६ मे २०१६ रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका संस्थेतर्फे ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही माझी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
त्या कार्यशाळेत कर्नाटकातून आलेल्या दोन महिला कृषी संशोधकांशी माझी ओळख करून देण्यात आली. त्यातील एका संशोधकाने कथन केलेली तिची दुर्दैवी कहाणी (कागदोपत्री पुरावे माझ्या हातात आल्यानंतर) १२ मे २०१६ रोजी मी फेसबुकवर पोस्ट केली. व्हॉट्सऍपशी माझा दुरूनही संबंध येत नसल्यामुळे ती पोस्ट मी नव्हे तर इतर असंख्य लोकांनी व्हॉट्सऍपवर शेअर केली व अवघ्या काही तासातच ती व्हायरल झाली. गेल्या सात दिवसात असंख्य लोकांनी विविध मार्गांनी माझ्याशी संपर्क साधून ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यातील काही मोजक्या प्रतिक्रिया व त्यांना माझी उत्तरे.
१. ही घटना खरी आहे का? असल्यास तुम्ही त्या महिलेचे नाव, फोन नंबर व ईमेल आयडीचा उल्लेख का केला नाही?
– ही घटना १०० टक्के खरी आहे व तिचे सर्व कागदोपत्री पुरावे माझ्याजवळ आहेत. ती संशोधक स्त्री गेल्या दोन वर्षांपासून छळ सहन करते आहे. नाव, फोन नंबर व ईमेल आयडीचा उल्लेख करून मला तिच्या अडचणींमध्ये भर घालायची नाही.
२. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काही करू शकतो का?
– तिला न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत उच्च पातळीवरून प्रयत्न सुरु असल्यामुळे सर्वांनी काही दिवस वाट बघावी.
३. तिचे संशोधन आमच्या कंपनीला विकत घेण्याची इच्छा आहे. तिचे नाव व फोन नंबर फक्त आम्हालाच कळवा.
– एका भारतीय संशोधक स्त्रीची नोकरी व जीव जाण्याची वेळ आली असतांना तुम्हाला ‘धंदा’ कसा काय सुचतो?
४. आम्ही संशोधक आहोत व आम्हाला असे अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून येत आहेत. पण नोकरी वाचवण्यासाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्हाला सहन करावा लागतो आहे.
– आम्हा भारतीयांचं हेच मोठं दुर्दैव आहे. शास्त्रज्ञांचा छळ केल्यानंतर ते देश सोडून गेले की आम्ही ब्रेनड्रेनच्या नावाने ठणाणा करतो.
५. मी एका न्यूज चॅनेलचा प्रतिनिधी बोलतो आहे. मला त्या स्त्रीचा फोन नंबर द्या, मला तिच्यावर एक स्टोरी तयार करायची आहे. तुम्ही काहीही सांगायला तयार नाही याचा अर्थ तुमची अॅटिटयूड चांगली नाही. मी आता एखाद्या दुसऱ्या स्टोरीचा शोध घेतो.
– साहेब, मला सल्ला देण्याऐवजी जरा स्वतःची अॅटिटयूड तपासून बघा. समोरचा माणूस जळत असताना त्याचा जीव वाचवण्याऐवजी स्टोरी तयार करण्यासाठी व्हिडिओ शूटिंग करणारे तुम्ही लोक आता त्या बिचाऱ्या संशोधक स्त्रीचा जीव घ्यायला निघालात की काय?
वाचकांनो, माझ्या लेखाच्या निमित्ताने मला मनुष्यस्वभावाचे अनेक चित्रविचित्र नमुने बघायला मिळाले. त्या शास्त्रज्ञ स्त्रीला व आपल्या देशातील गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकांनी पुढे येण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यात स्वतःचा फायदा शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती. मी तिचे नाव व फोन नंबर जाहीर करत नाही म्हणून काही महाभागांची मला धमक्या देण्यापर्यंत मजल गेली. शास्त्रज्ञांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरु झालेली ही लढाई जिंकण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
श्रीकांत पोहनकर
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply