आजपर्यंत, मला कळायला लागल्यापासून मी पंचावन्नहून अधिक दिवाळ्या पाहिलेल्या व अनुभवलेल्या आहेत.
अगदी लहान असताना आई-वडील व भावांसोबत गावी जात असे. मोठा भाऊ स्वतः आकाशकंदील करायचा व तो काकांच्या माडीच्या घरावर लावायचा. एकत्र कुटुंब असल्याने घरात मुलांची, बाया व माणसांची नेहमीच वर्दळ असायची.
दिवाळीच्या आधीपासून प्रत्येक घरात फराळाचं करण्याची तयारी चालत असे. त्यावेळी शेव पाडून कळीचे लाडू केले जायचे. सुकं सारण भरलेली करंजी केली जायची. लाकडी सोरयाने चकली केली जात असे. शंकरपाळ्या, चिवडा, अनारसेही केले जायचे.
दिवाळी सुरु झाली की, सकाळीच एका ताटात हे सर्व पदार्थ दोघा-चौघांसाठी काढून दिले जायचे. चकली खाण्यावर माझा भर असायचा. करंजीमधील सुक्या सारणाची आतमध्ये घट्ट गोळा झाल्यामुळे करंजी कानाजवळ हालवली की, खुळखुळ्यासारखा आवाज यायचा. लाडू घट्ट वळल्यामुळे त्याच्यावर मुठीने आपटल्याशिवाय तो फुटत नसे.
दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत एकूण फराळापैकी करंज्या व लाडूच शिल्लक राहिलेले असायचे. पुण्याला येताना आजी लाडूंचा एक डबा भरुन देत असे..
काही वर्षांनंतर दिवाळीला गावी जाणं कमी झालं. सदाशिव पेठेत आईला दिवाळीचा फराळ करायला मी मदत करीत असे. मग कधी तो चकली करण्याचा प्रयत्न असे तर कधी करंज्या तळण्याची मदत असे. माझ्याकडून करंज्या तळताना त्या तांबूस झाल्यावर आई मला रागवायची. मला मात्र त्या तांबूस खुसखुशीत करंज्याच अधिक आवडत असत.. शंकरपाळ्या मला चहात बुडवून खायला मौज वाटते असे. चकलीच्या डब्यातील चकलीचे तुकडे पहिल्यांदा संपवले जायचे. नंतर पूर्ण चकली मिळे.
त्यावेळी वाड्यात रहात असल्यामुळे फराळाच्या डब्यांची देवाणघेवाण होत असे. आमच्याकडे येणाऱ्या मित्रांना, पाहुण्यांना फराळ दिला जात असे. रस्त्यावर झाडू काढणारी, सई तिच्या सासूपासून, आईच्या ओळखीची होती. सई व तिचा नवरा, नारायण यांना आई आठवणीने फराळाची पिशवी देत असे..
आमची लग्नं झाल्यावर आई-वडील दोघेही गावी राहू लागले. दिवाळीच्या फराळाची परंपरा चालूच राहिली. मला पाकशास्त्राची आवड असल्याने मी तो करण्यात सहभागी होऊ लागलो… लाकडी मोरया जाऊन तो मेट्रोचा सोरयाने चकली होऊ लागली. ओल्या खोबऱ्याच्या करंज्या होऊ लागल्या. कळीच्या लाडूंऐवजी रव्याचे व बेसनाचे लाडू केले जाऊ लागले..
आता मुलगा मोठा झाला. त्याचं लग्न झाल्यानंतर, त्या दोघी फराळाचं करु लागल्या. दिवाळी सुरु होताना फराळाची डिश समोर आल्यावर त्याचा आस्वाद घेणं, एवढंच काम राहिलं..
आता दिवाळीचा फराळ ताटावरुन डिशमध्ये सामावलेला आहे. लहानपणी जसे डबे धुंडाळले जायचे, ते आता करता येत नाही.. डाएटचा विचार करुन प्रमाणातच फराळ होतो..
चार दिवसांची दिवाळी होऊन गेल्यावर फराळाचे डबे हळूहळू रिकामे होऊ लागतात व राहिलेला पदार्थ जेवणाच्या ताटात आग्रहाने वाढला जातो… देवदिवाळी पर्यंत फराळ संपलेला असतो व राहतात त्या फक्त गोड आणि खुसखुशीत आठवणी…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३-११-२१.
Leave a Reply