नुकत्याच महाराष्ट्रात काही मोठ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूका पार पडल्या. या वेळच्या निवडणूका काहीश्या अटीतटीच्या वातावरणातच झाल्या. सख्ख्या चुलत समजल्या जाणाऱ्या ‘दोन भावां’मधल्या या निवडणूकांकडे त्या भावांसकट सर्वांचेच लक्ष होते. त्यातून लागलेल्या निकालाने ते दोनही भाऊ आश्चर्यचकीत झालेले आहेत असाही निश्कर्ष काढता येईल. मात्र दोघांची मती सारखीच गुंग झालेली असली तरी एकाची अपेक्षाभंगाने तर दुसऱ्याची अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्याने अशी कारणे मात्र वेगवेगळी आहेत.(या माझ्या स्टेटमेंटशी कोणीही सहमत होणं अजिबात आवश्यक नाही.)
इथे मला त्या निवडणूका आणि त्या जिंकण्या-हारण्यांच्या कारणांचा उहापोह करायचा नाही. तो माझा विषयही नाही. मला याच संदर्भातल्या दुसऱ्या एका बाबीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे.
‘एव्हरीथींग इज फोअर इन वाॅर अॅन्ड लव्ह’ यात भारतातील मिवडणूकांचा समावेश करायला हरकत नाही. साम-दाम-दंड-भेद आदी आयुध वापरून ज्यांनी निवडणूका जिंकल्या, ते एका रात्रीत एकदम ‘साहेब’ किंवा ‘मॅडम’ झालेत. कालपर्यंत सर्वसाधारण आणि आपल्यातलेच असलेले ते विर आणि विरांगणा आता सर्वसाधारण समाजापासून स्वत:ला वेगळे समजायला लागतील. थोड्याश्या वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींना देवत्व देण्याची आपली फार पुरातन परंपरा आहे आणि त्याला जागून आता त्या ‘देवां’च्या सत्काराचा कार्यक्रम आता ठिकठिकाणी सुरू झाले आहेत किंवा होण्याचा मार्गावर आहेत. असे सत्कार काही ठिकाणी जनता स्वत:हून आयोजित करते तर काही ठिकाणी ते त्या देवांमार्फतच घडवून आणले जातात.
यशस्वीतांचे असे सत्कार समारंभ व्हायलाही काही हरकत नाही परंतू या पैकी कोणालाच, ज्या जनतेने त्यांना निवडून दिलंय त्या जनतेचा, सत्कार करावासा का वाटत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. आपापल्या मतदार संघातील जनतेपैकी एक स्त्री, एक पुरूष, एक तरूण आणि एखाद्या वृद्धाचा आपल्याला मतं दिल्याची कृतज्ञता म्हणून जाहिररित्या प्रातिनिधिक सत्कार करायला काय हरकत आहे? ज्याच्या मतांवर आपण निवडून आलो, त्यांच्या मतदानाची अशी अल्पशी परतफेड करून, आपल्याला त्यांची जाणिव असल्याची जाणिव मतदारांना करून दिल्यास त्या मतदारांनाही बरं वाटेल असं यापैकी कोणालाच का वाटत नाही..!
निवडून आलेल्या व ‘देवत्व’ पावलेल्यांनी त्यांच्या मतदाररूपी ‘भक्तां’साठी एवढं तरी करावं असं मला मनापासून वाटतं. देव भक्तांच्या भक्तीची जाणिव ठेवून भक्ताघरी त्यांची कामं करण्यासाठी धावल्याचे दाखले आपल्याच पोथ्या-पुराणांत आहेत, मग त्याची प्रचिती आधुनिक देवांनी आधुनिक भक्तांना देण्यास काय हरकत आहे. आता आधुनिक युगात आधुनिक देवाने आधुनिक भक्तांची कामं करावीत अशी वेडगळ अपेक्षा कोणी बाळगणार नाही (अपवाद सोडून), पण कृतज्ञतारूपी अॅक्नाॅलेजमेंट द्यायला हवी अशी अपेक्षा बाळगल्यास चुकीचं अथवा अनास्तव ठरू नये.
बघा पटतंय का..!!
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply