पहिल्यांदाच इंडोनेशियात जाणार असल्याने हजारो लहान मोठी बेटं असणाऱ्या देशात जायला मिळणार म्हणून मोठा उत्साह होता. जकार्ता पोर्ट यायला अजून अठरा ते वीस तास लागणार होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास क्षितिजावर भूभाग दिसू लागला. उंच डोंगर असलेले एक बेट असल्याचे पंधरा मिनिटात आकारावरून जाणवले, त्याच्यापासून काही अंतरावर आणखीन लहान लहान बेटे दिसू लागली. ब्रिजवर जाऊन बायनोक्युलर घेऊन बेटांचे हिरवेगार सृष्टी सौंदर्य बघता बघता कॅप्टन ने सांगितले, इथे अशी भरपूर बेटे आहेत की ज्यांच्यावर ज्वालामुखीचा उद्रेक कधी होईल ते सांगता येणार नाही. या असंख्य बेटांच्या खाली धगधगणारे कितीतरी जागृत आणि निद्रिस्त ज्वालामुखी बाहेर यायला तडफडत असतात.
समुद्राखाली भूगर्भातल्या हालचालींमुळे होणारे भूकंप आणि त्यातून उदभवणारी त्सुनामी आली तर जहाजाला सहजच गिळंकृत करून पुढे निघून जाईल अशी भिती मनात आली.
उद्या दुपारी तीन पर्यंत जकार्ताला पोहचू असं ड्युटी ऑफिसरने सांगितले. दुसऱ्या दिवशी जकार्ता मध्ये गेल्या गेल्या चार दिवस कार्गो लोड करण्यासाठी जेट्टी मिळेपर्यंत जहाज नांगर टाकून उभे करण्यात येणार होते. पुढील चार दिवस मेंटेनन्सचे महत्वाचे काम नसल्याने फारसा ताण नव्हता. दिवसभरात इंजिन रूम मध्ये सगळ्यात खाली चौथ्या मजल्यावर वर एका पाईप लाईनचा लिकेज दुरुस्त करता करता जिने चढ उतार केल्याने खूप दमायला झाले होते. संध्याकाळी सहा वाजता डिनर झाल्यावर प्रत्यक्ष झोप यायला रात्रीचे अकरा वाजले पण,काही गूढ आवाजांनी झोप उडाली.
ढूप ढूप करून येणाऱ्या आवाजांनी जाग आली. बेड लॅम्प लावून घड्याळात बघितले तर पहाटेचे साडेचार वाजले होते. एका मागून एक आवाज येतच होते. साडेचार वाजता पोर्ट होल मधून केबिन मध्ये पडणारा तांबूस रंगाचा उजेड बघितल्यावर डेकवर या वेळेला फ्लड लाईट्स का लावले असावेत ते बघण्यासाठी अंगावरचे ब्लॅंकेट काढून पोर्ट होल समोर उभा राहिलो. डेकवरचे फ्लड लाईट्स तर बंद होते, तसेही रात्री जहाजावर डेकवर असलेल्या सगळ्या लाईट्स बंद असतात ज्यांच्या केबिन मधील लाईट चालू असतात त्यांना पोर्ट होल चे पडदे लावून ठेवायला सांगतात कारण त्यामुळे ब्रिजवरून रात्रीच्या अंधारात लांबवर नजर टाकायला अडचण येते.
जहाजापासून दूरवर एका डोंगर माथ्यावर आगीच्या ज्वाला उसळताना दिसत होत्या. जस जशी ज्वाला उसळताना दिसत होती तसं तसा त्यामागून ढूप ढूप करून लहान मोठा आवाज येत होता. जेवढी उंच ज्वाला तेवढाच मोठा आवाज. ज्वालेच्या वरती धुराचा लोटही तशाच प्रमाणात वर आकाशात उसळत होता. दिवाळीच्या फटाक्यातल्या पावसा प्रमाणे समोरील बेटावरील डोंगर भासत होता फरक एवढाच की फटाक्या प्रमाणे प्रखर प्रकाशा ऐवजी ज्वाले प्रमाणे पिवळसर तांबूस छटा बाहेर पडत होत्या. डोंगर माथ्यावरून आकाशाकडे उसळणारी ज्वाला बाहेर पडताना पिवळी धम्मक आणि वर आकाशाला भिडताना तांबूस होत जाऊन अखेरीस लाल होत होती. लाल रंग नंतर काळ्या धुरात विसळून आणखी वर वर जात होता. एका डोंगरातून आकाशात बॅटरी प्रमाणे प्रकाशझोत सोडल्यासारखे कधीही न पाहिलेले आणि कल्पने पलीकडील दृष्य दिसत होते. अंधारात चाललेला निसर्गाचा अनोखा खेळ बघताना विलक्षण वाटत होते, असं प्रत्यक्षात घडू शकते आणि आपण पाहू शकतो याच्यावर स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही विश्वास बसत नव्हता.
डोंगर माथ्यावरून निघणाऱ्या ज्वाला डोंगराच्या पायथ्यावरुन, मध्यावरून का निघत नसाव्यात याचे कुतूहल वाटू लागले पण लगेचच तो डोंगरच जर बाहेर पडणाऱ्या तप्त लाव्ह्या पासून बनला असेल असं वाटून मला पडलेले कुतूहल लगेचच शमले. बराच वेळ जहाज ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या बेटाच्या दिशेनेच चालले होते पण जहाजाची दिशा बदलली असल्याचे जाणवले कदाचित कॅप्टन ब्रिजवर गेला असावा आणि त्याने जहाज बेटाजवळून न नेता लांबून वळवण्यासाठी सूचना दिल्या असाव्यात.
डोंगर माथ्यावरून उसळणाऱ्या तप्त लाव्हा रसाला बघता बघता दिवस उजाडायला सुरवात झाली. जहाज बेटा पासून बरेच लांबून जाणार होते परंतु क्षितिजावर असताना दिसलेला ज्वालामुखीचा रंगीबेरंगी खेळ संपूर्ण डोंगर आणि बेट दृष्टीच्या टप्प्यात येईपर्यंत सुरूच होता. उजाडायला सुरुवात झाली तरी ज्वालामुखीचा उद्रेक सुरूच होता. उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे लाटांवर पसरू लागली होती आणि अशातच रात्रीच्या अंधारावर स्वार झालेला ज्वालामुखी नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याला सुद्धा आव्हान देऊ पाहत होता.
जहाज आता बेटाला समांतर होऊन समुद्राला कापत निघाले होते. सोनेरी लाटा निळ्या आकाशाच्या प्रतिबिंबाने निळ्याशार झाल्या होत्या. डोंगर माथ्यावरून उसळणारा लाव्हा रस बेटाच्या बाहेर उसळून समुद्राच्या पाण्यात उडत होता. रात्री दिसणारा ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्हा डोंगर माथ्यावरून खाली ओघळत होता. तप्त लाल लाव्हा समुद्राच्या निळ्या पाण्याला भिडून वाफेत रूपांतरीत होत होता. वाफेमुळे समुद्राच्या पाण्यावर धुक्याचा पडदा उभा राहिला होता. धुक्याच्या पडद्या आड अस्पष्ट अशी डोंगराची आकृती दिसत होती. बेटाच्या किनाऱ्या भोवती काळा रंग समुद्राच्या निळ्या पाण्यात विरघळत होता डोंगराच्या बाजूला असणाऱ्या एका टेकडीवर दाट झाडी आणि जंगल दिसत होते पण आकाशात उडणाऱ्या राखेच्या थरांनी जंगल हिरवेगार न दिसता भुरकट राखाडी दिसत होते. रात्रीचा गूढ आवाज आता स्पष्ट पणे ऐकू येत होता लहान मोठे स्फोट होऊन लाव्हा उसळतच होता.
जहाजाच्या एका बाजूने शेकडो डॉल्फिन डुबक्या मारत मारत जहाजाला सोबत करत होते. समुद्री खेळ दाखवताना एकमेकांना हरवण्याची कसरत करता करता जहाजाच्या वेगाला सुद्धा आव्हान देत होते. तेवढ्यात अचानक फोनची बेल वाजली आणि निसर्गाच्या अनोख्या खेळाने भडकलेल्या रात्रीचे पहाटे साडेचारला सुरु झालेले स्वप्न सकाळी सव्वा सातला जुनिअर इंजिनियरच्या वेक अप कॉल ने भंगले.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply