उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. अशा वातावरणात शहरयार यांना शायरीची गोडी कशी लागली याचे अनेकांना आश्चर्य वाटते. त्यांचे शिक्षण बुलंदशहर आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठात झाले. अंजुमन तरक्की ए उर्दू या संस्थेत त्यांनी कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ते अलिगड मुस्लीम विद्यापीठात उर्दूचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथेच ते उर्दूचे विभागप्रमुख म्हणून सेवा निवृत्त झाले. जेव्हा उर्दू साहित्यात नवतेची आणि आधुनिकतेची लाट आली होती, त्याच काळात शहरयार यांनी उर्दू साहित्यलेखनात प्रवेश केला. त्यांचे अनेक समकालीन काळाच्या ओघात बाजूला पडले, पण शहरयार यांनी नव्या पिढीलाही आपल्या शायरीची भुरळ घातली. उमराव जान या चित्रपटासाठी त्यांनी लिहीलेल्या ‘दिल चीज क्या है आप मेरी…’, ‘यह क्या जगह है दोस्तो’, ‘इन आँखो की मस्ती में’ या गझला आजरामर ठरल्या. त्यांनी बॉलीवूडमध्ये गमन, अंजुमन यासह अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांच्या अभिजात दर्जामुळे चित्रपट गीतेही चिरस्मरणीय ठरली. ख्वाब का दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८७ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांचे इस्मे आजम, सातवाँ दर आणि हिज्र के मौसम हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. २००८ साली ख्वाब के दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शहरयार यांचे निधन १३ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply