अहमद जान तिरखवाँ खान यांचा जन्म १८९२ सालात झाला.
अहमद जान तिरखवाँ खान हे तबल्यावर ‘धिरक..धिरक’ असे बोल अत्यंत द्रुतलयीत व स्वच्छ रीतीने वाजवीत. ते ऐकून उस्ताद कालेखाँ यांनी त्यांना धिरकवाँ (तिरखवाँ) हे नाव दिले. आपले वडील प्रसिद्ध सारंगीवादक उस्ताद हुसेनबक्ष यांच्याकडे संगीताचे प्राथमिक धडे घेतलेल्या तिरखवाँनी उस्ताद मुनीरखाँ यांच्याकडे सुमारे २५ वर्षे तबलावादनाचे शिक्षण घेतले. तबलावादनाचे विविध बारकावे, विविध शैली आत्मसात केल्या.
पुढे १९२८ च्या सुमारास भास्करबुवा बखले यांनी त्यांना महाराष्ट्रात आणले. त्यानंतरची दहा वर्षे ते गंधर्व नाटक मंडळीत होते. बालगंधर्वाचा सुरेल आवाज आणि तिरखवाँची भावनाकूल अशी सुसंवादी साथ यांमुळे नाटकातील पदे रंगून जात. बालगंधर्वानी त्यांना खरी लोकप्रियता मिळवून दिली. पुढे ते लखनौच्या भातखंडे विद्यालयात तबलावादनाचे प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले.
तबल्याला मैफलीत गवयाप्रमाणे मध्यवर्ती स्थान प्राप्त करून देणाऱ्या आणि तबलवादनाच्या स्वतंत्र मैफली करून तबला या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या या कलावंताला १९७० मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा किताब दिला होता.
अहमद जान तिरखवाँ खान यांचे १३ जानेवारी १९७६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply