३ फेब्रुवारी १९६६ रोजी ऑक्लंडमध्ये डॅनिएल कायल मॉरिसनचा जन्म झाला. अतिशय बेमालूमपणे बहिर्डुल्या (आऊटस्विंगर) टाकण्यासाठी डॅनी प्रसिद्ध झाला. १९८७ मध्ये (वयाच्या एकविसाव्या वर्षी) डॅनी मॉरिसनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळून एदिसापदार्पण केले.
२५ मार्च १९९४ रोजी भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने त्रिक्रम साधला. न्यूझीलंडच्या केवळ दोनच गोलंदाजांना अशी कामगिरी आजवर साधलेली आहे. गोलंदाजी करतानाच्या स्मितहास्यासाठी जसा तो प्रसिद्ध आहे तसाच तो त्याच्या गोलंदाजीच्या शैलीसाठीही प्रसिद्ध आहे. चेंडू टाकला जाण्यापूर्वी त्याचा गोलंदाजी करणारा हात असा हले की पंचाचा सदरा हललाच पाहिजे !
कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम एकदा डॅनी मॉरिसनच्या नावावर होता. त्याच्या ह्या “क्षमतेची” इतकी चर्चा झाली की बदका-बदकांनी भरलेला एक टाय (मराठीत गळपट्टा / कंठलंगोटी !) १९९६ मध्ये बाजारात आला होता. अशा पराक्रमांमुळेच त्याला बर्याचदा ‘डकमॅन’ म्हणून संबोधले जाते.
त्याच्याकडे खेळपट्टीवर फक्त उभा राहण्याची क्षमता मात्र नक्कीच होती. ती त्याने दाखविली एकदाच आणि त्यानंतर त्याची पुन्हा कधीही कसोटी संघात निवड झाली नाही. २८ जानेवारी १९९७ रोजी सुरू झालेली न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी डॅनी मॉरिसनच्या कारकिर्दीतील अखेरची ठरली. या सामन्यात दहाव्या गड्यासाठी त्याने नॅथन अॅसलसोबत १०६ धावांची भागीदारी केलेली होती. या भागीदारीत डॅनीचा वाटा अवघ्या १४ धावांचा होता.
‘मॅड अॅज आय वॉन्ना बी’ हे डकमॅनचे आत्मचरित्र. या आत्मचरित्राने सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळविला. नवथर क्रिकेटपटूंना मदत व्हावी म्हणून त्याने ‘डॅनी मॉरिसन ज्युनिअर क्रिकेट डायरी’ लिहिली आहे.
डॅनी मॉरिसनने साधलेला उपरोल्लेखित त्रिक्रम ा भारतीय संघाविरुद्धचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील दुसराच त्रिक्रम होता. भारतीय संघाविरुद्ध झालेल्या त्रिक्रमांचा हा तपशील (एकदिवसीय सामने):
पहिला : गो. आकिब जावेद (पाकिस्तान). शारजा. दि. २५ ऑक्टोबर १९९१. रवी शास्त्री त्रिफळाबाद, अझरुद्दीन पायचित आणि सचिन तेंडुलकर पायचित.
दुसरा : गो. डॅनी मॉरिसन (न्यूझीलंड). नेपिअर. दि. २५ मार्च १९९४. कपिलदेव त्रिफळाबाद, सलील अंकोला त्रिफळाबाद आणि नयन मोंगिया त्रिफळाबाद.
तिसरा : गो. स्टीव हार्मिसन (इंग्लंड). नॉटिंगम. दि. १ सप्टेम्बर २००४. मोहम्मद कैफ झेलबाद, लक्ष्मीपती बालाजी झेलबाद आणि आशिष नेहरा गोलंदाजाकरवीच झेलबाद.
चौथा : गो. फरवीज महारुफ (श्रीलंका). दम्बुला. दि. २२ जून २०१०. रवींद्र जडेजा पायचित, प्रवीण कुमार त्रिफळाचित आणि जहीर खान झेलबाद.
डकमॅन म्हणून ओळखल्या जाणार्या (ओळीने २४ कसोट्यांमध्ये शून्यावर बाद) डॅनिएल मॉरिसनचा जन्म आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय त्रिक्रमांचा तपशील.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply