तेलवाहू तसेच केमिकल वाहून नेणाऱ्या जहाजांच्या अकोमोडेशन वर मोठ्या आकारात नो स्मोकिंग ही सूचना लिहलेली असते. लहानपणापासून मुंबईहुन मांडव्याला आणि अलिबागला जाताना लाँच मधून जाताना मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या मोठ्या मोठ्या जहाजांवर एवढ्या मोठ्या अक्षरांत नो स्मोकिंग का लिहलंय याबद्दल प्री सी ट्रेनिंग कोर्सला जाईपर्यंत नेहमीच कुतूहल वाटायचं. तेव्हा वाटायचे की जहाजावर अशी सूचना लिहण्याचा उद्देश काय असावा आणि ही सूचना नेमकी कोणासाठी लिहली असावी.
प्री सी ट्रेनिंग सुरु असताना जेव्हा इंडियन नेव्हल डॉक मध्ये पहिल्यांदा भारयीय नौदलाच्या आय एन एस आदित्य या तेलवाहू जहाजावर काही तासांसाठी गेलो तेव्हा सुद्धा नो स्मोकिंग सुचनेचे एवढे गांभीर्य लक्षात आले नव्हते. पण ज्यावेळी नोकरी करण्यासाठी म्हणून पहिल्यांदाच जुनियर इंजिनियर म्हणून आमच्या कंपनीच्या तेलवाहू जहाजावर पुढील आठ ते नऊ महिन्यासाठी जॉईन होताना पहिले पाऊल ठेवले त्याच क्षणी जाणवले की जहाजावरील वातावरण म्हणजे एकप्रकारे लाखो लिटरचा ऑइल बॉम्बच आहे. हजारो टन किंवा कितीतरी अब्ज लिटर्स क्रूड ऑइल किंवा इंधन असलेल्या टाक्या. या टाक्यांमधून सतत बाहेर पडणारे अतिज्वलनशील गॅसेस. अशा अतिज्वलनशील गॅसेस असलेल्या वातावरणात स्मोकिंगच काय पण एक छोट्यातला छोटा स्पार्क जरी पडला तरी लगेच बूम. मोठा स्फ़ोट आणि मग नुसतं अग्नी तांडव. तेलवाहू किंवा केमिकल वाहून नेणाऱ्या जहाजांना आग लागली की ती आग एखाद्या अणू बॉम्ब सारखी अनियंत्रित होऊन जाते. अशा आगीला नियंत्रित करण्यापेक्षा ती लागू देऊ नये म्हणून खूप काळजी घेतली जाते.
जहाजावर कॅमेऱ्यांच्या फ्लॅश मधून स्पार्क पडून आग लागू नये म्हणून स्पेशल कॅमेरे वापरले जातात, कॅमेरेच काय इव्हन टॉर्च सुद्धा इंट्रिनसिकली सेफ म्हणजे हातातून खाली पडली तरी खाली जहाजाच्या स्टील प्लेट वर पडून सुद्धा त्यातून ठिणगी उडणार नाही अशा प्रकारच्या असतात. जहाजावर स्वतःच्या केबिन बाहेर मोबाईल वापरायला सुद्धा बंदी असते. कारण मोबाईल मधील बॅटरी आणि फोटो काढतांना येणारे फ्लॅश.
जहाजावर सिगारेट ओढण्यासाठी स्मोकिंग रूम असतात जिथे ऍश ट्रे सुद्धा खास पद्धतीचे असतात ओढून झालेली सिगारेट त्यामध्ये टाकल्यावर ऍश ट्रे सेल्फ क्लोजिंग म्हणजे ऑटोमॅटिकली बंद होणारी असते. गॅस लायटरला बंदी असल्याने माचीस शिवाय पर्याय नसतो. जेवण बनवण्यासाठी इलेक्ट्रिक हॉटप्लेट, इलेक्ट्रिक ओव्हन आणि मायक्रोवेव्ह असतात. गॅस किंवा स्टोव्ह अशी आग किंवा ज्वाला निर्माण होतील अशी साधने नसतात. संपूर्ण जहाजावर हिट, स्मोक किंवा फायर डिटेक्टर आणि सेन्सर्स लावलेले असतात. जरा कुठे तापमान वाढले, धूर निघायला लागला की लगेच मोठ्याने अलार्म वाजायला सुरवात होते. काही ठिकाणी तर असे अलार्म वाजण्यासोबतच आग प्रतिरोधक यंत्रणा सुद्धा कार्यान्वयीत होते, जसे की वॉटर स्प्रिंकलर किंवा फायर डोअर्स ऑटोमॅटिकली बंद होणे.
कितीही काळजी घेतली आणि कितीही सुसज्ज आणि अत्याधुनिक यंत्रणा लावल्या तरी जहाजांवर आग लागून होणारे अग्नी तांडवांचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. जहाज खोल समुद्रात असो, किनाऱ्याच्या जवळ असो किंवा दुरुस्ती साठी पाण्याच्या बाहेर एकदा आग लागली की विनाश हा अटळच.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply