ऐश्वर्या रॉय बच्चन यांना जेव्हा,मल्लिका ओबामा भेट वृत्त कळलं,तेव्हा त्यांच्या अंगांची लाही लाही झाली.इतकी की त्यांची गौर कांती काळीठिक्कर पडते की काय,अशी भीती निर्माण झाली.त्या स्वत:क्षणात सावध झाल्याने तसं होणं वाचलं.
त्यांचं असं म्हणणं पडलय की,हू इज धिस मल्लिका वल्लिका.मी तर मिस युनिर्व्हस म्हणजे जगत सुंदरी आहे.या सो काल्ड मल्लिकाला धारावीमध्ये उभी केली.तिथे मिस धारावी स्पर्धा घेतली तर हिचा पाचशेवाही नंबर लागणार नाही.ओबामांना गुप्त माहिती देणाऱ्या सीआयएला सुध्दा हे कळू शकत नाही का?याचा अर्थ आमच्या महाराष्ट्राची सीआयडीच बरी की.ओबामा जरा लक्ष द्या इकडे,सीआयएच्या बॉसला आमच्या महाराष्ट्रातल्या सीआयडी बॉसकडे ट्रेनिंगसाठी पाठवा.म्हणजे भविष्यात तरी अशा गफलती होणार नाही.
मल्लिका पन्नास वेळा न्युयार्कला गेली असेल तर मी पाचशे वेळा गेली की हो,न्युयार्क आणि लॉस एंजेलिसला.मल्लिकाच्या सोळा किसचं काय घेऊन बसलात.एव्हरी बडी नोज,राईट फ्रॉम विकू ओबेरॉय व्हाया अनिल कपूर टू मिस्टर सलमान खान यांच्या ओठांवर ओठ मी ठेवलय,त्याला काय चुंबन म्हणत नाही काय?शिवाय मिस युनिर्व्हसच्या ओठांमध्ये नि कशातच काही नसलेल्या मल्लिकाच्या ओठांमध्ये फरक करणार की नाही ओबामा तुम्ही?
मे बी,ओबामंाना,मल्लिकाच्या काही बिग गोष्टींनी भूरळ घातली असू शकते.अहो ,मी ओरिजनल बिग बीची बहू आहे की आता.कसं बाई होणार या ओबामांचं.असले निर्णय ते घेत राहिले तर,अमेरिका खड्यात नाही का जाणार.
मिसेस मिशेलना सुध्दा ,हू इज धिस मल्लिका हा प्रश्न पडायला नको होता का.पण पडला नाही.मल्लिकाने ब्लॅक मॅजिक तर केले नाही ना.ज्या अग्ली अँड पग्ली बाईला मर्डर करणं सोपं आहे,तिला ब्लॅक मॅजिक करायला कितीसं अशक्य.मला त्यांनी निमंत्रण दिलं असतं तर ,एखाद्या मिस युनिर्व्हसचा सन्मान करण्याचा पहिल्यांदाच मान व्हाईट हाऊसला मिळाला असता.जे पहिलं असतं,त्याची इतिहासात गौरवशाली नोंद होते.इतिहासात वाश्गिंटनच्या नंतर एकाही अमेरिकन राष्ट्रपतीची अशी गोैरवशाली नोंद झालीय का?ओबामांनी संधी दवडलीय हो.जाऊ दे.नशिबाचा भाग .त्यांच्या.खरं तर त्यांनी त्यांच्या हस्तरेषा बघून घ्यायला हव्यात आता.त्यामुळे भविष्यात तरी त्यांच्या हातून अशा काही गफलती होणार नाहीत.पां ना विचारते नि एखाद्या नामवंत हस्तरेषा तज्ज्ञांचा पत्ता ओबामांना कळवते.
एैश्वर्यांनी आपल्या मनाचं समाधान करुन घेतलं.समाधान खोटं होेतं,कारण वारंवार त्यांना प्रश्न पडतच होता की ,हू इज धिस मल्लिका..म्हणजे कोण लागून गेलीय ही उर्वशी की मेनका..
या प्रश्नाचं उत्तर मिळतय कां कुठे ,याच्या विचारमंथनात सध्या एैश्वया मग्न झाल्या आहेत.
सुष्मिता सेन ,यांनी मल्लिका-ओबामा भेटीकडे थंडपणे बघितले.त्यांनी एक निश्वास सोडला.बॉलिवूड मध्ये त्यांना आता कुणी विचारत नाही,भूमिका देत नाही.हे शल्य त्यांच्या मनात आहेच.मिस वर्ल्डचा इतिहास आता कुणाला आठवत नाही.त्यांच्या जीवनात अनेक पुरुष आले,पण त्यात एखादा अभिषेक बच्चन नसल्यामुळे,त्यांचे सारे अफेअर्स सुध्दा विस्मरणात गेले.चित्रपटांच्या दुनियेत त्यांचा ग्राफ घसरता असला तरी,मल्लिका-ओबामा भेट त्यांना पचनी नाही पडली.
त्यांनी स्वचिंतन केले की,ओबामांना,मल्लिका मध्ये काय क्वालिटी दिसली असेल.मी तर भूतकाळातील कां होईना मिस वर्ल्ड आहेना.मिस मल्लिका होण्यापेक्षा मिस वर्ल्ड होणं हे किती कठिण.एकदाचं अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचं इलेक्शन जिंकता येईल,पण मिस वर्ल्डचा किताब जिंकणं,एैऱ्यागैऱ्याचं काम नव्हेच ते.
मी ,मिस वर्ल्ड ,म्हणजे मी ,एैरी गैरी नाही.आय ऍ़म समथिंग स्पेशल.स्पेशल गोल्डन चहा नि आर्डनरी चहा यामध्ये जो फरक असतो , तोच फरक माझ्यात आणि मल्लिकात.मी जेम्स हेडली चेस असेल तर मल्लिका गुरुनाथ नाईक.मी गंगा नदी असेल तर मल्लिका मिठी नदी.मी न्युयार्क असेल तर मल्लिका फरिदाबाद.मी व्हाईट हाऊस असेल तर मल्लिका 2000चौरस फुटांचा फ्लॅट .मी प्लेबॉय मॅगेझिन असेल तर मल्लिका डेबोनेर मॅगेझिन.मी रविंद्रनाथ टागोरांची पोयट्री असेल तर मल्लिका आनंद बक्षींची फिल्मी गाणं.इतका जमीन अस्मानाचा फरक,आहे आमच्या दोघिंमध्ये.ओबामांना क्वालिटीचं काही ज्ञानच दिसत नाही.काय करणार?अमेरिकच्या नशिबाचं काही खरं नाही बुवा.ओबामांनी फेस रिडिंग करुन घेणंच बरं.कळवू या का त्यांना एखाद्या फेस रिडरचा पत्ता.
हा पत्ता पाठवायचा किंवा नाही याच्या विचारात सध्या सुष्मिता सेन गढून गेल्या आहेत.
श्रीदेवीचं म्हणणं पडलं की,आय ऍ़म ओल्ड ,आऊट डेटेड लेडी.मल्लिका इज न्यू एज लेडी.काळाचा महिमा.मी जर केनेडींच्या काळात असते,तर त्यांनी मर्लिन मनरोकडे ढुंकूनही बघितलं नसतं.मेबी,ओबामंाना मल्लिकामध्ये ,मर्लिन दिसली असेल.गॉड ब्लेस बोथ ऑफ देम.
करीना कपूर यांनी मल्लिका -ओबामा भेटीकडे वेगळया अँगलने बघितलं.त्याचं म्हणणं पडलं की,
ओबामांनी आपल्याला निमंत्रण दिलं असतं तर सैफू रागावला असताना बाबा.पंधरा मिनिटाच्या भेटीसाठी कशाला आपल्या प्रेमपात्राला नाराज करायचं.ओबामांनी निमंत्रण दिलं नाही,हे आपलं भाग्य.लाँग लिव्ह ओबामा.
