मागील भागात ओमेगा ३ ची माहिती दिली. ओमेगा ६ हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ओमेगा ६ हे लिनोलिनिक आम्लापासून तयार होते. मुख्यत्वे हे मधुमेहाने होणारे चेतातंतूंवरील परिणाम कमी करते. बाकी परिणाम ओमेगा ३ प्रमाणेच. भोपळ्याच्या बिया, पिस्ते, कोंबडीचे मांस, ऑलिव्ह, कपाशीच्या बिया, शेंगदाणे, करडई, तीळ, भाताचे तूस यांच्या तेलात ओमेगा ६ असते. मेदाचे पचन- तोंडातच सुरू होते. अन्न चावल्यावर मेदपेशी फुटून लाळेतील लायपेज या विकाराची प्रक्रिया सुरू होते.
अन्न जठरात गेल्यावर जठरातील ‘लायपेज’ची प्रक्रिया सुरू होते. पुढे आतड्याच्या पहिल्या भागात- ड्युओडिनममध्ये गेल्यावर पित्ताशयातून आलेल्या बाइल सॉल्टस व लेसीथिन यांची प्रक्रिया होते. स्वादुपिंडातून आलेल्या लायपेजची प्रक्रिया शीघ्रगतीने होऊन मेदाचे शोषण होते व यकृतात जाते. यकृतात ॲपोप्रोटिन्स या प्रथिनांबरोबर संयोग होऊन पाण्यात विरघळणाऱ्या लायपोप्रोटिन्समध्ये रुपांतर होते व रक्तात मिसळते. मेदाच्या चयापचयासाठी यकृत निरोगी लागते. मेदपेशी ट्रायग्लिसराइडस्चा साठा करतात.
रोधक (इन्स्युलेटर) असल्यामुळे मेदपेशी शरीराच्या उष्णतेचे उत्सर्जन थांबविते. या पेशी ऊर्जेचा मोठा स्रोत असून शरीरातील अवयवांना आधार व संरक्षण देतात. प्रौढांमध्ये मेद पांढरे असते तर गर्भात व अर्भकात तपकिरी असते, अधिक प्रमाणात असते व उष्णता जास्त निर्माण करते. त्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या बालकात शरीराची उष्णता टिकविण्यासाठी उपयोगी पडते.
मेदाचा प्रजननाशी विशेषतः स्त्रियांमध्ये संबंध आहे. मुलीचे उंचीच्या प्रमाणात अपेक्षित असलेल्या वजनाच्या १० ते १५ टक्के वजन कमी असेल तर रजोदर्शनाला उशीर होतो. काही वेळा मासिक पाळी बंद होते, डिंबोत्सर्ग (ओव्ह्युलेशन) होत नाही. आहार नियंत्रण (डाएटिंग) व अति व्यायामामुळे शरीरातील मेद कमी होऊन जननक्षमता कमी होते. हायपोथॅलॅमसमधील संप्रेरके कुतूहल 74 कमी झाल्यामुळे डिंब -पुटकाची (फॉलिकल) वाढ योग्य होत विज्ञानं जनहिताय नाही. आहार व्यवस्थित झाला व व्यायाम कमी केल्यास वजन वाढते व जननक्षमता पूर्ववत होते.
ज्या स्त्रियांचे वजन व अंगावरील मेद जास्त असते. त्यांच्यातही मासिक पाळीचा अनियमितपणा होतो व जननक्षमता कमी होते. पुरुषांमध्येही मेदाचे प्रमाण खूप कमी झाल्यास व अपुरा आहार असल्यास जननक्षमता कमी होते. पुरःस्थित ग्रंथीचा (प्रॉस्टेट) स्राव कमी होतो. शुक्राणूंची संख्या कमी होऊन त्यांचा वेगही मंदावतो.
-डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply