७ जून १९७५ रोजी पहिल्या क्रिकेट विश्वचषकास क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स येथे सुरुवात झाली. पहिलाच सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात आला.
७ जून ते २१ जून १९७५ दरम्यान खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या मालिकेला मुळात नाव ‘प्रुडेन्शियल कप’ असे देण्यात आले होते. या पहिल्यावहिल्या विश्वचषकात केवळ आठ संघांचा समावेश होता. एकदिवसीय सामन्यांच्या या विश्वचषकामध्ये सहा संघ हे ‘कसोटी’दर्जा असलेले संघ होते, त्यामुळेच ६० षटकांच्या या एकदिवसीय सामन्यांमध्ये भल्या भल्या संघाची भंबेरी उडाली. आठ संघांना दोन भागांमध्ये विभागण्यात आले होते. गट अ’मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, भारत आणि पूर्व आफ्रिका, संघाचा समावेश होता तर गट ब’मध्ये वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका संघाचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये दोन मुख्य टप्पे होते. पहिला टप्पा म्हणजे राऊंड रॉबिन म्हणजेच प्रत्येक गटामधील संघ क्रमवारीप्रमाणे प्रत्येक संघाशी सामना खेळेल. या पहिल्या दोन संघांना दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश मिळत होता. दुसरा टप्पा म्हणजे बाद फेरी (नॉकआऊट राऊंड). इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या या पहिल्या विश्वचषकामध्ये एकूण ३६ सामने खेळले गेले. यामध्ये दोन उपांत्य सामने आणि एका अंतिम सामन्याचा समावेश आहे. आठ संघांपैकी श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका संघांना कसोटी संघाचा दर्जा नव्हता.
पहिल्याच सामन्यात भारताने अभूतपूर्व असा पराक्रम केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ६० षटकांत भारतीय गोलंदाजांना धू धू धूत ४ बाद ३३४ धावा केल्या. यात डेनिस अमिसचे शतक आणि कीथ फ्लेचरचे अर्धशतक होते. दोघांनी अनुक्रमे १३७ (१४७) आणि ६८ (१०७) धावा केल्या. पण शेवटच्या षटकांत माईक डेनिस आणि ख्रिस ओल्ड यांनी तुफान फटकेबाजी केल्याने इंग्लंड ३००च्या पलीकडे पोचले. डेनीसने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या तर ओल्डने ३० चेंडूत तब्बल ५१ धावा केल्या.
यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी इंग्लिश खेळाडूंना अक्षरशः तरसवले, त्यांच्याच भूमीत जन्माची अद्दल घडवली. ६० षटकांत ३३५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेले भारतीय खेळाडू धड धावाही काढत नव्हते आणि बादही होत नव्हते. एकाही भारतीय खेळाडूने शतक किंवा अर्धशतक केले नाही पण सर्व ६० षटके खेळून इंग्लिश खेळाडूंचा घामटा काढला. समालीच्या जोडीतील एकनाथ सोलकरने ८ धावा काढण्यासाठी तब्बल ३४ चेंडू घेतले. त्यात एकही चौकार नव्हता. त्यानंतर आलेला अंशुमन गायकवाडने थोडीफार धुंव्वाधार फलंदाजी केली आणि झोपेत असलेल्या इंग्लिश खेळाडूंमध्ये थोडी जान आणली. अंशुमन गायकवाडची धुंवाधार फलंदाजी म्हणजे २२ धावा करण्यासाठी फक्त ४६ चेंडू घेतले त्यात तब्बल २ चौकार होते. यालाच त्यावेळी त्यातल्या त्यात धुंवाधार फलंदाजी म्हटले जाई.
पुढे अंशुमन गायकवाड बाद झाल्यावर मैदानात आलेल्या गुंडापा विश्वनाथने गायकवाडपेक्षा तुफानी फलंदाजी केली आणि गायकवाडच्याही पुढे जाऊन आपले नाव ठळक केले. आता गायकवाडपेक्षाही धुंवाधार म्हणजेच जिंकण्यासाठी प्रतिषटक ७ ते ८ धावांची धावगती आवश्यक असताना ३७ धावा करण्यास ५९ चेंडू घेणे आणि त्यात ५ चौकार मारणे होय. शेवटी विश्वनाथही ५ चौकार मारून दमून गेला होता,म्हणून विश्रांतीसाठी ओल्डच्या गोलंदाजीवर झेल देऊन तंबूत परतला.
