ऑगस्ट १९४७! स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक रक्तरंजित तरीही सोनेरी महिना !
मी त्यापैकी ८।। वर्षाचा होतो. प्रभादेवी -बेंगॉल केमिकल भागात राहात होतो. त्यावेळी आतासारखं उंच उंच सिमेंटच्या इमारतींचे ‘रान’ नव्हते ! छोट्या छोट्या वाड्या होत्या. भरपूर नारळाची-ताडाची आणि आंबे फणसांची झाडेच झाडे होती. सगळीकडे हिरवंगार आणि थंडगार ! समोरच्या गावकर वाडीमध्ये अण्णा राऊत नावाचे सधन गृहस्थ राहात होते. नारळी, आंबे, फणस, केळी, चिचांच्या झाडांच्या मध्ये त्यांचे कौलारु बैठे सुबक घर लपलेले होते ! त्यांचेकडे मोठा “लेलँड’ ट्रक होता,, घेतलेला!! सतरा हजारांचा !!
प्रेमळ अण्णांनी ट्रक सजविला, सर्वांना हाक दिली… ट्रकमध्ये बसायला किंतान पसरलं, आम्हांला मुलांना, बायकांना, पुरुषांना सर्वांना हांक दिली… “चला, मुंबई फिरायला चला !”‘ क्षणार्धात ट्रक भरला !! तरुण उत्साही मुलांनी आम्हां छोट्यांना उचलून उचलून ट्रकमध्ये टाकले ! आणि आम्ही निघालो.
रस्ते माणसांनी भरभरुन जणू वाहात होते. हिंदु-मुसलमान शीख-ख्रिश्चन हातात हात घालून…
“भारत माताकी जय”
“वन्दे मातरम”, “जय हिंद”
चे नारे लावत होते. ते सर्व स्वतंत्र भारताचे. “भारतीय” नागरिक होते !!
सर्व सरकारी इमारतींवर लाखो विजेच्या दिव्यांची विविधरंगी कलात्मक आकर्षक रोषणाई केली होती.
फटाके वाजत होते, वातावरण धुंद होते. अफाट जनसागरातून आमचा ट्रक मुंगीच्या पावलांनी वाट काढीत सरकत होता. पहाटेचे चार केव्हा वाजले ते कळलेच नाही! आठवतात… त्या विजेच्या रोषणाईने नटलेल्या सुंदर सुंदर इमारती !!!
बोरीबंदर स्टेशन, त्या समोरची म्युनिसिपल बिल्डिंग मुंबई हायकोर्ट, गेटवे ऑफ इंडिया, रेडियो क्लब, चर्चगेट स्टेशन सर्व प्रकाशाने उजळून निघाले होते. गेटवे समोरील समुद्रात लायटिंग करुन ठेवलेल्या उभ्या असलेल्या मोठमोठ्या बोटींनी डोळ्यांचे पारणे फेडले. त्यांच्या सुंदर रोषणाईंचे प्रतिबिंब समुद्रातील पाण्यावर हेलकावे खाताना अधिकच मोहक दिसत होते. बोटीवरुन सोडलेल्या फटाक्यांनी आकाश उजळून निघत होते.
दुसरे दिवशी आमच्या म्युनसिपलच्या शाळेत टोपल्या भर भरुन मिठाई आली. प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक मिठाईचा पुडा देण्यात आला. सोबत एक नक्षीदार मेडल ! एका बाजूला भारत व दुसर्या बाजूला रंगीत तिरंगा !!! सभोवती छान कोरलेली नक्षी 1! मी ते आठवण म्हणून आजही जपून ठेवले आहे… परंतु या आनंदाला दु:खाची न विसरता येणारी झालर होती. आठवतात…. ते असंख्य देशभक्त ! ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. बेडरपणे हातात प्राणप्रिय तिरंगा घेऊन जुलमी इंग्रजांच्या लाठ्या-काठ्या-गोळ्या बेधडक छातीवर झेलल्या !! प्रेमाची माणसे आणि सुखाचे संसार सोडून मृत्युला कवटाळणारा शहीद भगतसिंग-सुखदेव-राजगुरु आठवतो. वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, कान्हेरे, चाफेकर बंधु, तात्या वटोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई ! कोवळा शिरीषकुमार, निधड्या छातीचा बाबू गेनू ! आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाष बाबू कॅप्टन लक्ष्मी, महात्मा गांधी, पंडित नेहरु….. आणखी कितीतरी… आठवणींनी मन अभिमानाने भरुन येते.
कसे होते ते दिवस?
परकियांच्या दादागिरी-जुलुमाखालचे ते दिवस…. आंदोलन, पळापळ, पाठलाग, गोळीबार आणि आक्रोश !!
आमचा रस्ता म्हणजे तेव्हांचा “मेनरोड! विमानतळ, माहीम, कॅडेलरोड, प्रभादेवी-वरळी, महालक्षमी ते राजभवन !! या रस्त्यावरुन राजरोस दिवसा-रात्री पोलिस आणि सैनिकी गाड्या ये-जा करीत. तोफ गाडीवर बसलेले गोरे सोल्जर्स घाबरविण्यासाठी उगाचच गोळीबार करीत. मला आठवतं… आम्ही मुलांनी त्यांचं उट्ट काढण्यासाठी त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक करुन धूम ठोकली होती.
जमावबंदी तर नेहमीच _ असे. पोलिसांची दंडेलशाही तर विचारुच नका, दिवाळी-शिमगा आणि गणपती या सणांना थोडी सूट असे. त्यावेळी गणपती उत्सवात नाटकं होतं. तसेच विहंग ‘मेळे’ होत! मेळा हा नाटकासारखाच प्रकार, पण थोडा अधिक आकर्षक ! आमचा ओढा त्याच्याकडे जास्त. कारण मेळ्यात नृत्ये असत, तसेच तलवार बाजी-लढाई ही असे ! अधिकतर विषय देशभक्तांवर आधारित असत.
मला आठवते…. अशाच एका ‘शहीद भगतसिंग’ मेळ्यामध्ये शेवटच्या प्रवेशात भ्रगतसिंग-राजगुरु-सुखदेव यांना फासावर लटकावण्याचा देखावा होता. सर्वांना रोमांचित अचंबित करणारा. हा प्रसंग सी आजपर्यंत विसरु शकलो नाही, इतका तो आमच्या मनावर कोरला गेला आहे. कारण भगतसिंगाच्या भूमिकेत स्वतःला झोकून दिलेला तो तरुण फासाच्या दोरीने वर उचलला गेला होता… थोडा थोडका नव्हे तर चांगला वीतभर !! पडदा पडला… पण टाळ्यांचा कडकडाट कितीतरी वेळ होतच राहिला. धन्य तो नट आणि त्याची निष्ठा.
स्वजनांचे ते बलिदान, गुलामगिरीतील ते लाजिरवाणे जिणं? यांनी मनात एक इर्घ्या मूळ धरु लागली… अन्यायाविरुध्द बंड करण्याची! लढा देण्याची !! संधी मिळताच सैन्यात भरती झालो. १९७१ च्या भारत-पाक युध्दात शौर्य-पदक मिळवून ‘सुभेदार’ की मिळविली. इच्छा पुरी झाली ! परममुख मिळाल्याचा आनंद झाला. जितका १५ ऑगस्ट १९४७ ला झाला होता !!!!
संकलन : शेखर आगासकर
मूळ लेखक सुभेदार अनंत पां. म्हात्रे, ठाणे यांनी लिहिलेला उत्तम कथा (वर्ष – जुलै २०१८) मधील लेख
Leave a Reply