नवीन लेखन...

फ्लोरा फाऊंटन

मुंबईचा फोर्ट परिसर, त्या परिसरातल्या त्या दगडात घडवलेल्या भव्य, देखण्या वास्तूतलं सौंदर्य सुमारे दिडेकशे वर्ष उलटून गेली तरी मनाला मोहवतं. कोणत्याही प्रकारची फारशी देखभाल नसतानाही आपली नजर खिळवून ठेवायचं सामर्थ्य त्या वास्तूंमधे आहे. या परिसरातील एकेका इमारतीची अदब, दबदबा(दहशत नाही) जाणवतो. त्या इमारतींमध्ये जाणीवपूर्व जपलेली सौंदर्यदृष्टी आंधळ्यालाही दिसेल. कोणत्याही इमारतीच्या प्रवेशदारावरची एखादी नजाकतभरी कमान असो वा वरच्या मजल्यावरच्या एखाद्या लहानश्या झरोख्याचं डिझाईन असो, सौंदर्याची जाणीव ठेवलेली आपल्याला लक्षात येते..

यातलंच एक देखणं कारंज-शिल्प म्हणजे ‘फ्लोरा फाऊंटन’..! तसं या चौकाचं सरकारी दफ्तरातलं आणि बीईएस्टी बसच्या कपाळावर लिहिलेलं नांव ‘हुतात्मा चौक’, परंतु सर्व सामान्यांच्या दृष्टीने तो ‘फ्लोरा फाऊंटन’ एरियाच..!

रंगीबेरंगी फुलांची देवता असलेल्या ‘फ्लोरा’ या रोमन देवतेच्या नांवाने ओळखलं जाणारं हे कारंजं, परवाच, गुरुवार दिनांक २४ जानेवारीपासून, मुंबयकराना त्याच्या जुन्या देखण्या स्वरुपात दिसतं झालं. जुन्या स्वरुपात म्हणायचं कारण असं की, दोन वर्षांपूर्वी हे नितांत सुंदर कारंजं-शिल्प कुणा सरकारी इंजिनिअराने पांढऱ्या (शुभ्र होता की नाहीते आता आठवत नाही) आॅईलपेंटने रंगवून विद्रुप करुन ठेवलं होतं. दगडविटांची कंपाऊंडची भिंत असो की एखादी देखणी वास्तू असो, ‘ब्युटीफिकेशन’च्या नांवाखाली ती आॅईलपेंटने चोपडून काढणं, हिच ज्यांच्या सरकारी सौंदर्यदृष्टीची कमाल मर्यादा असते त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाच ठेवता येत नाही. पण माझ्या या समजुतीला छेद देणाऱ्या काही गोष्टीही सरकारकडून घडत असतात आणि त्यापैकी एक म्हणजे आपल्या जुन्या स्वरुपात नव्याने सामोरं आलेलं ‘फ्लोरा फाऊंटन’..!

गेली दोनेक वर्ष या कारंज्यावर काम सुरु होतं. कामानिमित्त या परिसरात येता-जाताना पांढऱ्या कापडाखाली झाकलेलं ते शिल्प नक्की कुठल्या स्वरुपात सामोरं येतंय याचं पूर्वानुभवावरून भितीमिश्रित कुतूहल असायचं. पण दोन वर्षांनंतर परवा जेंव्हा हे हे शिल्प नजरेसमोर आलं आणि मी ते प्रत्यक्ष तिथं जाऊन पाहिलं, तेंव्हा मात्र नजरेचं पारण फिटलं. बृहन्न्मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने पालिकेच्याच हेरीटेज सेलच्या देखरेखीखाली अत्यंत समाधानकारक रित्या पार पाडलेलं आहे, त्या बद्दल एक मुंबईकर म्हणून, सरकारच्या सौंदर्यदृष्टीवर शंका घेण्याच्या माझ्या स्वभावापलिकडे जाऊन, मला महापालिकेचं मनापासून कौतुक करावसं वाटतं.

आता तुम्ही म्हणाल, येवढं काय आहे त्या कारंज्यात म्हणून. बाकी मला त्या शिल्पातले बारकावे सांगता यायचे नाहीत, परंतू आजच्या भरभराटीला आलेल्या महामुंबईची मुहूर्तमेढीचा काहीतरी संबंध मात्र त्याकाळात उभारल्या गेलेल्या या कारंजं-शिल्पात आहे, हे मात्र नक्की..! मला तिच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. त्यासाठी आपल्याला साधारत: दिड-पावणेदोनशे वर्ष मागे जावं लागणार आहे..

तर गोष्ट आहे सन १८६२ च्या पूर्वीची. खऱ्या मुंबईची व्याप्ती तोवर मुंबईच्या किल्ल्यापुरतीच मर्यादीत होती. किल्ला म्हणजे आताच्या दक्षिणेच्या काळ्या घोड्यापासून ते उत्तरेच्या आताच्या जीपीओपर्यंतचा परिसराभोवती शत्रुपासून संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या तटबंदीच्या आतला परिसर. या तटबंदीच्या आत पूर्व समुद्रकिनाऱ्यावर ब्रिटीशांचं हेड आॅफिस समजला जाणारा किल्ला होता, मोठमोठ्या व्यापारी पेढ्या होत्या, व्यापारी आणि बड्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची निवासस्थनं होती, बाजार होता, शाळा होती, कोर्ट होती आणि बरंच काही होतं. या तटबंदीच्या आत सुरक्षित वातावरणात त्याकाळची मुख्य मुंबई वसलेली होती. आताचा काळा घोडा ते जीपीओ पर्यंतचा परिसर तेंव्हा ‘बाॅम्बे फोर्ट एरीया’ म्हणून ओळखला जायचा आणि आजही तो फोर्ट एरीया म्हणूनच ओळखला जातो. आता माहित नाही, परंतू दहा एक वर्षांपूर्वी या परिसरातल्या बॅंकांच्या नेहेमीच्या क्लिअरिंगप्रमाणेच फोर्ट एरीया क्लिअरींग स्वतंत्रपणे चालायचं.

या तटबंदीतून मुंबईच्या फोर्ट विभागात प्रवेश करायला तीन मुख्य प्रवेशद्वारं होती(आणखी दोन होती, परंतु त्यांचा नीट संदर्भ मिळत नाही).. दक्षिणेवा अपोलो गेट, पश्चिमेला चर्च गेट आणि उत्तरेला बझार गेट. अपोलो गेटची नामेनिशाणी नाही. बोलण्यातही हे गेट येत नाही. उत्तरेच्या बझार गेटचीही कुठलीच निशाणी नाही. मात्र बोलण्यात याचा अजुनही तुरळक उल्लेख येतो. पश्चिमेचं चर्च गेट (याला पवनचक्कीचा दरवाजा असंही म्हणत. कारण या दरवाज्याच्या बाहेरच्या मोकळ्या मैदानात सैन्यासाठी लागणारा गहू दळायची एक पवनचक्की सन १७२५ सालात उभारलेली होती) मात्र प्रत्यक्षात तिथे नसुनही बोलण्यात अजुनही प्रसिद्ध आहे. अर्थात ही प्रसिद्धी पश्चिम रेल्वेच्या ‘चर्च गेट’ या शेवटच्या स्थानकामुळे आहे हे खरं.

मुंबईच्या किल्ल्यांची ही तटबंदी १७१६ साली बांधून पूर्ण झाली होती. या तटबंदी सभोवती त्यावेळच्या पद्धतीपरपमाणे खंदकही होता. या सर्व गोष्टीसाठीचा खर्च रुपये ३,३५,००० मात्र कंपनी सरकार आणि किल्व्यातल्या त्याकाळच्या श्रीमंत लोकांना मिळून केला होता. हा सर्व बंदोबस्त समुद्रातून चालून येऊ शकणाऱ्या शत्रुपासून संरक्षणासाठी होता.

सन १७१६ पासून ते सन १८६०-६२ पर्यंत मुंबईच्या किल्ल्यातली वस्ती भरमसाठ वाढली होती. किल्ल्यात जागा मिळवणं प्रतिष्ठेचं समजलं जावू लागलं होतं आणि त्यामुळे किल्ल्याच्या बाहेरचे धनिक-वणिक किल्ल्याच्या आत यायला बघत होते. आतली वस्ती आणखी वाढू लागली होती. त्याचबरोबर अस्वच्छता, जुनाट लाकडी इमारती पडणं, इमारतीना आग लागणं इत्यादी प्रकार घडू लागले होते. जोडीला अस्वच्छता, रोगराईही वाढू लागली होती. पुन्हा त्यात घोडागाड्या- बैलगाड्या यांची गर्दी होतीच. किल्ल्यतल्या मुंबईचा श्वास कोंडू लागला होता. मोकळी जागाच कुठे नव्हती. किल्ल्याच्या बाहेर एस्पलनेड मैदानावर मात्र प्रशस्त जागा, मोकळी हवा विपुलतेने उपलब्ध होती. लोक सुटीच्या दिवसांत या मैदानावर फिरण्यासाठी जात.

मुंबईच्या अशी घुसमट झालेल्या परिस्थितीत मुंबईचे नवीन गव्हर्नर म्हणून सर बार्टल फ्रिअर यांचं दिनांक २४ एप्रिल १८६२ या दिवशी मुंबईत आगमन झालं आणि मुंबईचं भाग्य बदलायला सुरुवात झाली. एव्हाना मुंबईचे गव्हर्नर परळच्या गव्हर्नर हाऊसमधे राहायला गेले होते तरी कारणपरत्वे त्यांना मुंबईत यावं लागायचं. सर बार्टल फ्रिअर यांनी या सर्व गोष्टींचं निरिक्षण केलं आणि त्यांनी मुंबईच्या किल्ल्याची तटबंदी पाडण्याचा निर्णय घेतला. कोंडलेल्या मुंबईला मोकळं करण्यासाठी किल्ल्याची तटबंदी पाडणं अपरिहार्य ठरलं होतं..सन १८५७ च्यां बंडाला मोडून काढल्यानंतर देशात कंपनी सरकारची सद्दी संपून ब्रिटिश सरकारची सत्ता सुरू झाली होती. ब्रिटिशांची सत्ता मजबुत झाल्याने त्यांना आता इतर शत्रूपासून भयही उरलं नव्हतं आणि सहाजिकच भक्कम तटबंदी आणि खोल खंदकांचीही गरज उरली नव्हती.

सर बार्टल फ्रिअर यांनी तटबंदी पाडायचा निर्णय लगेच अंमलात आणला तो क्षण मुंबईच्या वाढीसाठी निर्णायक ठरला. आताची फळलेली-फुललेली मुंबई दिसते, त्याची मुळं सर बार्टल फ्रिअरच्या या निर्णयात आहेत. तटबंदी पाडल्यानंतर कोटाच्या आत कोंडलेल्या मुंबईला, मुंबई किल्ल्याच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला अफाट मोकळी जागा निर्माण झाली आणि मुंबईने कात टाकली. सर फ्रिअर यांच्या निर्णयाला साथ मिळाली ती त्याच दरम्यान मुंबईच्या म्युनिसिपालिटीचा पहिले कमिशनर असणाऱ्या, आजच्या मुंबईतले रुंद रस्ते आणि फुटपाथ, रस्त्याच्या कडेने लावलेल्या झाडांचा निर्माता आणि तेवढीच वादग्रस्त कारकिर्द असलेल्या आॅर्थर क्राॅफर्ड या प्रचंड उत्साही व्यक्तिमत्वाची.

तटबंदीच्या पश्चिमेला मोकळ्या झालेल्या जागेत सर्वात पहिली वास्तू उभी राहाली ती काळा घोडा चौकातली डेव्हीड ससून लायब्ररीची आणि दुसरी वास्तू जन्माला आली ती अगदी विरुद्ध टोकाला असलेली क्राॅफर्ड मार्केटची. मधलं एस्प्लनेड हाॅटेल, मुंबई विद्यापिठाच्या दोन इमारती, मुंबई उच्च न्यायलयाची इमारत, पीडब्ल्यूडीची इमारत, सीटीओ, मुंबई सीएसएमटी स्टेशनची इमारत, महीपालिकेची इमारत या आजही मुंबईची शान असलेल्या इमारती १८७० ते १९०० च्या दरम्यान नंतर टप्प्या-टप्प्याने इथे उभ्या राहिल्या. मुंबईचा डंका जगात गाजू लागायला सुरुवात झाली ती इथुनचं. पुढे मुंबई जी दक्षिणोत्तर आडवी वाढली, त्याचा श्रीगणेशा या सर बार्टल फ्रिअर यांनी केला होता.

सर बार्टल फ्रिअर यांचा गव्हर्नर म्हणूनचा कालावधी १८६२ ते १८६७ इतकाच होता. पण मुंबईला ‘पूर्वेकडचं लंडन’ बनवण्याचं स्वप्न ते मुंबईत येताना घेऊन आले होते. त्यांनी कल्पिलेल्या या इमारती उभ्या राहिल्या तेंव्हा अर्थातच सर बार्टल फ्रिअर देशात नव्हते, परंतु त्यांच्या काळातच मुंबई बदलायला सुरुवात झाली होती.

अगदी नुकतंच नुतनीकरण होऊन समोर आलेल्या मुंबईच्या ‘फ्लोरा फाऊंटन’चा या कथेशी संबंधं असा की, हे कारंजं सर बार्टल फ्रिअर यांच्या मुंबईच्या भरभराटीत असलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ तेंव्हाच्या मुंबईकर नागरीकांनी वर्गणी गोळा करुन बांधलं आहे. आज जरी हे फाऊंटन फ्लोरा फाऊंटन म्हणून प्रसिद्ध असलं तरी, या कारंजाचं खरं नांव ‘फ्रिअर फांऊंटन’..!

आता थोडसं या फाऊंटनविषयी. या फाऊंटनसाठी पुढाकार घेतला होता तो, १८३० सालात मुंबईत स्थापन झालेल्या ‘अॅग्रो-हाॅल्टिकल्चर सोसायटी आॅफ वेस्टर्न इंडीया’ या वनस्पतींच्या संशोधनासाठी स्थापन झालेल्या संस्थेने. ह्या संस्थेला सरकारने शिवडी येथे दिलेल्या जागेत विविध वनस्पती असलेली एक बाग फुलवली होती. पुढे या जागेत ख्रिश्चन दफनभुमी करायची म्हणून या जागेऐवजी सर फ्रिअर यांच्या काळात सन १८६०-६२ च्या दरम्यान माझंगांव येथे जागा देण्यात आली व तिच पुढे माझंगांव-भायखळ्याच्या सीमेवर असलेली ‘व्हिक्टोरीया गार्डन’ किंवा ‘राणीचा बाग’ म्हणून प्रसिद्ध झाली. बार्टल फ्रिअर यांच्या सन्मानार्थ या बोगेत बसवण्यासाठी म्हणून हे कारंजं-शिल्प ‘अॅग्रो-हाॅल्टिकल्चर सोसायटी आॅफ वेस्टर्न इंडीया’ या संस्थेसाठी आर.नाॅर्मन शाॅ या ब्रिटिश आर्किटक्टने डिझाईन केलं व जेम्स फोर्सिथ या शिल्पकाराने घडवलं.. !

कारंज-शिल्प बनवण्यासाठीचा खर्च पुढे ‘अॅग्रो-हाॅल्टिकल्चर सोसायटी’च्या हाताबाहेर जाऊ लागली आणि ते लक्षात घेऊन तेंव्हा सोसायटीचे अध्यक्ष असलेल्या क्राॅफर्ड यांनी हा प्रकल्प ‘एस्प्लनेड फि फंड’ कमिटिच्या ताब्यात दिला व कमिटिने तो कमिटीच्या पैशांतून नंतर पूर्ण केला. या फाऊंटनसाठी त्याव्ळचे श्रीमंत पारसी व्यापारी शेठ करसेटजी फर्दुनजी यांनी २०५०० रुपयांची देणगी दिली होती.

सर बार्टल फ्रिअर यांनी तोडलेल्या तटबंदीमधील ‘चर्च गेट’ ज्या ठिकाणी होतं, तिच जागा या फाऊंटनसाठी ठरवण्यात आली आणि त्याच जागी दिनांक १८ नेव्हेंबर १८६९ रोजी फ्रिअर यांच्या स्मरणार्थ बसवलं ते गेलं. आजही ते तिथेच आहे.

कोणतीही ऐतिहासीक वास्तू वा वस्तूचा इतिहास माहित असला की, ती पाहाताना त्या काळचा तो इतिहासही आपसूक अनुभवता येतो. फ्लोरा फाऊंटन पाहाताना तुम्हालाही तोच छान यावा अनुभव, यासाठी हा लेखन प्रपंच..!!

— नितीन साळुंखे
9321811091
27.01.2019

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा- लेखांक ३३ वा.

टिप-
1. फ्लोरा फाऊंटनच्या नुतनीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेने ५ कोटी रुपयांचा खर्च केला आसून, नुतनीकरणाचे काम वारसा वास्तू जतनासंदर्भातली प्रख्यात संस्था ‘INTACH (ndian National Trust for Art and Cultural Heritage)’ यांनी केलं आहे.

2. नुतनीकरण केलेल्या फ्लोरा फाऊंटनशेजारी, रस्ता खोदकाम करताना सापडलेले मुंबईच्या जुन्या ट्रामचे रुळ, पुन्हा वर काढून जतन करुन ठेवण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी तिथे न दिसणारं हे नवल मुंबईकरांच्या नजरेसमोर राहील असं काम केल्याबद्दल महापालिकेचे मनापासून आभार.

3. सदर लेख लिहिताना महानगरपालिकेच्या हेरीटेज वास्तू विभागात कार्यरत असणारे अभियंता श्री. संजय आढाव या मुंबईवर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्राची बहुमोल मदत झालेली आहे. सदर लेखातील फोटो श्री. आढाव यांनीच मला उपलब्ध करुन दिले आहेत.

4. 4. सर बार्टल फ्रिअर यांचा पूर्णाकृती पुतळा एशियाटीक लायब्ररीत आहे.

संदर्भ –
१. मुंबईचे वर्णन – ले. गोविंद मडगावकर – १८६२
​ २. मुंबईचा वृत्तांत – ले. मोरेश्वर शिंगणे – १८९३
​३. मुंबई नगरी – ले. न.र. फाटक – १९८३
​४. स्थल-काल – ले. डॉ. अरुण टिकेकर – २००४
५. Fort Walk- Sharda Dwivedi & Rahul Mehrotra- 2005

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..