खेळाचा पाचवा दिवस. जलपानाची वेळ. जमैकातील सबिना पार्कवर भारत दुसर्या डावात ६ बाद १६८. सय्यद किरमाणी व रवी शास्त्री नबाद. पहिल्या डावात वेस्ट इंडिजला तीन धावांचा पुढावा मिळालेला होता. सामना अनिर्णित राहणार नाही असे म्हणणारी व्यक्ती मूर्खांमध्ये सहज जमा झाली असती.
जलपानानंतर पहिल्याच षटकात किरमाणी बाद झाला. त्याच धावसंख्येवर मग संधू परतला आणि वेंकटराघवनही. ६ बाद १६८ असा ठिकठाक वाटणारा धावफलक आता ९ बाद १६९ असा कुपोषित दिसू लागला. रवी शास्त्री एका बाजूने उभा होता पण करणार काय? तीन बळी घेणारा हा गोलंदाज होता अँडर्सन माँटगोमेरी इव्हर्टन रॉबर्ट्स ऊर्फ अँडी रॉबर्ट्स.
अकरावा फलंदाज होता मनिंदर सिंग. त्याने अर्धा तास वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना तोंड दिले पण अखेर तो चकला. चहापानानंतरच्या वैयक्तिक चौथ्या षटकात अँडीने त्याचा मामा केला. १७४ धावांवर भारताचा डाव संपला.
सव्वीस षटकांमध्ये १७२ धावा काढण्याचे आव्हान वेस्ट इंडिजसमोर होते. गॉर्डन ग्रिनिज आणि डेस्मंड हेन्सने ४६ धावांची भागीदारी सलामीला केली. क्लाइव लॉइड लवकर बाद झाला. २ बाद ६५. विविअन रिचर्ड्स मैदानात उतरला आणि…
खेळाचा नूर पालटला. फटक्यामागून फटके बसू लागले आणि यजमानांची धावसंख्या भराभर वाढू लागली. सहासष्ट धावांच्या भागीनंतर सलामीवीर ग्रिनिज परतला. नंतर पिंचहिटर म्हणून पाठवलेला अँडी रॉबर्ट्सही आल्या पावली परतला. मात्र रिचर्ड्सवर कशाचाही असर झाला नाही. अवघ्या ३६ चेंडूंवर ६१ धावा काढत तो बाद झाला. तोवर त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारलेले होते. १५६ धावांवर तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या फलंदाजांचे रक्त बहुधा ड्रेसिंगरुममध्ये बसून विविअनचा खेळ पाहूनच गरम झालेले होते. एका षटकारासह १० धावा काढून पदार्पणवीर गस लोगी बाद झाला तेव्हा विंडिजला
एका अभूतपूर्व विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती.
या डावातील भारतीय गोलंदाजी पाहण्यासारखी होती :
कपिलदेव : १३-०-७३-४.
बलविंदर संधू : ३-०-२२-०.
वेंकटराघवन : ७-०-३९-०.
मोहिंदर अमरनाथ : २.२-०-३४-२.
अखेरच्या षटकात दुसर्या चेंडूवर जेफ दुजाँने मोहिंदर अमरनाथला उचलून फेकत सहा धावा घेतल्या आणि चार गडी राखून ही कसोटी वेस्ट इंडिजने जिंकली.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply