ट्रॅफिक जॅमचा विचार जरी मनात आला तरी महानगरातील अनेक लोकांच्या छातीत धडकी भरत असते. कारण एकदा का वाहनांची रांग लागली की, पुढचा मार्गच बंद होऊन जातो. अशात तुम्ही तुमच्या मोटारीचे एक बटन दाबलेत अन् ती हवेत उडाली तर ट्रैफिक जॅमची कटकट नाही. हो, आताच्या शतकात अशी सोय झाली आहे.
फ्लाइंग कार नावाच्या एका वेगळ्याच वाहनामुळे! चमत्कारिक वाटत असले तरी ते शक्य आहे. अलीकडेच अनिवासी भारतीय असलेले सुभाष सिहोरा नावाचे एक उद्योगपती अशी फ्लाइंग कार घेऊन अहमदाबादेत आले होते. अशी कार असलेले ते एकमेव भारतीय आहेत. त्यांनी ही ट्रान्झिशन नावाची कार अमेरिकेतून विकत घेतली आहे.
अमेरिकेत फ्लाइंग कारवर ८० पेटंट घेतली गेली आहेत. राइट बंधूंनी १९०३ मध्ये किटी हॉक येथे विमान उडवले, त्यानंतरच्या काळात फ्लाइंग कारची कल्पना आली. ग्लेन कर्टिस यांनी अशी कार पहिल्यांदा १९१७ मध्ये तयार केली. त्याला ऑटोप्लेन असे नाव होते. तसेच ४० फुटांचे तीन पंख होते.
त्यानंतर १९३७ मध्ये वाल्डो वॉटरमन यांनी ॲरोबिल हे हायब्रिड एअरक्राफ्ट तयार केले. रॉबर्ट फुल्टन यांनी १९४६ मध्ये एअरफिबियन म्हणजे रस्त्यावर चालणारे विमान तयार केले. त्यात पंख व शेपूट ही रस्त्यावरून चालताना काढून घेता येत होते व नंतर पुन्हा पाच मिनिटांत विमानाची कार तयार होत होती. त्याचा आकाशातील वेग होता ताशी १२० मैल व रस्त्यावरचा वेग होता ताशी ५० मैल.
त्यानंतर १९४० मध्ये कोन्व्ह एअर कार १९४७ मध्ये तयार करण्यात आली. अव्हरो कार ही लष्करी वापरासाठी होती. फ्लाइंग सॉसर (बशी) सारखी तिची रचना होती. आतापर्यंतची सर्वांत यशस्वी फ्लाइंग कार मोल्टन टेलर यांनी तयार केली. तिला एरोकार असे म्हणतात. कमी वजनाच्या घटकांची ती बनवलेली असून, संगणक नियंत्रित आहे.
या कार गॅरेजमध्येही ठेवता येतात. ट्रान्झिशन ही काही बदलांसह या वर्षी नव्याने येत असलेली फ्लाइंग कार ताशी ११५ मैल वेगाने उडते, तर रस्त्यावर ताशी ६५ मैल वेगाने पळते. तिची किंमत एक लाख २५ हजार ते एक लाख ६० हजार डॉलर आहे. आतापर्यंत या कारचे बुकिंग शंभर जणांनी केले आहे. फ्लाइंग कार ही उपयुक्त असली तरी ती सर्वसामान्यांना परवडणार नाही व कधीकाळी परवडली तर आकाशात ट्रॅफिक जॅम व्हायला लागेल.
Leave a Reply