नवीन लेखन...

फिर ये सीट मेरी हुई ना?

“मैने खिडकीसे सीटपर रुमाल डाला था, (बसमध्ये प्रवास करतांना भांडणं निर्माण करणारी नेहमीची एक समस्या आणि एक सुंदर प्रवासवर्णन, नक्की वाचा)

हैद्राबाद येथून परततांना छत्रपती संभाजी नगर पर्यंतचा आमचा प्रवास रेल्वेचा होता. पण तेथून पुढचा प्रवास आम्हाला आपल्या लालपरीत करायचा होता. म्हणून छत्रपती संभाजी नगर मधून साक्री या साधारणपणे दुपारी पावने दोन वाजता सुटणाऱ्या एस.टी.बसमध्ये आम्ही बसलो. सर्वांनी आपापल्या अवजड बॅग कशा-बशा बसमध्ये चढवल्या आणि बसच्या रॅकवर ठेवल्या. तोपर्यंत बाजूच्या फलाटावर आमच्या शिरपूरला जाणारी बस येऊन उभी राहीली. आमच्या सोबत प्रवास करणारे डॉ.दिपक बाविस्कर सर आणि त्यांची फॅमीली त्या बसमध्ये चढली. त्यांना त्या बसमध्ये चढल्याचे पाहून आम्हालाही या बसमधून उतरुन त्या बसमध्ये चढण्याची ईच्छा झाली. पण या प्रयत्नात आपली ताराबंळ तर होईलच शिवाय आहे ती ‍मिळालेली जागा सोडल्यावर शिरपूर बसमध्ये बसायला जागा मिळते की नाही अशी शंका वाटली. त्यामुळे साक्री बसमधून उतरणे आम्ही टाळले. लगेचच आमच्या बसच्या कंडक्टरने बसची घंटी दोन टोल वाजवली आणि आमची बस बसस्थानकातून निघून धुळयाच्या दिशेने निघाली.

ज्या मार्गावर मी आज प्रवास करत होतो त्या मार्गाशी माझी जूनी ओळख होती म्हणून रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक परिचीत भागाची ओळख मी माझ्यासह प्रवास करणाऱ्या माझ्या सहप्रवाशांना अर्थात पत्नी, मुलगी, रुपाली ताई, चौधरी ताई यांना करुन देत होतो. बाबापेट्रोल पंप, आर्मी सेंटर, शरणापूर फाटा, दौलताबाद गाव, दौलताबादचा प्राचीन अभेदय देवगिरी किल्ला, H2O वाटर पार्क, भद्रा मारोती मंदिर असलेले खुलताबाद शहर, वेरुळचा घाट, वेरुळच्या लेण्या, घृष्णेश्वराचे प्राचीन व जागृत मंदिर, वेरुळ गाव, गल्लेबोरगाव, पाणपोई फाटा, कन्नडचा साखर कारखाना आणि कन्नड बसस्थानक असा सर्व परिसर अनेक दिवसानंतर माझ्या डोळयांसमोर जुन्या आठवणींना जीवंत करत होता. कारण या ऐतिहासिक ओळख असलेल्या जिल्हयात मी माझ्या नोकरीची सुरुवातीची साडे अकरा वर्ष घालवली होती. खुलताबाद येथे साडे आठ वर्षे तर कन्नड शहरात मी तीन वर्ष निवास केला होता. कन्नड शहरात पोहोचण्या आधी माझे जीवलग आणि आमचे पाहुणे श्री.अनंतराव साळुंखे आम्ही पोहोचण्या आधी कन्नडच्या बसस्थानकावर आम्हाला भेटण्यासाठी येऊन पोहोचले. सोबत त्यांनी मधुरा आणि धनस्वीसाठी वेगवेगळया प्रकारच्या चॉकलेट आणि काजूकतलीची मिठाई आणली. बसच्या खिडकीतून त्यांनी मधुराला खाऊ देऊन सर्वांशी गप्पा केल्या आणि प्रवाश्यांची चढ-उतार झाल्या नंतर चहा पिण्यासाठी मला बसमधून उतरायला सांगितले. यावेळी बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या एका छोटयाश्या हॉटेलमध्ये त्यांनी मला व मी ज्या बसमधून प्रवास करतोय त्या बसच्या चालक-वाहकाला चहा पाजला. यावेळी चहा पितांना आमची चालक-वाहकांशी ओळख झाली आणि मग आम्ही श्रीमान.साळुंखे सरांचा निरोप घेतला. त्यानंतर बसमध्ये बसून आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. कन्नड शहरातून हा प्रवास चालू असतांना गेल्या सात-आठ वर्षांमध्ये कन्नड शहरात झालेला बदल प्रकर्षाने मला जाणवत होता. पिशोर नाक्यावर पोहोचल्या पोहोचल्या वासडी, पिशोर कडे जाणारा रस्ता आपण या रस्त्याने तीन वर्ष तपोवनला शाळेत गेल्याच्या आठवणी जीवंत करुन देत होता. पुढे कॉलेजगेट आणि मी ज्या कॉलनीत राहत होतो तो परिसर न्याहाळतांना कन्नड शहराप्रती माझी आत्मीयता जीवंत करत होता. अगदी काही वेळेत आमची बस कन्नड मधून बाहेर निघून कन्नडच्या औट्रम घाटात पोहोचली आणि यापूर्वी ज्या कन्नड घाटातून मी किमान सात आठशे वेळा येणे-जाणे केले असेल तो औट्रमघाट जणू, “काय भाऊ ओळखलं का? तु या पुर्वी अनेक वेळा माझ्या अंगा-खांद्यावरून प्रवास केल्याची ओळख मला करुन देत होता.

सध्या सगळीकडे खुप पाऊस पडतोय म्हणून सकाळच्या सत्रात कन्नड घाटात दाट धुके राहत असते. त्यामुळे कालच्या दिवशी कन्नडचा हा घाट चढतांना दरीत कोसळलेली एक कार आज घाट उतरतांना आमच्या नजरेस पडली. ज्यात काल चार लोकांचा म्यृत्यू झाला होता. आजही ती कार तशीच दरीत पडलेली दिसत होती आणि काही वाहन चालक ती दुर्घटना पाहण्यासाठी तेथे घाटात थांबत होते. अशा घटना माझ्यासाठी आणि या कन्नड घाटासाठीही नविन नव्हत्या. कारण यापुर्वी या घाटात अशा शेकडो घटना घडल्या होत्या. ज्या आम्ही पाहील्या होत्या. आजची ही दुर्देवी घटना पाहील्यानंतर पुन्हा वाटले की औट्रम घाटातून प्रवास करतांना प्रत्येक वाहन चालकाने खुप मोठया प्रमाणावर खबरदारी बाळगायला हवी. गेल्या काही महिन्यांपासून अवजड वाहनांना या घाटातून येण्यासाठी बंदी केल्यामुळे आणि फक्त बसेस व लहान प्रवाशी वाहने ये-जा करत असल्यामुळे आम्ही पुढच्या अगदी अर्ध्या पाऊण तासात घाट उतरुन चाळीसगाव शहरात पोहोचलो.
चाळीसगाव च्या बसस्थानकावर पुन्हा प्रवाश्यांची चढ-उतार सुरु झाली. ज्यात अनेक प्रवासी त्या बसस्थानकावर उतरले तर तेवढेच प्रवाशी बसमध्ये चढले. यावेळी बसमध्ये चढलेल्या एका गृहस्थाने आपल्याला बसमध्ये जागा मिळेल की नाही अशी शंका असल्याने खिडकीतूनच आपला हातरुमाल एका रिकाम्या सीटवर टाकला. पण तो गृहस्थ एसटीच्या दरवाज्यातून चढून बसमध्ये सीटवर येई पर्यंत एक दुसरा युवक त्या सीटवर येऊन बसला. त्यानंतर जेव्हा तो गृहस्थ, ज्याने त्या सीटवर आपला हातरुमाल टाकला होता, तो गृहस्थ त्या सीटपर्यंत येऊन पोहोचला आणि त्या युवकाला त्या सीटवर पाहून म्हणाला. “ये उठ यहाँसे, ये मेरी जगह है, मैने इस सीटपर खिडकीसे रुमाल डाला हुआ था” हे ऐकून तो युवक म्हणाला, “तुझा रुमाल टाकला होता, तर बस या सीटवर एक जागा तशीही रिकामी आहे.” तेव्हा तो गृहस्थ म्हणाला. “नही, मै अकेला नही हुँ, मेरे साथ मेरी बिवी और बच्चे है, मुझे पुरी सीट चाहीए,” पण त्या युवकाने सांगितले की, “मी या सीटवरुन उठणार नाही, हवं तर उरलेल्या जागेत तुम्ही कुणीही बसा,” तेवढयात त्याची बाजू घेत त्यांच्या सीट मागे बसलेल्या गृहस्थाने त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, “उसने खिडकीसे रुमाल डाला था, तो सीट उसकी हुई नां !” हे आपले समर्थन करणारे बोलणे ऐकुन सीट साठी वाद घालणारा गृहस्थ खुप चिडला आणि त्याने रागारागाने बसमध्ये चढलेल्या त्याच्या लहान लहान तीन मुलांना एक एक करुन त्या युवकाच्या बाजूला आदळ-आपट करुन बसवण्याचा प्रयत्न केला. त्याची बायको सीटपर्यंत पोहोचल्यावर तो तीला म्हणाला, “तू बैठ यहाँ इस सीटपर, मैने रुमाल डाला था, लेकीन ये हमारी सीट छोड नही रहा है,” हे ऐकून त्या गृहस्थाची बायको सुध्दा रागाने लालबुंद झाली, तीचा राग शीगेला पोहोचला आणि ती म्हणाली, “कैसे उठ नही रहा है? ये उठ, ये हमारी सीट है,” तीचं असं बोलणं ऐकुन तो तरुण शांतपणे फक्त बसूनच राहीला आणि त्याने त्या महीलेला उत्तर देणे टाळले. अगदी त्याच सीटच्या मागे असलेल्या सीटवर एक प्रवाशी जागा रिकामी झाली. त्या सीटवरच्या माणसाजवळ सीट साठी भांडणाऱ्या युवकाने त्याच्या पत्नीला आणि मुलांना बसवले आणि स्वत: त्या तरुण युवकाजवळ बसला. मागच्या सीट वरील गृहस्थाने पुन्हा एकदा वक्तव्य केले की खिडकीसे उसने रुमाल डाला था, तो ये सीट उसकी थी. त्या गृहस्थाचे हे वक्तव्य ऐकुन पुन्हा त्या सीट साठी भांडणाऱ्या गृहस्थाला चेव चढला आणि त्याने पुन्हा त्या तरुणाशी हुज्जत घालायला सुरुवात केली. “मैने खिडकीमेंसे सीटपर रुमाल डाला था, फिर ये सीट मेरी हुई ना? , तु कैसे मेरी सीट पर बैठ गया, क्यों नही तू मेरी सीट से उठता? तु जानता नही है, मै एक ही झटकेमे तेरी ये अकड और दादागिरी निकाल दुँगा, दादागीरी क्या दिखा रहा है? तेरी दादागीरी तो मै पुरी तरह सें जीरा दुँगा. कहाँ का है रे तू ?” असं बोलून तो गृहस्थ त्या तरुण युवकावर दात ओठ दाबत खेकसून बोलत होता. “तू कुठला आहेस?” असा सवाल पुढे आल्यावर त्या तरुण युवकाने “मी धुळयाचा आहे.” असे उत्तर दिले, “तु धुलिया का है तो मै भी चालीसगाव का हुँ, देखता हुँ, तु कैसे नही उठता?” असा धमकी वजा इशारा त्या गृहस्थाने त्या युवकाला दिला. यावेळी त्या गृहस्थाची पत्नी त्या तरुणाला म्हणाली, “दादागिरी करता है क्या रे, क्या कर लेगा तू बता? क्यों हमारी जगह पर बैठ गया?” असं म्हणून ती त्याला भांडणासाठी चेतवण्याचा प्रयत्न करत होती. यावर उत्तर नं देता तो तरुण फक्त शांतपणे बसून राहीला. पण जेव्हा तो गृहस्थ पुन्हा त्या युवकाशी असभ्यतेने वागायला आणि बोलायला लागला, तेव्हा त्याचाही संयम सुटला आणि मग तो म्हणाला, “मी काय करतो ते बघायचंय का तुला? मी काय करेल ते मी तुला नंतर दाखवतो, आधी तू काय करशील? ते सांग. मी नाही उठत” असं म्हणाला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं लक्ष या भांडणाकडे केव्हापासून लागून होतं. पण या भांडणात त्या चार व्यक्तींशिवाय दुसरं कुणीही बोलून ते भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत नव्हतं. ते पाहून मला त्या भांडणाच्या गहनतेचीच कल्पना आली आणि ते भांडण टोकाला जाऊ नये किंवा त्यांच्यात हातापायी होऊ नये, असे वाटल्याने त्यांचे भांडण थांबावे आणि बसमधील वातावरण शांत व्हावे, म्हणून मी त्यावेळी ओरडून त्यांना उद्देशून म्हणालो. “अरे बस करा यार, बस करा, झालं तेवढं पुरे आहे. भेटली ना जागा तुम्हाला सगळयांना! आता कशाला भांडता, आटोपतं घ्या, नाहीतर मी पोलिसांना फोन करुन इथे बोलवतो.” असा मोठयाने आवाज दिला. यानंतर काहीशी दोघांच्या बाजूने शांतता झाली. भांडणारा गृहस्थ, त्याची बायको आणि त्याची मुले ३०-३५ कि.मी.चा प्रवास करुन पुढे विंचूर चौफुलीच्या जवळ कोणत्या तरी गावाच्या फाटयावर उतरुन गेले. मात्र बसमध्ये चढतांना बसण्यासाठी जागा हवी, यासाठी भांडण करणारं हे दांपत्य एवढया ताण-तणावात प्रवास करता-करता आपल्या छोट्याश्या लेकराची नवी चप्पल मात्र बसमध्येच विसरुन गेले. त्यांच्यातल्या त्या भांडणाचा प्रसंग पाहून माणूस एका छोट्याश्या प्रवासात, एका छोट्याश्या गोष्टीसाठी कसं एकमेकांशी भांडतो आणि क्षणभरासाठी कसा माणुसकी विसरतो, याचा प्रत्यय यावेळी मला आला. हे पाहून त्या प्रसंगाचे मनाला खुप वाईट वाटले.

धुळे बसस्थानक येण्याआधी मला सर्व सामानासह लवकर उतरायचे आहे, हे लक्षात घेऊन मी जेव्हा माझ्या दोन बॅग रॅकवरुन काढून पुढे सरकलो. तेव्हा मी मुद्दाम त्या तरुण आणि शांत युवकाजवळ थांबलो आणि त्याच्याशी हमरी-तुमरी करुन त्याला भांडण करण्यासाठी चेतवणाऱ्या दांपत्याशी, त्याने ज्या सहनशीलतेने आणि शांततेने तो प्रसंग हाताळण्याचा प्रयत्न केला, त्या विषयी त्या युवकाचे कौतूक केले. यानंतर मी बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना प्रश्न केला की, “बसमध्ये चढण्यापूर्वी खिडकीतून सीटवर रुमाल टाकला की सीट आरक्षित होते का? म्हणजे आपले होऊन जाते का?” माझ्या प्रश्नावर काही प्रवाशांनी उत्तर दिले की, “नाही ! असं जर राहीलं असतं, तर सर्व प्रवाशांनी खिडकीतूनच रुमाल टाकून जागा मिळवली असती. दरवाज्यातून नंबरप्रमाणे चढून सीट मिळवण्याचा प्रयत्न मुळीच केला नसता.” बसमधील प्रवाशांनी दिलेले उत्तर अगदी बरोबर होते. मग मी पुन्हा त्यांना प्रश्न केला की, “दादागिरी कोण करत होतं? हा तरुण की सीटसाठी भांडणारा गृहस्थ? लोकांनी पुन्हा उत्तर दिले. “सीटसाठी भांडणारा तो गृहस्थ आणि त्याची बायकोच त्या तरुणावर दादागिरी करत होते.” त्या युवकाच्या पाठीमागे बसून, “हाँ, उसने पहीले सीट पर रुमाल डाला था, तो सीट उसकी थी” असं म्हणणाऱ्या गृहस्थाला त्याची चूक लक्षात आणून देण्यासाठी आता मी पुढचं वक्तव्य केलं. “खरंच नां, काही लोकं उगाच चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करतात. त्यांनी असू करु नये, जो व्यक्ती योग्य असेल त्याचीच बाजू धरावी.” मी केलेलं वक्तव्य ऐकुन तो गृहस्थ अगदी खजील होऊन निरुत्तर झाला आणि त्याने शांत बसून आपली मान खाली घातली. पण आता घडलेल्या प्रसंगावर त्याची काहीही बोलण्याची हिम्मत झाली नाही. बसमध्ये बसलेल्या त्या प्रवाशांची प्रतिक्रीया ऐकून त्या तरुणालाही उशिरा का असेना बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी आपली बाजू घेतली याचे समाधान वाटले.
खरंतर बसमध्ये भांडणाऱ्या गृहस्थासोबत त्याची बायको आणि तीन लहान लहान लेकरं होती. त्याने अगदी त्याच्या बायको आणि लेकरांसाठी बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून कुणालाही एक छोटीशी विनंती केली असती तरी अगदी कुणीही त्याच्या लेकरांसाठी आणि बायकोसाठी बसायला जागा करुन दिली असती. पण ज्या ॲटीटयूडने आणि भांडखोर स्वभावाने तो गृहस्थ बसमध्ये त्या युवकाशी वागला, त्यावेळी कुणालाही त्या गृहस्थाबद्दल आणि त्याच्या बायकोबद्दल आस्था आणि आपुलकी वाटली नाही. पण त्या उलट अशा चिथावणी खोर वक्तव्यांपुढे स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या तरुणाचे बसमध्ये बसलेल्या अनेकांना कौतूक वाटले.

बसमध्ये प्रवास करतांना दररोज अशा काही गोष्टी घडतात. कधी-कधी प्रवासात आपल्याला नविन मित्र भेटतात तर कधी आपला आणि समोरच्या व्यक्तीचा स्वभाव बोलका असेल तर नविन ओळखी होतात. पण बहुतेकदा जागेसाठी सहप्रवाशांचा अनादर केल्याने आणि त्याच्याशी अनितीने वागल्याने वाद होऊन मोठमोठी भांडणं सुद्धा होतात. “#खरंतर_बसच्या_खिडकीतून_रिकाम्या_सीटवर_रुमाल_टाकलं_की_सीट_आपली_होत_नाही” असं ठळक अक्षरात बसमध्ये लिहून ठेवायला हवं. ज्यामुळे अज्ञानी प्रवाशांना आपली चूक सहजपणे समजून येईल आणि ते कुणाशीही हुज्जत घालणार नाहीत. तसेच प्रत्येक कंडक्टरने बसमध्ये अशाप्रकारचे वाद होणार नाहीत, यासाठी स्वत: मध्यस्थीची भूमिका बजावून अशी भांडणं होण्यापासून थांबवली पाहीजेत.
लहान असतांना आणि शाळेत शिक्षण घेत असतांना आपण दररोज प्रतिज्ञा म्हणायचो की..
“भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.”

