नवीन लेखन...

‘फादर’ इंडिया

माहिम पोलीस स्टेशनचा एक इन्स्पेक्टर, हिंदी चित्रपटसृष्टीत चार दशकं आपल्या खास डायलाॅगबाजीनं सुपरस्टार होऊन अधिराज्य करतो.. यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, मात्र हे प्रत्यक्षात घडलेलं आहे..

८ ऑक्टोबर १९२६ साली बलुचिस्तानमध्ये कुलभूषण पंडित यांचा जन्म झाला. तीन भाऊ आणि चार बहिणींसोबत त्यांचं बालपण, शिक्षण झालं. पदवीधर झाल्यानंतर ते मुंबईला आले. पोलीस खात्यात नोकरीला लागले व इन्स्पेक्टर म्हणून माहिम पोलीस स्टेशनचा कारभार पाहू लागले.. एके दिवशी चित्रपट निर्माते, बलदेव दुबे यांच्याशी ते संपर्कात आल्यावर, दुबेंनी त्यांच्यातील कलाकाराला ओळखून ‘शाही बाजार’ चित्रपटात त्यांना संधी दिली. चित्रपटाच्या शुटींग दरम्यान त्यांनी, नोकरीचा राजीनामा दिला.‌ हा चित्रपट रखडला, तोपर्यंत दुसऱ्या चित्रपटात संधी मिळाली. त्याचं नाव होतं, ‘रंगीली’.. ‘रंगीली’ प्रदर्शित झालाच नाही.. नंतर ‘शाही बाजार’ प्रदर्शित झाला व आपटला. १९५२ ते १९५७ पर्यंत ६ चित्रपट प्रदर्शित झाले मात्र यश असं, फारसं मिळालं नाही..

१९५७ साली मेहबूब खान यांच्या ‘मदर इंडीया’ चित्रपटात नर्गिसच्या पतीची, शामूची छोटीशी भूमिका राज कुमार यांना मिळाली आणि त्यांचं नशीब बदललं.. चित्रपट सुपरहिट ठरला. १९५९ साली दिलीप कुमार सोबत ‘पैगाम’ चित्रपट केला आणि एका सुपरस्टारच्या गाडीने, गती घेतली. ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘घराना’, ‘गोदान’, ‘दिल एक मंदिर’ या चित्रपटांनी राज कुमार, सर्वश्रृत झाले.

१९६५ साली प्रदर्शित झालेल्या ‘वक्त’ या चित्रपटाने त्यांचा ‘सुवर्ण वक्त’ सुरु झाला.. ‘काजल’, ‘हमराज’, ‘नीलकमल’, ‘मेरे हुजूर’, ‘हीर रांझा’, ‘पाकिजा’ या चित्रपटांनी राज कुमारांना अमाप यश व प्रसिद्धी मिळाली.

‘कर्मयोगी’ मध्ये दुहेरी भूमिकेत, ‘लाल पत्थर’, ‘बुलंदी’, ‘कुदरत’, ‘पुलीस पब्लिक’ या चित्रपटानंतर त्यांनी चरित्र भूमिका केली ती ‘सौदागर’ मध्ये! बत्तीस वर्षांनंतर दिलीप कुमार व राज कुमार पुन्हा एकत्र आले..

त्यानंतरही काही चित्रपट केले व शेवटचा ‘गाॅड और गन’ हा चित्रपट करेपर्यंत राज कुमार थकून गेले.. ज्या अभिनेत्याने चाळीस वर्षे आपल्या खास संवाद शैलीने चित्रपट रसिकांची वाहवा मिळविली, त्यालाच परमेश्वराने घशाचा कॅन्सर द्यावा, याहून दुसरे दुर्दैव ते कोणते? ३ जुलै १९९६ रोजी हा सत्तरीतला राज कुमार कुणालाही कानोकान खबर न देता, अंतर्धान पावला.. त्यांनी आपल्या मुलाला सांगून ठेवलेलं होतं की, मी गेल्याचं चेतन आनंद शिवाय कुणालाही सांगायचं नाही.. अंत्यविधी झाल्यानंतर पत्रकारांनी स्मशानात चौकशी केली, तेथील कर्मचाऱ्यांनाही माहित नव्हतं की, काल अग्नी दिला, ती व्यक्ती कोण होती..?

राज कुमार यांचे चित्रपटसृष्टीत अनेक किस्से आहेत.. राज कुमार सोबत ‘तिरंगा’ चित्रपटासाठी आधी नसरुद्दीन शहाला विचारलं होतं, त्यानं नकार दिल्यावर रजनीकांतला.. रजनीकांतने नकार दिल्यावर नाना पाटेकर! नानानं स्पष्ट सांगितलं, राज कुमार यांनी ढवळाढवळ केली तर मी चित्रपट सोडून देईन.. मेहुलकुमारनं, ते मान्य केलं व चित्रपट सुपरहिट ठरला.. गोविंदासोबत काम करताना, राज कुमारने त्याच्या शर्टचं कौतुक केलं, गोविंदानं दुसरे दिवशी तो शर्ट त्यांना भेट दिला.. दोन दिवसांनी गोविंदानं पाहिलं, त्याच्या शर्टचा, ‘जानी’नं रुमाल करुन तो खिशात ठेवला होता.. अमिताभ बच्चनचा सूट पाहून, राज कुमार यांनी त्याला विचारले, ‘हे कापड कुठे मिळालं? मला ते घरच्या पडद्यांसाठी खरेदी करायचं आहे..’ बच्चनसाहेब, फक्त हसले..

‘बुलंदी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एका थिएटरवाल्याने त्यातील डायलाॅग, भिंतीवर लिहिले होते.. त्याच चित्रपटाच्या बॅनरवर RAJ KUMAR लिहिले होते, खरं तर त्यांचा आग्रह RAAJ KUMAR असा होता.. त्यांनी निर्मात्याला सांगून तो बॅनर बदलायला लावला..

त्यांची पत्नी अँग्लो इंडियन होती. तिचं नाव जेनेफर. ती एअर होस्टेस होती. एका विमान प्रवासात दोघांचं प्रेम जुळलं.. लग्न झाल्यावर त्यांनी, तिचं नाव ठेवलं गायत्री! त्यांना दोन मुलं व एक मुलगी झाली. मोठा मुलगा पुरुने चित्रपटात कामं केली, मात्र तो यशस्वी झाला नाही.. दुसरा व्यवसायात आहे व मुलगी परदेशात आहे..

राज कुमार यांना जाऊन सव्वीस वर्षे झालेली आहेत. ज्यांच्या पडद्यावरील ‘एंट्री’ला थिएटरमधधील पब्लिकचा जल्लोष व्हायचा, असे कलाकार आता राहिलेले नाहीत.. त्यांची पांढरी पॅन्ट व पांढऱ्या बुटांनी, जिन्याच्या पायऱ्या उतरत होणारी एंट्री, अफलातून असायची.. त्यांच्या डायलाॅगची मिमिक्री, अनेकांनी केलेली आहे.. आता राहिल्यात, फक्त त्या आठवणी..

‘फूल बने अंगारे’ चित्रपटातील त्यांच्याच गीतात थोडासा बदल करुन, असं म्हणता येईल..

चांद आहें भरेगा.. फूल दिल थाम लेंगे.. ‘डायलाॅग’ की बात चली तो.. सब तेरा, नाम लेंगेऽ…

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

३-७-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..