खनिजापासून लोखंड बनविण्याच्या प्रक्रियेचा विकास होण्याआधी माणसाला लोखंड माहीत होते. पृथ्वीवर सापडणाऱ्या अशनीमध्ये एक काळ्या रंगाचा धातू मिळत असे. त्या काळात इजिप्तच्या लोकांनी त्याला काळे तांबे असे नाव दिले होते. हा धातू म्हणजे लोखंड आणि ६ ते ८ टक्के निकेल यांचे संमिश्र असे. असे अशनीमधून मिळणारे लोखंड दुर्मीळ होते आणि त्याचा वापरही. मुख्यतः दागिने बनविण्यासाठी होई. लोखंड या m काळात दुर्मीळ असल्याने, त्याची किंमत त्या काळात सोन्याच्या पाचपट होती.
इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास हेमाटाइट या खनिजाचे कोळशाच्या साहाय्याने क्षपण करून लोखंड बनवण्याच्या कलेचा विकास झाला आणि लोहयुगाला सुरुवात झाली. क्षपण क्रिया करण्यासाठी भट्ट्यांचा वापर केला जात असला तरी या भट्ट्यांचे तापमान लोखंडाच्या वितळण बिंदूपर्यंत जात नसे. त्यामुळे घन अवस्थेतच खनिजाचे क्षपण होऊन धातू रूपातले लोखंड तयार होई. या प्रकारात खनिजातल्या सिलिकेट्सचे काचेसारख्या मळीमध्ये रूपांतर होऊन ती मळी लोखंडात अडकून बसे. तयार झालेला धातूचा गोळा मळीमुळे छिद्रयुक्त स्पंजसारखा दिसत असे. म्हणून या लोखंडाला स्पाँज आयर्न असे म्हणत.
हे स्पाँज आयर्न पुन्हा तापवून ते ठोकून त्याला वेगवेगळे आकार दिल जात. या ठोकण्यामुळे अडकलेली मळी पुष्कळ प्रमाणात वेगळी होत असे. मागे उरणारे लोखंड पुष्कळसा धातू आणि अगदी थोड्या प्रमाणात मळी या स्वरूपात मिळे. त्याला रॉट आयर्न असे म्हणत. या सगळ्या प्रक्रियेत भट्टीचे तापमान जास्त होऊन लोखंड वितळले तर त्यातून मळी वेगळी होत असे, पण वितळलेल्या लोखंडात खूप कार्बन विरघळून त्याचे ओतीव लोखंडात रूपांतर होई. जास्त कार्बनमुळे ओतीव लोखंड खूप ठिसूळ होई आणि त्याला ठोकले असता त्याचे तुकडे पडत. त्यामुळे त्या काळात भट्टीचे तापमान खूप वाढणार नाही याची काळजी घेतली जाई.
Leave a Reply