मग मोठे झाल्यावर आपण आपल्या अवती-भवती आणि आपल्या संपर्कात आलेल्या लोकांशी इतक्या तुच्छतेने का वागतो? असा प्रश्न मला पडतो. जी प्रतिज्ञा आपण दररोज अगदी शपथपुर्वक घेतलेली असते, ती प्रत्यक्ष जीवनात आपण का पाळत नाही? बसमध्ये जागा मिळवण्यासाठी अशा प्रकारची व याहूनही मोठमोठी भांडणं तुम्हीही पाहीली असतील. ज्यामध्ये उगाचच कधी-कधी चूक नसणाऱ्यालाही या भांडणांमध्ये मानसिक ताण-तणाव सहन करावा लागतो. शिक्षण व नोकरीच्या निमीत्ताने परजिल्हयात मला अनेक वर्ष रहावं लागलं. म्हणून या काळात मी शेकडो वेळा बसचा प्रवास केला आहे. त्यामुळे बसमध्ये घडलेले असे अनेक प्रकारचे प्रसंग मी पाहिले आणि प्रत्यक्ष अनुभवले आहेत. काही वाद अगदी पुन्हा-पुन्हा तेच असतात, जो येथे मी वरील प्रसंगात वर्णिला आहे. आपला याबाबतचा अनुभव वेगळया प्रकारचा असू शकतो. तो आपण नक्कीच शेअर करावा. ज्यामुळे बसमध्ये प्रवास करतांना काय बरोबर असते आणि काय चुकीचे असते, याबाबत जनसामान्यांना व प्रवाशांना माहीती होऊ शकेल.

धन्यवाद !
लेखक.. श्री.दिपक विनायक पाटील
(खर्देपाथर्डेकर)
प्रा.शिक्षक, मांजरोद, शिरपूर, धुळे

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक 

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..