श्रावणमास हा मराठी कवींचा वीक पॉईंट. मराठीतील मान्यवर कवींनी श्रावण या विषयावर बऱ्याच कविता लिहिलेली आहेत. उदाहरणार्थ
‘श्रावणमासी, हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहिकडे।
क्षणात येती सरसर शिरवें
क्षणात फिरुनी ऊन पडे।।’
ते इंदिरा संत यांच्या –
‘श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण?
निसर्ग चित्रांत पावले स्पंदन!’
पर्यंत अनेक कविता आपल्या मनात येतात.
‘झिमझिम झरती श्रावणधारा’ ते शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं गीत – ‘रिमझिम बरसत श्रावण आला, साजण नाही आला’ अशी अनेक गाणी श्रावणाच्या वातावरणात रसिकांना नेतात.
इतकं असूनही ज्या गाण्याने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि ज्या गीताच्या उल्लेखाशिवाय ही चर्चाच काय, पण खुद्द श्रावण महिनाही पुढे सरकू शकणार नाही. ते गाणं म्हणजे मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतात गुंफलेलं आणी लता मंगेशकर यांनी गायिलेले (या गाण्याबाबतीत तरी मला ‘संगीतबद्ध’ असा नीरस शब्द वापरावासा वाटत नाही!) अजरामर गीत – श्रावणात घन निळा बरसला!
तर असा हा असा श्रावण महिना. पावसाची रिपरिप नाही की सूर्य कोठे दडून बसत नाही. ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ बघायला श्रावणचं पाहिजे. इंद्रधनुचे रंग फक्त श्रावणातच आपल्याला भुलवतात व आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. तर अशा या श्रावण महिन्यात सणावारांचाही बरसात असते. त्याबद्धल आपण ह्या लेखात मागोवा घेणार आहोत.
श्रावण महिना, महत्त्व आणि सण समारंभ:
श्रावण ( संस्कृत: श्रावण ) हा हिंदू कॅलेंडरचा पाचवा महिना आहे. भारताच्या राष्ट्रीय नागरी कॅलेंडरमध्ये, श्रावण हा वर्षाचा पाचवा महिना आहे, विशेषत: जुलैच्या मध्यापासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या शेवटी संपतो. श्रावण महिना संपूर्ण भारतीय उपखंडासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे. याच वेळी शेती साठी पाऊस पडतो व बळीराजा सुखावून जातो.
आपल्या भारत देशाला सण, समारंभ आणि उत्सवांचा देश म्हणून ओळखतात. आपल्याकडे प्रत्येक ऋतूप्रमाणे सण आणि उत्सवांचे आयोजन केले गेले असल्याचे दिसून येते. यातला सर्वात मोठा सण-उत्सवांचा काळ आहे तो ‘श्रावण’ महिन्याचा. सगळीकडे पावसाची संततधार सूरू असते आणि देशाच्या विविध भागात त्या त्या भागातील पद्धती, धर्मातील रूढी परंपरांप्रमाणे अनेक लहान मोठ्या सण-समारंभांची रेलचेल आपल्याला अनुभवता येते.
श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो. त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तीभावने पाळतात ते या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना करून उपवास करतात. महिन्यात येणाऱ्या चार किंवा पाच सोमवारी शंकराची यथायोग्य पूजा करून दिवसभर शक्य असेल तर उपवास केला जातो.
श्रावण महिन्याला सणांचा राजा असे संबोधले जाते. हा सात्विक, भक्तिभावाने पुनीत असा महिना मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत वैकल्ये केली जातात. या महिन्यात अनेक लहान मोठ्या सणांचे, व्रतांचे आयोजन करून त्याचा आनंद घेतला जातो. श्रावण महिन्यात सणांना अनन्य साधारण महत्व आहे. याशिवाय पुराणात सांगितल्या प्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्ये केली आणि उपवास – साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता. त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्व अधिक आहे. श्रद्धेनुसार असे मानण्यात येते की, प्रत्येक श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जात असत आणी त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असे. त्यामुळे याच काळात शिवशंकर पृथ्वीवर येतात असा समाज आहे आणी म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो.
आजच्या लेखात आपण श्रावण महिन्यात साजरे करण्यात येणाऱ्या सणांची माहिती करून घेणार आहोत.
१. श्रावणी सोमवार –
महिना भक्तीभावने पाळतात ते या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना करून उपवास करतात. महिन्यात येणाऱ्या चार किंवा पाच सोमवारी शंकराची यथायोग्य पूजा करून दिवसभर शक्य असेल तर उपवास केला जातो. संध्याकाळी सात्विक भोजन करून या उपवासाची सांगता केली जाते.
२. मंगळागौर पूजन –
महिलांमधील हे एक लोकप्रिय व्रत म्हणता येईल. नवीन लग्न झालेल्या मुलींनी लग्नानंतरच्या पहिल्या श्रावणापासून पुढील पाच वर्षे हे व्रत करायचे असते. इतर ओळखीतल्या नववधूंना बोलावून मंगळागौरीची पूजा मांडून, पूजा, आरती करून हे व्रत करतात. संध्याकाळी हळदीकूंकवाचा कार्यक्रम ठेवून, विविध मंगळागौरीचे खेळ, फुगड्या खेळून रात्र जागविली जाते.यावेळी गायली जाणारी गाणी हा मराठी गाण्यांचा मोठा ठेवा आहे. मंगळागौर म्हणजे ‘पार्वती’. शंकर आणि पार्वती हे गृहस्थाश्रमाचे आदर्श उदाहरण मानतात. त्यामुळे आपलाही संसार सुखाचा व्हावा म्हणून ही पूजा करतात. पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लवकर होत. तसेच स्त्रियांना एरवी बाहेर जाण्याची मुभा त्याकाळी नसे. त्यामुळे अशा सामाजिकरित्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रतातून मुलींना विरंगुळा मिळत असे. त्यासाठीच अशा व्रतांची योजना आपल्याकडे करण्यात आल्याचे दिसून येते. आज काळ बदलला असला तरी, या व्रतांमुळे महिला वर्गाला वेगळा आनंद मिळतो हे नक्की. आजही हे सण तितक्याच उत्साहाने त्यासाठीच साजरे केले जातात.
३. नागपंचमी-
नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील एक असा सण आहे ज्याचा संबंध आपल्या पर्यावरणाशी जोडला गेलेला सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची अथवा आपल्या परिसरात असेल तर नागाच्या वारूळाची पूजा केली जाते. नागदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्यादिवसापासून नागपूजा करण्यात येते असे सांगण्यात येते.
नागपंचमीचा सण आणि महिला –
या सणाच्या निमित्ताने पूर्वी विशेषतः ग्रामीण भागात विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येण्याची प्रथा आहे. गावातील सर्व मुली, स्त्रिया झाडाला मोठे झोके बांधून गाणी गातात, झोके घेतात. कुठे, कुठे मुली हौशीने मेहेंदी काढतात, बांगड्या भरतात. अनेक ठिकाणी मुली या नागपंचमीच्या आधी काही दिवस एकत्र येऊन फेर धरतात, गाणी गातात, झिम्मा फुगडी खेळतात. पूर्वी मुलींची लग्ने लहान वयात केली जात, त्यामुळे संसाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलींना सासरहून माहेरी आणून थोडा विरंगुळा मिळावा हा हेतू नागपंचमीच्या सणाच्या या सर्व प्रथांमधून दिसून येतो. नागाला दूध आणि ज्वारीच्या लाह्या नैवेद्य म्हणून दाखवण्याची पद्धत रूढ आहे. खरं तर यामागे कोठलेही शास्त्रीय कारण किंवा आधार नाही की नाग हे सर्व ग्रहण करतो. मात्र त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच्या या पद्धती असल्याचे जाणवते.
४.जिवंतिका पूजन –
संपूर्ण श्रावण महिन्यात या जिवंतिका देवीची प्रतिमा देवघरातल्या भिंतीवर लावून हे जिवंतिका व्रत केले जाते. श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे वस्त्र, दुर्वा वाहून त्यांची माळ अर्पण करतात. पूजा करून पुरणाचा नेवैद्य दाखवून एका सवाष्णीला विशेषतः जिला लहान मूल आहे तिला जेवायला बोलावून तिची ओटी भरून हे व्रत केले जाते. काही ठिकाणी लहान मुलांचे औक्षण करण्याचीही पद्धत आहे. याशिवाय दर शुक्रवारी संध्याकाळी दूध- फुटाण्याचा नैवेद्य दाखवून सवाष्णींना हळदीकूंकवाला बोलावले जाते. ही पूजा मुलांच्या आरोग्यासाठी, सुखरूपतेसाठी आणि दिर्घायुष्यासाठी केली जाते.
५ रक्षाबंधन-
श्रावणात येणारा हा आणखी एक लोकप्रिय सण. बहिण-भावाचं प्रेम व्यक्त करण्याचा हा एक आपल्या संस्कृतीतला सुंदर सोहळा. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावाला दीर्घ आयुष्य व सुख मिळो अशी कामना करतात आणी संकट समयी भाऊ आपली रक्षा करेल असा विश्वास बाळगते.
६. पोळा –
भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या अनेक सणांमध्ये निसर्ग, त्यातले प्राणी, पक्षी, झाडे यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक सण साजरे करण्याच्या प्रथा आहेत. यातील शेतकऱी राजाच्या घरात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे ‘पोळा’. शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मित्र आहे, बैल. ज्याच्यामुळे त्याच्या जमिनीची नांगरणी केली जाते, शेतात पिकं घेतली जातात.
अशा बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे बैल पोळा. शेतकऱ्यांच्या घरात अगदी दिवाळी प्रमाणे या सणाची वाट पाहिली जाते. बैलांना त्यादिवशी अंघोळ घालून, त्यांना छान सजवून, त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून या दिवशी त्यांना गोडधोडाचे जेवण घातले जाते. शहरातही अनेक ठिकाणी मातीचे बैल आणून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.
७. श्रावणी अमावस्या,पिठोरी अमावस्या – श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अमावस्येला हरियाली अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असे म्हणतात. या दिवसाला पर्यावरणीय महत्त्व आहे. यादिवशी जर झाडे लावली तर ती जोमाने वाढतात अशी समजूत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या दिवसाचे महत्त्व फार आहे. या दिवशी अनेकजण वृक्षारोपण करतात. तसेच काही ठिकाणी याला मातृदिवसाचेही महत्त्व आहे.
यादिवशी आई मुलांसाठी व्रत करते. खीर पुरी करून मुलांना ती दिव्यासह त्याचे वाण देते. अशा अनेक प्रथा या एका दिवसाशी जोडल्या गेलेल्या आहेत. जसा परदेशात मातृ दिवस साजरा केला जातो तसाच हा एकप्रकारे आपल्या संस्कृतीतील मातृदिवसच आहे.
८.श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला –
हा श्रावण महिन्यात येणारा शेवटचा पण अत्यंत लोकप्रिय आणि मोठा सण. श्रावणातील वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषाच साजरी केली जाते. त्याच्या दुसर्या दिवशी गोपाळकाला केला केला जातो. दहिहंडी फोडली जाते. पुर्वी हा सण घरगुती पद्धतीने साजरा केला जायचा पण आज त्याला बरेच मोठे सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप आलेले आहे.
९. श्रावण पौर्णिमा (पौर्णिमा) किंवा नारळी पौर्णिमा-
पश्चिम भारत आणि महाराष्ट्र , गुजरात आणि गोव्याच्या काही भागात श्रावण पौर्णिमा (पौर्णिमा) हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, समुद्राचा देव वरुण यांच्या सन्मानार्थ समुद्राला नारळ अर्पण केला जातो. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशात म्हणजे कोकणात पावसाळ्यानंतर समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण केला जातो. नारळी पौर्णिमा ही मासेमारीच्या हंगामाची सुरुवात असते आणि मच्छीमार, जे उदरनिर्वाहासाठी समुद्रावर अवलंबून असतात, ते वरुणाला अर्पण करतात जेणेकरून ते समुद्रातून भरपूर मासे घेऊ शकतील. या सोहळ्यानंतर मच्छीमार समुद्रात मासेमारी सुरू करतात.
श्रावण पौर्णिमा हा दिवस बलरामाचा जन्म सोहळा म्हणूनही साजरा केला जातो. या पौर्णिमेला कृष्णाचा मोठा भाऊ बलरामाचा जन्म झाला.
आंध्र प्रदेशात श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी (पौर्णिमा) जंध्याला पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी ब्राह्मण पवित्र धागा बदलण्याचा सोहळा करतात आणि त्याला यजुर्वेद नूतनसहित उपकर्म असेही म्हणतात.
१०. पवित्र एकादशी –
एकादशी दिवशी (११ व्या दिवशी), गुजरात आणि राजस्थानमधील वैष्णव कृपेचा मार्ग पुष्टीमार्गाचा जन्म म्हणून साजरा करतात. या दिवशी कृष्ण वल्लभाचार्यांसमोर प्रकट झाला. वल्लभाचार्यांनी त्यांना एक धागा ( सूथन ) देऊ केला, जो पवित्र ( पवित्र ) होता. त्या दिवसापासून दरवर्षी पवित्र एकादशी साजरी केली जाते. असे धागे एकादशीपासून रक्षाबंधनापर्यंत अर्पण केले जातात.
असा हा श्रावण महिना घेऊन येतो आनंद, उत्साह आणि जगण्याची नवी उमेद. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण उत्सवाच्या निमित्ताने सर्वांसह मिळून आनंदाने घालवायला असे सण समारंभ नक्कीच हवे असतात. वर्षभराची ऊर्जा देणारा हा श्रावण महिना आरोग्य,पर्यावरण,संस्कृतीचा सर्वांगीण विचार करणाराच आहे असे म्हणता येईल.
डॉ.दिलीप केशव कुलकर्णी.
मोबा: ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
तारीख : २८/०७/२०२४
Informative write-up.