल.

मग मलिकभाई या इमारती मधील एका चित्रपट पब्लिसिटी स्टुडिओत घेऊन गेले. ‘सेल वेल’ नावाच्या या स्टुडिओत मला ९०० रू. महिना पगारावर काम मिळाले. ज्या चंदूभाऊमुळे मला काम मिळाले ते प्रसिद्ध एन.चंद्रा होत. नंतर मला त्यांच्या अंकुश या चित्रपट निर्मितीचा साक्षीदार होता आले. नंतर सविस्तरपणे यावर मी स्वतंत्रपणे लेख लिहीणार आहेच. अनेक चित्रपटात मी ‘फेमस स्टुडिओ’ हे नाव वाचत आलो होतो त्याच इमारतीतल्या एका केबीन मध्ये मी काम करत होतो. मुंबईतली अख्खी चित्रपट नगरी या इमारतीला ओळखत असे. याच इमारतीत त्यावेळच्या जवळपास सर्वच निर्माते, वितरक, प्रॉडक्शन, संकलक, लेखक वगैरेचे कार्यालये होते. दिवसरात्र ही इमारत गजबजलेली असे. इथे कुणीच कधी रिकामटेकडा बसलेला दिसत नसे. याच इमारतीतल्या संकलन रूममध्ये तासनतास बसून चंद्राजीने अंकूश संकलीत केला होता. संकलनाचे काम किती किचकट व डोळेफोड असते ते मी प्रत्यक्ष बघितले होते. याच ठिकाणी एकदा अनिल कपूरचे मोठे भाऊ टोनी कपूर आले होते. त्यावेळी चंद्राजी यांच्या डोक्यात तेजाब होता आणि त्यांना तो अनिल कपूर यांना घेऊन करायचा होता. आणि त्यांनी तो केला देखिल. याच ठिकाणी मी देवेन वर्मा या हास्य कलाकाराशी चक्क १० मिनीटे गप्पा मारल्या होत्या. अगदी साधेपणाने कोणताच आव न आणता ते बोलत होते. याच ठिकाणी मी जोगेंदर नावाच्या खल नायकास अत्यंत खालच्या भाषेत बोलतानां ऐकले. याच इमारतीतल्या मिनी स्टुडिओत अनेक चित्रपटांचे रशेश होत ते ही बघता आले….या इमारतीचा माहोलच काही और होता. ही इमारत फक्त दगड विटांची नव्हती तर अनेकांची स्वप्नं साकार करणारी चित्रपटमायच होती. आम्ही रूपेरी पडद्यावर फक्त काही चेहरे बघत असतो जे अभिनय करत असतात, ते आमच्या कायम लक्षात राहतात पण या इमारतीत काम करणारे कुणीही अभिनय करणारे नव्हते तर प्रत्यक्ष कामच करणारे होते. याच इमारतीत माझा अनेक शब्दांशी परिचय झाला. फोर शिटर्स, सिक्स शिटर्सचे कसे डिझाईन करायचे ते इथेच समजले. ऑप्टीकल इफेक्टस्, क्रोमो, चिटींग, पासिंग शॉट्स, क्लॅपर, क्रेन, ट्रॉली, डबींग, निगेटीव्ह कटींग, साऊंड ट्रॅक, कॅमेरा रोलिंग, अक्शन……किती किती पसारा असतो हा. २ तासाचा चित्रपट करताना किती लोक यासाठी झटत असतात ते याच इमारतीत मी अनुभवले…..ही इमारत कधीच झोप घेत नसे. काही कार्यालये वगळता रात्रभर काहीना काम चालूच असे.

जवळपास वर्षभर मी ही या इमारतीचा एक अंश होतो. खूप मन रमायचे इथे. कोणता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याच्या चर्चा रंगत असत. अमूक तमूक चित्रपट सिल्व्हर वा गोल्डन ज्युबिली कसा होईल यावर बेटींग चालायची. साफसाफाई करणाऱ्या पोरांच्या डोळ्यात पण ही इमारत भावी स्वप्ने दाखवत असे. चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या विश्वात पोहचण्याचा हाच तो रस्ता आहे असे इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटायचे. अशा इमारती इतिहासाची साक्ष देणाऱ्या असतात. त्यांच्या मूक भिंतीने खूप काही बघितलेले असते. आता या इमारतमध्ये काय आहे हे मला माहित नाही. ही इमारत ३२५ कोटीला विकली गेली असे वाचल्याचे आठवते. मात्र या इमारतीचे अत्यंत गहीरे छायाचित्र माझ्या मनात कायम कोरले गेले…..गेले अनेक दिवस चित्रपटसृष्टीतील कलावंतावर लिहीत असतानां ही इमारत मध्येच डोकावत असे…म्हणून आज लिहले.

दासू भगत.. (१५ जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..