प्रियंका चोप्रा यांनी सुध्दा या घटनेवर बरच विचार मंथन केले.त्यांनी त्यांचा फास्टेस्ट फ्रेंड शाहरुख खान यांच्याशी चर्चा केली.त्यांना हे कळेना की हरीयाणा आणि पंजाब ही शेजारी शेजारी राज्य.पण पंजाब इज बीग राज्य.त्या पंजाबातील आपण द कुडी.शिवाय मिस वर्ल्ड.असं असताना ओबामांचं लक्ष हरियाणाच्या कुडीकडे कसं काय गेलं बुवा.आपला मॅनेजर फुकटाचा पगार घेतो.मल्लिकाच्या हुषार मॅनेजरला पटवायला हवं आता.मल्लिका आणि माझं वजन करायला वजन काटयावर ठेवलं तर माझं वजन जास्त नाही का होणार.मी शाहरुख,सलमान,ह्रतिक,अभिषेक,अक्षयकुमार,रणबीर ,शाहीदची हिरोईन.मल्लिकाने या हिरोंचे नाव तरी एैकलय की नाही,वाहे गुरुच जाणे.ओबामांच्या सल्लागारांचंं अज्ञानच यातून दिसून येतं.इंडियातल्या अभिनेत्रिंना चहासाठी निमंत्रण द्यायचच होतं,तर मग रेखा काकू कां नको.त्यांच्या पायांच्या नखाची सर तरी मल्लिकाला येईल का.जया बच्चन आँटी कां नको.त्यांच्या हाताच्या नखाची सर तरी मल्लिकाला येईल का.जया प्रदा मॅडम कां नको.शी इज ब्युटिफुल तर आहेच पण खासदार असल्याने बोल्डही आहेत.आणि माझी काजोल ताई.तिच्या कशाची तरी सर मल्लिकाला येईल का हो.बरं माझं जाऊ द्या.मुग्धा गोडसे,दॅट लव्हली गर्ल फ्रॉम मॉय मुव्ही फॅशन,ती तर बोल्ड नव्हे बोल्डरच आहे.तिला निमंत्रण दिलं असतं तरी चालू शकलं असतं ना..
ज्यांचे सल्लागार असे असतात,त्यांची जहाजं बुडायला वेळ लागत नाही,असं मॅनेजमेंट तज्ञ रॉबर्ट डी दुसरा ,याने लिहूनच ठेवलय ना.
व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमासाठी बायबल समजल्या जाणाऱ्या या पुस्तकाची इतकी मागणी वाढली की ते पुस्तक पुरवता व्यवस्थापकाला नाकी नऊ आले.पण पुस्तकासाठीच्या मागणीचा प्रेशर असल्याने,प्रेस अखंड सुरु ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापकाने घेतला.त्यामुळे प्रेस खूप गरम झाला.नि प्रेसने पेट घेतला.त्यात साऱ्या प्रती आणि फ्रुफं ,कंप्युटर जळून गेले.त्यामुळे आता हे पुस्तक आऊट ऑफ मार्केट आहे.त्याची एकच प्रत केवळ माझ्याकडेच शिल्लक आहे.कुणाला बघायची असल्यास त्याने अवश्य यावे नि प्रत्यक्ष बघून घ्यावे.
सल्लागारांच्याच फॉल्टी मार्गदर्शनामुळेच नेपोलियन हरला.क्लिंटन फसले.बुशचं जहाज बुडालं.मुशर्रफांची सत्ता गेली.औरंगजेबाला दिल्लीच्या तख्ता पासून 25 वर्षे तिकडे दख्खनमध्ये अडकून पडावं लागलं.पानिपतात मराठा वॉरियर्सची दानादान उडाली.राजेश खन्ना यांचं एम्पायर बघता बघता खालसा झालं.कनिमोझी अम्मा तुरुंगात गेल्या.हिमेश भाई रेशमीया गटांगळया खायला लागले.इतकी मोठी उदाहरणं आहेत.समोर.पण लक्षात कोण घेणार.नका घेऊ.अशा सल्लागारांच्या गराडयात राहाल तर आणखी एखाद्या मल्लिकाचा गराडा पडेल नि व्हाईट हाऊसच्या बाहेर कधी जावं लागेल हेही
कळायचं नाही
खरं तर हा अग्रलेखाचा विषय.आपण एखाद्या वृत्तपत्रांच्या संपादिका असतो तर यावर अत्युकृष्ट अग्रलेख लिहिला असता.त्या स्वत:शीच बोलल्या नि आपल्या विचारमंथनाला शब्दरुप देण्याचं काम शोभा डे करु शकतात,हे त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी शोभाजींना मोबाईल लावला.
Leave a Reply