आता आला तो ब्रिजेश पटेल, जिंकण्यास प्रतिषटक तब्बल ८ पेक्षाही जास्त धावा हव्या असताना पटेलने करावे काय? १६ धावा करण्यास फक्त ५७ चेंडू घेतले आणि इंग्लिश खेळाडूंना फार दमावे लागू नये म्हणून एकही चौकार मारला नाही. हे सर्व एका बाजूला सुरू असताना आपला एक सलामीचा फलंदाज दुसऱ्या बाजूला पाय रोवून खेळपट्टीवर उभा होता. इतका पाय रोवून उभा होता की सामना संपेपर्यंत हा खेळाडू बादही झाला नव्हता. सबंध ६० षटके खेळून काढून या पठ्ठ्याने संपूर्ण डावात ३६ धावा केल्या होत्या, त्यासाठी याने घेतले फक्त १७४ चेंडू आणि त्यात एका चौकाराचाही समावेश होता हे त्यहून आणखी विशेष बरं का? ६० षटकांमधील १७४ चेंडू म्हणजे भारताच्या एका डावापैकी अर्धा डाव यानेच खेळून काढला होता आणि भारताने ६० षतकांत केलेल्या १३२ धावांत याच्या ३६ धावा समाविष्ट होत्या. आता सबंध एक डाव खेळून, १७४ चेंडूत ३६ धावा करणारा हा महान खेळाडू कोण बरे असावा, असा प्रश्न नक्कीच पडला असेल नाही? खरंच हा खेळाडू महान होता आणि हाच तो भारताचा महान सलामीवीर लिटिल मास्टर सुनील गावस्कर…… ज्याने जिंकण्यास ६० षटकांत ३३५ धावा हव्या असताना १७४ चेंडूत ३६ धावा केल्या होत्या, आणि त्याही नाबाद ३६…….
आता जिंकण्यासाठी ३३५ धावा आवश्यक असताना अशी धुंवाधार,तडाखेबंद फलंदाजी केल्यावर सामन्याचा निकाल काय असेल हे सांगायलाच पाहिजे का? इंलंडने भारतावर या सामन्यात २०२ धावांनी विजय मिळवला. ही अशी होती विश्वचषकाची सुरुवात…..
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये वेस्ट संघाने ऑस्ट्रेलिया संघासमोर २९२ धावांचे आव्हान ठेवले होते परंतु ऑस्ट्रेलिया संघ २७४ धावांमधेच सर्वबाद झाला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यामध्ये वेस्टइंडीज संघाने १७ धावांनी विजय मिळविला. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स’मैदानावर वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार क्लाईव्ह लॉईडने पहिला विश्वचषक दिमाखात उंचावला.
या विश्वचषकामधील लक्षवेधी घटना
६० षटकांचे डाव असलेले सामने
प्रत्येक संघाला पारंपरिक पेहराव म्हणजेच पांढऱ्या’रंगाच्या पोषाखातच खेळावे लागले.
कसोटी सामन्यांसाठी वापरला जाणारा लाल रंगाचा चेंडू या सामन्यांसाठी वापरला गेला.
इंलंड संघाविरुद्ध सुनील गावस्करांनी १७४ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या, त्यात केवळ एका चौकाराचा समावेश. १७४ चेंडूंमध्ये ३६ धावा करणारे सुनील गावस्करांनी नाबाद ६० षटके खेळून काढली.
श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका संघांना कसोटी संघाचा दर्जा नव्हता.
‘उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू’ हा पुरस्कार या विश्वचषकामध्ये नव्हता.
या विश्वचषकातील महत्त्वाची आकडेवारी
१. संघाची सर्वोच्च धावसंख्या : ३३४/४ इंलंड वि. भारत.
२. संघाची नीचांकी धावसंख्या : ८६ सर्वबाद श्रीलंका वि. वेस्ट इंडीज ८७/१
३. सर्वाधिक धावा : ग्लेन टर्नर ३३३ (न्यूझीलंड)
४. सर्वाधिक बळी : गॅरी ग्लिमूर ११ (ऑस्ट्रेलिया)
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply