जन्म.८ ऑक्टोबर १९३२ साली कर्नाटकातील ओणिमजालू नावाच्या एका छोट्याशा गावी.
वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी जगन्नाथ शेट्टी कर्नाटक सोडून काकांसोबत कल्याण येथे आले होते. दरमहा अवघ्या तीन रुपयांच्या पगारावर त्यांनी नोकरीला सुरूवात केली होती.त्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी १९४९ साली जगन्नाथ शेट्टी पुण्यात आले आणि हॉटेल वैशाली मध्ये काम करण्यास सुरूवात केली. हॉटेल आपलं स्वत:चं असल्यासारखं ते मेहनत घेऊन काम करत होते. पहाटे पासुन ते रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये सर्व कामं ते पाहात असत.त्यांनी १९५१ मध्ये ‘कॅफे मद्रास’ हे रेस्टॉरंट सुरू केले. त्यानंतर मद्रास हेल्थ होम व वैशाली हॉटेल सुरू केले.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर असलेले वैशाली हॉटेल त्यांनी नावारुपाला आणलं. वैशाली हॉटेल हे पुणेकरांना अभिमान वाटावा असं हे खाद्यपीठं आहे. कॉफी आणि सांबार ही दोन इथली आकर्षण आहेत. अस्सल पुणेकर इथं खाण्यासाठी तर जातातच पण गप्पांसाठीही जातात. दर रविवारी किंवा दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ‘वैशाली वर भेटणारे अनेक गट आहेत. हे गट महाविद्यालयीन तरुणांचे, मध्यमवयीन नोकरदार महिलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचेही आहेत. ‘गेली चाळीस वर्ष आम्ही ‘वैशाली’वर रोज भेटतो.’ असं सांगणारे पुणेकर फर्ग्युसन रस्त्यावर हमखास भेटतात.
खाणं, गप्पा आणि टाईमपास यासाठीचे अड्डे म्हणून ‘वैशाली’ची ओळख तयार झाली आहे. पण ती पुण्यापुरती मर्यादित नाही. मुंबई, दिल्ली किंवा परदेशातून आलेली माणसंही ‘वैशाली’मध्ये डोकावायला विसरत नाहीत. बाहेरच्या मंडळींना दगडूशेठचा गणपती, चितळ्यांची बाकरवडी आणि ‘वैशाली चा सांबार ही त्रिसूत्री पूर्ण केल्याशिवाय पुण्याची भेट पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. पुण्याला देशात आणि जगात अशी चवदार ओळख मिळवून देण्यात या उपहारगृहाचे सर्वेसर्वो जगन्नाथ शेट्टी यांचा सिंहाचा वाटा होता. ते स्वतः, त्यांचे स्वयंपाकी आणि इतर कर्मचाऱ्यांनी गुणवत्ता आणि सेवा यांचा दर्जा वर्षानुवर्षे राखला होता.
हॉटेल वैशालीला पुणे महापालिकेकडून ‘क्लिनेस्ट किचन’ पुरस्कार देखील मिळाला आहे. २००० साली पुण्यातील त्रिदल संस्थेने त्यांना प्रतिष्ठित ‘पुण्यभूषण’ पुरस्कार देऊन गौरवले होते.
सामाजिक कार्यामध्येही जगन्नाथ शेट्टी यांचा नेहमीच पुढाकार असायचा. अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी मोलाची मदत केली होती. त्यांच्या दातृत्वाचा प्रत्यय करोनाच्या काळातही आला. गेल्या वर्षी एप्रिल मध्ये मुख्यमंत्री मदतनिधीसाठी शेट्टी यांनी तब्बल १ कोटी रुपयांची मदत केली होती.
जगन्नाथ शेट्टी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Leave a Reply