नवीन लेखन...

पहिली स्त्री दिग्दर्शिका फातमा बेगम

खरे तर निसर्ग साखळीतील अनेक सजीवांपैकी एक म्हणजे मानव प्राण्याला पण त्याच्या कवटीतील १३०० ते १४०० ग्रॅम वजनाच्या मेंदूने बुद्धीमान, विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत, व्यावसायिक, कल्पक आणि तितकाच सर्वात विखारी प्राणीही बनविले. मानवी वर्तन आणि त्याची विविधांगी वाटचाल तर थक्कच करणारी आहे. चित्रपट या कलेचा अविष्कार झाल्यानंतर अवघ्या १६ वर्षात भारतात पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तो १९१३ मधील दादासाहेब फाळकेंचा “राजा हरिश्चंद्र.” मात्र या चित्रपटात प्रत्यक्ष एकही स्त्री कलावंत नव्हती. तारामती या पात्राचे काम अण्णा साळुंके या पुरूष अभिनेत्याने केले होते. आपल्या येथील सामाजिक मूल्य व्यवस्थेने जी एक चौकट तयार करून ठेवली आहे त्यात सर्वाधिक बंदीस्त झाल्या त्या उच्चकुलीन स्त्रीया. घराचा मूख्य उंबरठा ते मागील परसदार हे त्यांचे कार्यक्षेत्र. अर्थात यात काही अपवाद होते. या परीघा बाहेर जाणे म्हणजे पापाचे भागीदार होणे अशी काहीशी विचारसरणी तेव्हा सर्वमान्य होती. कला मग ती कुठलीही असो आमची मानसिक भूख मोठ्या प्रमाणात भागवते. मात्र या कलेतील स्त्रियांची भागीदारी देखिल पूरूषी संस्कृतीला मान्य नसण्याच्या काळात चित्रपट ही कला भारतात रूजली.

१९१३ मध्येच दादासाहेब फाळके यांनी दुसरा चित्रपट तयार केला नाव होते “मोहिनी भस्मासूर”. या चित्रपटात सर्वप्रथम स्त्री कलाकार म्हणून दुर्गाबाई कामत पडद्यावर दिसल्या. यात त्यांनी पार्वतीची भूमिका साकार केली आणि भारतीय चित्रपटातील पहिली स्त्री कलावंत म्हणून त्यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत नोंदले गेले. याच चित्रपटात त्यांच्या मुलीने म्हणजे कमल कामतने मोहिनीची भूमिका केली व पहिली बाल कलाकार म्हणून त्यांचीही नोंद झाली. दुर्गाबाई कामत यांचे लग्न जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे इतिहासाचे प्रोफेसर आनंद नानोसकर यांच्याची झाले होते. तर त्यांच्या मुलीचे म्हणजे कमल कामत यांचे लग्न रघूनाथराव गोखले यांच्याशी झाले. कमल गोखले यांच्या तिन मुलांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध रंगभूमी व चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले जे चित्रपट व रंगभूमी वरील सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे वडील होत. कमलाबाईनी ३५ चित्रपटातुन भूमिका केल्या. १९८० मधील “गहराई” हा त्यांचा शेवटचा चित्रपट. हा सर्व तपशील सांगण्याचा उद्देश हा की चित्रपटसृष्टीत स्त्रियांनी कामे करणे हे त्याज्य मानले गेले असतांना दुर्गाबाई व कमलबाई यांनी धाडसाने पाऊल ठेवून स्त्रियानां या क्षेत्रात येण्याची वाट मोकळी करून दिली.

चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून अनेक स्त्रियांनी योगदान दिले मात्र निर्माता-दिग्दर्शक-लेखक या क्षेत्रा पासून त्या लांबच होत्या व आजही हे प्रमाण तुलनेने कमीच आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्त्री दिग्दर्शिका कोण असावी? याचे कुतूहल मला होते. ८० च्या दशकात सई पराजंपे, अपर्णा सेन, विजया मेहता, प्रेमा कारंथ व नंतरच्या मीरा नायर याचां चांगलाच बोलबाला झाला. त्यांनी आपली क्षमता सिद्ध करून दाखविली. मात्र १९१३ ते १९८० या काळात स्त्री दिग्दर्शीका (थोडक्यात पहिली स्त्री दिग्दर्शिका) कोण होत्या? या शोधात एक नाव आढळले. १८९२ ला एका उर्दू मुस्लिम कुटूंबात जन्मलेल्या या मुलीचा अभिनेत्री, निर्माता दिग्दर्शक लेखक बनण्याचा प्रवास उर्दू रंगभूमीवरून सुरू झाला. हा प्रवास आणि तिचे स्वत:चे आयुष्य अनेक वळणे घेत पूढे जात राहिले.

फातमा बेगम हे तिचे नाव. सुरूवातीला उर्दू रंगभूमीवर सक्रिय असणारी फातमा वयाच्या १९ व्या वर्षीच आई झाली. सुलताना, झुबेदा आणि शहजादी अशा तिन मुलीनां पाठीशी घेऊन फातमा बेगमने आपला चित्रपटसृष्टीतला प्रवास सुरू केला. चित्रपटसृष्टीला चंदेरी दुनिया असेही म्हणतात पण फातमा बेगमला सुरूवातीला भाकरीच्या चंद्रासाठीही झगडावे लागले. सिद्दी इब्राहिम महम्मद याकूत खान तिसरे हे सचिन प्रांताचे नवाब. सचिन प्रांत ब्रिटीश राजवटीत गुजरातमधील सूरत जिल्ह्यात होता. १८८७ ते १९३० या कालखंडात सिद्दी इब्राहिम महम्मद याकूत खान तिसरे हे येथील नवाब होते. फातमा बेगमच्या तिन्ही मुलीचे जैविक पिता हे नवाब होते मात्र कायदेशिररित्या कोणतीही नोंद कोणत्याच कार्यालयात झाली नाही. अर्थात ते नवाब असलयामुळे फातमा बेगम कोणताही कायदेशीर लढा लढू शकल्या नसाव्यात त्यात त्या मुस्लिम असल्यामुळे अधिक कोंडीत सापडल्या असतील. जगण्यासाठी रंगभूमीने कलावंताना बळ दिले आहे हे सत्य आहे. सर्व जातीधर्म आणि रंगरूपाच्या पलिकडे जाऊन रंगमंच सर्वांना आपलेसे करतो. रंगभूमीवरील काळ्या विंगे आडून कलावंत रंगभूमीवर प्रवेश करतात जिथे रंगमंच प्रकाश झोताने उजळलेला असतो. मानवी आयुष्य देखिल असेच काळातुन काळाकडे प्रवाहीपणे सरकत असते….असो….

आपल्या तीन मुलीनां घेऊन फातमा बेगम अर्देशीर ईराणी यांच्या तंबूत दाखल झाल्या. अर्देशीर म्हणजे चित्रपटसृष्टीतील बडे प्रस्थ. “ईम्पिरीअल फिल्मस्” नावाच्या मोठ्या चित्रपट संस्थेचे ते मालक, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते. (१५ ऑक्टोबर अर्देशिर ईराणी यांचा जन्म दिवस आहे) फातमा बेगम यांना १९२२ मधील “वीर अभिमन्यू” या मूक चित्रपटात सुभद्रेची भूमिका मिळाली. यातील उत्तरा या अभिमन्यूच्या पत्नीची भूमिका फातमाच्या मुलीने म्हणजे सुलतानाने केली होती. तो काळ स्त्री भूमिका पुरूषांनी करण्याचा होता त्यामुळे फातिमाला सहजपणे भूमिका मिळत गेल्या. फातिमा बेगम वर्णाने अत्यंत उजळ असल्यामुळे त्यानां सेपिया टोनचा मेकअप करावा लागे कारण चित्रपट कृष्ण धवल रंगात असत. प्रत्यक्ष जीवनातला आयुष्य नावाचा तारा काहीसा झाकोळला असताना फातमा बेगम मूक चित्रपटाच्या सूपर स्टार बनल्या. नवाब सिद्दी इब्राहिम महम्मद याकूत खान तिसरे यांनी जरी तिच्या अस्तित्वाची दखल देहा पूरतीच घेतली असली तरी रंगदेवतेने मात्र योग्य तीची दखल घेतली.

१९२६ मध्ये म्हणजे चित्रपटसृष्टीत आगमन झाल्या नंतर अवघ्या चार वर्षा नंतर फातमा बेगम यांनी “फातमा फिल्मस्” नावाची चित्रपट संस्था स्थापन केली. पूढे १९२८ मध्ये या संस्थेचे रूपातंर “व्हिक्टोरिया फातमा फिल्मस्” असे करण्यात आले. फातमा बेगम यानां फन्टासी चित्रपटाचे जनक म्हटल्या जाते. ट्रीक फोटोग्राफीचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर या फन्टासी चित्रपटासाठी करत असत. स्वत:च्या संस्थेसाठी त्या स्वत: निर्मिती, पटकथा लेखन, दिग्दर्शन व अभिनय करत तर “कोहीनूर सिनेमा” आणि “इम्पिरीअल फिल्मस्” या संस्थेसाठी अभिनेत्री म्हणून काम करत. १९२६ मध्ये त्यांनी आपल्या संस्थेसाठी “बुलबुल-ए-परीस्तान” या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्त्री दिग्दर्शिका म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली. हा चित्रपट फन्टासी असल्यामुळे बराच खर्चिक होता मात्र आज या चित्रपटाची प्रिंट अस्तित्वात आहे किंवा नाही माहित नाही. या चित्रपटात फातमा बेगम यांच्या दोन्ही मुलींनी म्हणजे झुबेदा आणि सुलताना यांनी भूमिका केल्या होत्या.

त्यांची धाकटी मुलगी झुबेदा ही पहिला भारतीय बोलपट “आलम आरा”ची नायिका झाली. अर्देशीर ईराणी हे या बोलपटाचे निर्माते दिग्दर्शक होते. झुबेदाने हैद्राबादचे राजे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ग्यान बहादूर यांच्या सोबत लग्न केले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले. सचिन संस्थानाच्या मुस्लिम नवाबाची मुलगी हैद्राबादच्या हिंदू महाराजाची पत्नी झाली. फातमा बेगमला मलिका म्हणून नाही न्याय मिळाला मात्र मुलीला ती प्रतिष्ठा मिळाली. संजय दत्त यांची दुसरी पत्नी मॉडेल रिया पिल्लाई ही याच झुबेदाची नात आहे.

फ्रान्सचा जॉर्ज मेलिएस हा फन्टासी चित्रपटाचा जनक मानला जातो. याच धर्तीवर फातिमा बेगम यांना भारतीय फन्टासी चित्रपटाचे श्रेय देण्यात यायला काहीच हरकत नाही. निर्माती, अभिनेत्री व दिग्दर्शक म्हणून “बुलबुल-ए-परीस्तान” “हिर रांझा”, “नसीब की देवी”, “चंद्रावली”, “कनकतारा”, “शंकुतला” “मिलन” आणि “गॉडेस ऑफ लक” हे सर्वच मूकपट त्याकाळी खूप गाजले. खरे तर १९२० चे दशक स्त्रियाच नाही तर पुरुषांनीही चित्रपटात काम करणे यानां मान्यता देणारे नव्हते त्यामुळे अशा पार्श्वभूमिवर फातमा बेगम सारखी सनातनी मुस्लिम कुटूंबातील स्त्री येथे येऊन निर्माती, लेखक, दिग्दर्शक व अभिनेत्री म्हणून आपले स्थान निर्माण करते ही खरोखरच कौतुकांची व विचार करण्यासारखी बाब आहे. आज चित्रपटसृष्टीतील स्त्रियांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याच्या मागे जे प्रेरणास्त्रोत असतात ते फातमा बेगम सारख्या जिद्दी स्त्रीचे. १९३८ चा “दुनिया क्या कहेगी” हा त्यांचा शेवटचा चित्रपट. आपल्या १६ वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील अखंड प्रवासा नंतर फातमा बेगम यांनी निवृत्ती पत्करली. १९८३ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.

चित्रपट हे माध्यम खरे तर दिग्दर्शकाचे असते अशी पूर्वी पासून मान्यता आहे. मात्र हळूहळू हे माध्यम चित्रपटास अर्थ पूरवठा करणारे आणि नंतर स्टार नायकांकडे हस्तातंरीत झाले. आता जागतिक ग्लोबलायझेशनच्या काळात व्यवसाय हेच मूख्य धोरण असल्यामुळे दिग्दर्शकाला अनेक तडजोडी कराव्या लागतात. ८०च्या दशकानंतर मात्र दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्त्री दिग्दर्शकांनी मिळवलेले स्पृहणीय यश बघता फातमा बेगम सारख्या दिग्दर्शिकेला विसरून कसे चालेल?

— दासू भगत.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..