२ फेब्रुवारी १९६८ रोजी ढाक्यात मोहम्मद अमिनुल इस्लामचा जन्म झाला. ‘बुलबुल’ या लाडनावाने तो सहकारी खेळाडूंमध्ये प्रसिद्ध आहे.
फुटबॉलमध्ये बुलबुलला जास्त रुची होती पण गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे ऐन उमेदीच्या काळात त्याला फुटबॉलचा नाद सोडावा लागला. २७ ऑक्टोबर १९८८ रोजी चितगांवमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यातून त्याने एकदिवसीय पदार्पण केले. (बांग्लादेशाच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही काही काळ त्याच्याकडे होते पण खेळाडूंच्या असहकारामुळे त्याला ते सोडावे लागले.) त्यानंतर बारा वर्षांनंतर अधिक काळाच्या अवकाशाने तो कसोटीविश्वात पदार्पण करता झाला. १० नोव्हेंबर २००० रोजी ढाक्यात सुरू झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्याद्वारे बांग्लादेशाने कसोटीपदार्पण केले. या सामन्यात अमिनुलने १४५ धावांची खेळी नऊ तास खेळपट्टीवर उभा राहत केली होती. प्रथमश्रेणी सामन्यांचा फारसा अनुभव अमिनुलला नसताना त्याने अशी कामगिरी केली हे खासच.
राष्ट्राच्या पदार्पणाच्या कसोटीतच शतक काढण्याची कामगिरी अमिनुलने केली. त्याच्याआधी अशी कामगिरी केवळ दोघांनाच जमली होती. पहिला होता ऑस्ट्रेलियाचा चार्ल्स बॅनरमन आणि दुसरा झिम्बाब्वेचा डेव हॉटन.
त्यानंतर मात्र ना अमिनुलचा सूर फारसा लागला, ना बांग्लादेशाचा. विशेष उल्लेखनीय काहीही त्यांच्याकडून झाले नाही, २००७ च्या विश्वचषकात त्यांनी भारताला पराभूत केले ते वगळता.
अमिनुल इस्लाम आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेटविस्तार मोहिमेचा एक भाग आहे.
ऑस्ट्रेलियाचा चार्ल्स बॅनरमन. इंग्लंडविरुद्ध मेलबर्नमध्ये मार्च १८७७ मध्ये नाबाद १६५ धावा.
श्रीलंकेचा सिदाथ वेट्टिमुनी. पाकिस्तानविरुद्ध फैसलाबादेत मार्च १९८२ मध्ये १५७ धावा.
इंग्लंडचा डब्ल्यू जी ग्रेस. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओवलवर सप्टेम्बर १८८० मध्ये १५२ धावा.
बांग्लादेशाचा अमिनुल इस्लाम. भारताविरुद्ध ढाक्यात नोव्हेम्बर २००० मध्ये १४५ धावा.
न्यूझीलंडचा स्टेवी डेम्पस्टर. इंग्लंडविरुद्ध वेलिंग्टनमध्ये जानेवारी १९३० मध्ये १३६ धावा.
पाकिस्तानचा नज़र मोहम्मद. भारताविरुद्ध लखनौमध्ये ऑक्टोबर १९५२ मध्ये नाबाद १२४ धावा.
वेस्ट इंडीजचा क्लिफर्ड रॉच. इंग्लंडविरुद्ध ब्रिजटाऊनमध्ये जानेवारी १९३० मध्ये १२२ धावा.
झिम्बाब्वेचा डेव हॉटन. भारताविरुद्ध हरारेर ऑक्टोबर १९९२ मध्ये १२१ धावा.
भारताचा लाला अमरनाथ. इंग्लंडविरुद्ध मुम्बईत डिसेम्बर १९३३ मध्ये ११८ धावा.
दक्षिण आफ्रिकेचा जिमी सिन्क्लेअर. इंग्लंडविरुद्ध केपटाऊनमध्ये एप्रिल १८९९ मध्ये १०६ धावा.
बांग्लादेशाच्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा अमिनुल इस्लाम आणि प्रत्येक कसोटी राष्ट्राचे पहिले शतकवीर.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply