२६ फेब्रुवारी २०१९ पहाटेचे ३.३० वाजले होते. स्थळ होतं पाकिस्तानातील दहशतवादी तळ, पाकिस्तानी हवाई हद्दीत अचानक लढाऊ विमानांचे जोरदार आवाज ऐकू येऊ लागले. सर्व शांत झोपेत होते, एकानंतर एक स्फोटाने हडकंप माजला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने बदला घेण्यासाठी ऑपरेशन बंदर अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक २ केलं. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
१९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्यांनी पाकिस्तानाच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्यही बिथरलं. त्यांना प्रत्युत्तर देण्याची संधीही भारताने दिली नाही. ग्वालियरपासून उड्डाण घेतलेले भारतीय वायूसेनेचे १६ मिराज २००० ही लढाऊ विमाने मध्यरात्री साडेतीन वाजता पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत घुसली. या विमानाने बालाकोट भागात बॉम्ब हल्ले चढवले. जैशच्या दहशतवादी तळांना टार्गेट केले गेले. यात अनेक दहशतवादी ठार झाले.
२६ फेब्रुवारी २०१९ पहाटे साडेतीन ते साडेचार या वेळेत वायूसेनेने हा हल्ला केला होता. यावेळी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भारतीय हल्ल्याची जराही सुगावा लागला नाही. हल्ला करुन सर्व लढाऊ विमान सुरक्षितपणे भारताच्या हद्दीत परतली. एअरफोर्सने उध्वस्त केलेला दहशतवादी तळ टेकडीवर आणि नागरी भागापासून दूर बालाकोटच्या घनदाट जंगलात होता, त्याचे नेतृत्व जैश-ए-मोहम्मदच्या मौलाना युसुफ अझर करत होता. मसूद अजहरचा हा नातेवाईक होता.
या हल्ल्याची प्रथम माहिती पाकिस्तानी लष्कराचे तत्कालीन प्रवक्ता मेजर जनरल असिफ गफूर यांच्या ट्विटमधून समोर आली. गफूरने लिहिले होते की, भारतीय हवाई दलाने मुझफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाकिस्तानी सैन्याने वेळीच प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानचं कोणतंही नुकसान झालं नाही असा दावा केला. त्याच दरम्यान भारताने भडकाऊ कारवाई केल्याचं उत्तर देण्याचा अधिकार आहे असं पाकिस्तान सरकारने म्हटलं. पाकिस्तानच्या दाव्याच्या प्रत्युत्तर देत या हल्ल्यात दहशतवादी तळ नष्ट झाल्याचे अनेक पुरावे भारताने दिले.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply