१६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला गेला.
१६ डिसेंबर १९७२ रोजी नाट्यगृहातील तिसरी घंटा घणघणली. प्रेक्षागृहातील दिवे विझले. रंगमंचाचा दर्शनी पडदा बाजूला झाला. धूसर प्रकाशात मागील काळ्या पडद्याच्या पाश्र्वभूमीवर एक चौकोनी कमान! त्यावर मधोमध श्रीगजाननाची मूर्ती. रंगमंचाच्या मध्यभागी एक निरांजनाचे तबक. त्याच्यामागे प्रेक्षकांना जमिनीवर मस्तक टेकवून अभिवादन करणारा कोणी एक तरुण कलाकार. मृदुंगावर दमदार थाप पडली. मृदुंगाच्या तालावर तो कोणीएक उभा राहिला. तबकातील फुले त्याने प्रेक्षकांच्या दिशेने उधळली. निरांजनाच्या ज्योती अधिकच उजळल्या. मृदुंगाच्या लयीवर तो तरुण नाचू लागला. आता त्याच्या नाचाचा वेग वाढला. नृत्य संपवून तो रंगपटात गेला. रंगमंचावर अस्पष्ट प्रकाश. आणि
पुन्हा प्रेक्षागृहातील दिवे उजळले. प्रेक्षकांच्या मागील बाजूने आवाज घुमला- ‘श्रीगणराय!’ हा घोष वाढत गेला. करवतकाठी धोतर, बाराबंदी, गळ्यात करवतकाठी उपरणे, डोईवर पेशवाई पद्धतीचे चक्री पागोटे, कानात भिकबाळी, कपाळी दुबोटी गंध, भुवईत शेंदूर अशा वेशातील बारा-पंधरा ब्राह्मण ‘श्रीगणराय’चा निनाद करीत प्रेक्षकांतून वाट काढीत रंगमंचावर अवतरले. त्यांनी रंगमंचावर रांग केली. हात जोडून पुतळ्यासारखे स्तब्ध उभे राहिले. पुन्हा मृदुंगावर दमदार थाप पडली. श्रीगजाननाचा मुखवटा धारण केलेला एक कलाकार रंगमंचावर आला आणि लयदार पावले टाकीत रंगमंचावर पदन्यास करू लागला. आता तो पाठीमागील नि:स्तब्ध असलेला ब्राह्मणांचा पडदा सजीव झाला.
झुलू लागला. गाऊ लागला.
‘श्रीगणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी।
बामण हरी नर्तन करी, श्रीगणराय फेर की धरी।।’
नमन संपले आणि ब्राह्मणांच्या पडद्यातील कलाकारांनी रंगमंचावर वेगवेगळ्या ठिकाणी वाद्यांच्या तालावर वेगवेगळे गट केले. वाद्यांचा वेग आणि आवाज टिपेला पोहोचला आणि सूत्रधाराने रंगमंचावर प्रवेश केला. ‘हो! हो!! हो!!!’ असा आवाज देऊन वाद्यांना थांबविण्याचा इशारा त्यानं केला आणि मागे स्तब्ध झालेल्या ब्राह्मणांची ओळख करून दिली.
‘हे सर्व पुण्याचे ब्राह्मण!’
आता एक-एक गट आपली ओळख करून देऊ लागला. ह्यवेदान्तशास्त्री, ज्योतिषमरतड, आम्ही कुंभकोणम्, आम्ही बनारस..रंगमंचावर एक अद्भुत नाटय़ साकारत होतं.
पहिला अंक संपला नाना फडणवीसांच्या (मोहन आगाशे) स्वगत, पण जाहीर आदेशानं- ‘घाश्या, अक्करमाश्या, केला केला तुला कोतवाल..’आणि सूत्रधाराने दवंडी घुमवली.. ‘ऐका हो ऐका, आजपासून घाशीराम सावळदास यास पुण्याचा कोतवाल केला आहे होऽऽऽ’ साध्या सुती धोतर-अंगरख्यातील घाशीराम धिमी पावले टाकीत रंगमंचाच्या मधोमध उभा राहिला. दोन ब्राह्मणांनी नम्रपणे त्याच्या अंगावर रेशमी अंगरखा चढवला. कंबरपट्टा बांधला. डोईवर सरदारी पगडी चढवली. तबकातील आसूड घाशीरामाच्या हाती दिला. घाशीरामाने रंगमंचावर विखुरलेल्या, नतमस्तक झालेल्या अवघ्या ब्राह्मणांवर करडी नजर फिरवली. त्याच्या हातातील आसूड कडाडला आणि त्याने विकट हास्य केले- हाऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ आणि पहिला अंक संपला. दुसऱ्या अंकाचा पडदा उघडला तोच मुळी अतिशय आक्रमक, अंगावर येणाऱ्या गीताच्या आणि पदन्यासाच्या तालावर. गीताचे शब्द तेच होते, पण त्यांचा आविष्कार अत्यंत वेगळा होता..
श्री गणराय नर्तन करी। आम्ही पुण्याचे बामण हरी।
बामण हरी नर्तन करी। श्रीगणराय फेर की धरी।।
ब्राह्मणांच्या पडद्याच्या मधोमध असलेला सूत्रधार पुढे आला आणि पुन्हा ह्यहोऽ होऽ होऽह्ण करीत पडद्याचा आवाज त्याने थांबवला आणि घोषणा केली-
‘पुण्यनगरीत घाशीराम कोतवाल झाले.’
पडद्याचा कोरस घुमला- ‘झाले!’
‘त्याचा कारभार चाले हो, कारभार चाले।
गौरी बोले, नाना डोले, घाशीरामाचे फावले साचे।
गौरी नाचे, नाना नाचे, घाशीरामाचे फावले साचे।’
आणि पुढील कथानकात पुण्यावर कडक ‘घाशीरामी’ सुरू झाली. एके ठिकाणी घाशीराम फसला आणि अखेर शेवटी शेवट आला. एक हात जेरबंद करून घाशीरामाला ब्राह्मणांच्या पुढे सोडला. संतप्त जमावाने त्याच्यावर दगडधोंडय़ांचा वर्षांव सुरू केला. जखमी, घायाळ, हिंस्र श्वापदासारखा रक्तबंबाळ घाशीराम गर्जना करतोच आहे- ‘मी तुमच्या छाताडावर नाचलो. मारा, ठेचा मला.ह्ण मग एका भल्या धिप्पाड ब्राह्मणाने एक जड शिळा उचलली. आपल्या दोन्ही उंच हातांवर भक्कमपणे पेलली आणि जखमी घाशीरामाच्या मस्तकावर दाणकन् आदळली. घाशीराम गप्पगार झाला. आहे त्या स्थितीत जमाव गोठला आणि भग्न शिराच्या घाशीरामाचे मृत्यु नृत्य सुरू झाले. ताशा कडाडला, टिपेला चढला आणि एका असहाय क्षणी तो धरणीवर कोसळला. कायमचा. जमावाने विजयी आरोळी ठोकली आणि धीरगंभीर पावले टाकीत नानांनी प्रवेश केला. सर्व जमावाने कमरेत वाकून त्यांना अभिवादन केले. नानांनी हातीच्या काठीने ढोसून घाशीराम नक्की मेला आहे, याची खात्री केली. त्यानंतर नाना रंगमंचाच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात आले. प्रकाशवलय फक्त त्यांच्यावर.
मग नानांनी पुण्यनगरीला आवाहन केले- ‘पुण्यपतनस्थ नागरिकहो! या नगरीवरील एक महान संकट सरले. एक रोग टळला. आपणा सर्वाना छळणाऱ्या नरकासुराचा- घाश्या कोतवालाचा वध झाला. श्रीच्या कृपेने सर्व यथायोग्य पार पडले. त्याची कृपा आपणा सर्वावर आहेच.. या शुभ घटेनेनिमित्त पुण्यामध्ये तीन दिवस उत्सव चालावा अशी आमची आज्ञा आहे.’
आरोळ्या ठोकीत पांगलेला ब्रह्मसमुदाय पुन्हा रांगेत उभा राहिला. पुन्हा दणक्यात-
‘श्रीगणराय नर्तन करी। आम्ही पुण्याचे बामण हरी।।’चा द्रुतलयीत कोरस सुरू झाला. नानांनी गुलाबीला खुणेनं बोलावले. नानांच्या भोवती नाचून ती आत गेली. ब्राह्मणांचा पडदा घाशीरामाचे कलेवर ओलांडून पुढे आला.
नानाही त्या बारा ब्राह्मणांच्या रांगेत सामील झाले आणि पुन्हा एकवार..
‘श्रीगणराय नर्तन करी। आम्ही पुण्याचे बामण हरी।।
बामण हरी नर्तन करी। श्रीगणराय फेरच की धरी।।’
चा गजर सुरू झाला. दर्शनी पडदा पडला. खेळ संपला.
या नंतर ऑक्टोबर १९८० मध्ये ‘घाशीराम’चे प्रयोग लंडनला हॅमरस्मिथमध्ये रिव्हरसाइड स्टुडिओ या नाट्यगृहात सलग आठ दिवस झाले. पहिल्या प्रयोगाला लंडनच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे नाटय़- समीक्षक आले होते. त्यांची पद्धत म्हणजे प्रयोग झाला की परीक्षण लगेच दुसर्या दिवशी छापून येते. ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने सविस्तर परीक्षण तर दिलेच, पण सोबत ‘घाशीराम’ नाटकाच्या शेवटी जे दृश्य दिसते, ते म्हणजे पुढे घाशीराम मरून पडलेला आहे, मागे बामणहरींची रांग उभी आहे, त्या रांगेत नाना फडणवीस समाविष्ट होतात. हे मागे चौथर्याेवर उभा राहून एक इंग्रज अधिकारी पाहत असतानाच भैरवीच्या सुरावटीत ‘श्रीगणराय नर्तन करी..’ या नमनाच्या ओळी म्हटल्या जातात. आणि ठेका सुरू होताच पडदा पडतो. ‘गार्डियन’ने नेमक्या या शेवटच्या दृश्याचा फोटो छापला; ज्यात इंग्रज अधिकारी मागे उठून दिसतो आणि वर हेडलाइन दिली- ‘नो पन् इंटेन्डेड’ (म्हणजे ‘टीकेविना’ याअर्थी)! कारण १८१८ मध्ये पेशवाई गेली आणि इंग्रज आले, हा इतिहास सर्वश्रुत आहे. हे इतिहासाचे भान त्या समीक्षकाला होते.
१९८६ घाशीराम कोतवालचे ‘थिएटर ऑफ नेशन्स’ या युनेस्कोप्रणीत आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात प्रयोग झाले. हे प्रयोग अमेरिकेत बाल्टिमोर इथे झाले. ज्या नाट्यगृहात हे प्रयोग झाले ते १८४७ मध्ये स्थापन झालेल्या जगप्रसिद्ध जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संगीत विभागात- म्हणजे १८५७ पासून ख्यातकीर्त असलेल्या ‘पीबडी म्युझिक कॉन्झव्र्हेटरी’मध्ये होते. प्रयोगाला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकसमूह होता. एका बाजूने स्थानिक पातळीवर काही मराठी मंडळींचा विरोध आणि दुसर्या् बाजूने नंतरच्या काळात या नाटकाला मिळालेली जागतिक मान्यता, असा परस्पर विरोधदर्शी योग या नाटकाच्या नशिबी आला. यातला विरोध प्रयोगपद्धतीला वा सादरीकरणाला नव्हता, तर मूळ नाट्यकृतीला होता.
विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. त्या वेळी मोहन आगाशे, रमेश टिळेकर, स्वरुपा नारके, मोहन गोखले, सुरेश बसाळे, रमेश मेढेकर, नंदू पोळ, आनंद मोडक, उदय लागू, चंद्रकांत काळे, रवीन्द्र साठे, सुषमा जगताप, अशोक गायकवाड, श्रीकांत राजपाठक, भोंडे या कलाकारांनी घाशीराम कोतवाल हे नाटक रंगविले. या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल, नृत्य दिग्दर्शन कृष्णराव मुळगुंद व संगीत दिग्दर्शन भास्कर चंदावरकर यांनी केले होते.
ओम पुरींनी एफटीआयच्या काही माजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन १९७६ मध्ये ‘युक्त को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ स्थापन केली. या संस्थेद्वारे एका राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेऊन ‘घाशीराम कोतवाल’ नाटकावर पूर्ण वेळेचा चित्रपट तयार बनवला. मात्र चित्रपटाची तेवढी चर्चा झाली नाही. पटकथा तेंडुलकरांचीच होती. त्यात मोहन आगाशे नाना आणि घाशीरामच्या भूमिकेत ओम पुरी होते. या चित्रपटाला कुणी एक असा दिग्दर्शक नव्हता. पण नंतर चित्रपटातून गाजलेले मणी कौल, सैद मिर्झा, के. हरिहरन, कमल स्वरूप असे तिघे चौघे जण दिग्दर्शकीय भूमिकेत होते. कलाकृती कुणा एकाची नाही तर सर्जनात्मक सहकाराने चित्रपट निर्माण करायचा अशी या ‘युक्त’ चमूची संकल्पना होती. हा चित्रपट बर्लिनला १९७६ साली यूथ फोरममध्येही दाखवला गेला होता. पण त्याची फारशी कोणी तिकडे दाखल नाही घेतली.
‘घाशीराम’मुळे ‘थिएटर अॅकॅडमी’चे नाव जगभरात पोहोचले. या नाटय़संस्थांच्या माध्यमातून अनेक नाटके सादर झाली. ‘घाशीराम कोतवाल’या पहिल्याच नाटकाने थिएटर अकॅडमीची भारतभरातील नाटय़सृष्टीत चर्चा सुरू झाली. या नाटकाबरोबरच थिएटर अकॅडमीनं तीन पशाचा तमाशा, महापूर, महानिर्वाण, बेगम बर्वे, पडघम, अतिरेकी, मिकी आणि मेमसाहेब, प्रलय, डॉल हाऊस अशी नाटके सादर केली.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
घाशीराम कोतवाल नाटक.
Leave a Reply