आज २५ ऑक्टोबर.. आज एक प्रसिद्ध कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी यांची पुण्यतिथी.
जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम यांच्या बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा..
…. आणि… यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर ‘लता मंगेशकरांनी’ घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन’च’ घेणारा. साहिर लुधियानवी साहिर हे आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे.
साहिर लुधियानवी यांचे अब्दुल हयी हे मूळ नांव. त्यांचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी झाला.
अगदीच लहान असताना त्यांची परिस्थिती फार बिकट झाली होती. वडील अय्याश होते. ते एक लग्न झालेले असूनही वारंवार लग्न करायचे. साहिरच्या आईने शेवटी वैतागून साहिर यांच्यासकट घर सोडले. घटस्फोटही झाला. मात्र ‘साहिर माझ्याकडे राहिला पाहिजे’ ही मागणी वडिलांनी इतकी पराकोटीला नेली की ते साहिरच्या आईला म्हणाले ‘हा जर माझ्याकडे आला नाही तर मी याला मारून टाकेन, तुझ्याकडेही राहणार नाही हा’! पण काही परिचितांनी सतत साहिलवर लक्ष ठेवले व काही दिवसांनी त्यांच्या वडिलांनी तो नाद सोडून दिला. साहिरला घेऊन आई ज्या गरीब वस्तीत राहायला आली होती तिच्या शेजारून रेल्वे जायची. रेल्वेगाडी आली की छोटा साहिर आईला बिलगायचा कारण सपूर्ण वस्तीच थडाथडा हालत असायची. साहिर खूप घाबरायचा. खरे तर अत्यंत चांगल्या परिस्थितीत जन्माला आलेल्या साहिरच्या नशीबात ही गरीबी वडिलांमुळे आली. आणि याची आठवण ठेवून साहिरने स्वतःच्या आईला कधीही अंतर दिले नाही. साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग मुंबईकडे मोर्चा वळवला. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये ‘अमृता प्रीतम’ हे नांव सर्वात वर! इन्द्रकुमार गुजराल यांना भर मैफिलीत सरकारच्या निष्क्रीयतेवर सडेतोड प्रतिक्रिया देणारे साहिर हे एक बेफिकीर व्यक्तीमत्व होते. अमृता प्रीतम ‘साहिरने ओढलेल्या’ सिगारेट्सची थोटके पेटवून स्वतः ओढायची. साहिरच्या मृत्यूनंतर तिचे असे म्हणणे होते की ‘आता ती ओढत असलेल्या सिगारेटचा धूर ज्या जगात साहिर पोचला आहे तिथे पोचत असणार’!
जो वादा किया वो निभाना पडेगा, कभी कभी मेरे दिल मे, चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो, तुम न जाने किस जहांमे खो गये अशी अजरामर गीते साहिर यांनी लिहिलेली आहेत.
नौजवान आणि प्यासा या हिंदी चित्रपटांनंतर साहिर यांनी अख्ख्या भारतालाच वेड लावले. आओ की कोई ख्वाब बुने ही त्यांची कविता अत्यंत सुंदर! तल्खिया, परछाईया व अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. साहिर यांचे काव्य उच्च दर्जाचे असूनही सुप्रसिद्ध असायचे व आहे. ही दोन टोके जमवणे अनेक कवींना अवघड जाते. गुलजार हे साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात हलाखीची परिस्थिती आणी नंतर पैशाचा नुसता धबधबा यामुळे त्यांचे आयुष्य बरेचसे अनियंत्रीत स्वरुपाचेच होते. त्यांनी आयुष्यात लग्न केले नाही. मात्र या व्यक्तीमत्वावर आणि त्यांच्या काव्यावर अनेक स्त्रियांनी जान कुर्बान करण्यापर्यंत प्रेम केले हे मात्र खरे!
मै पल दो पल का शायर हूं
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है
असे म्हणणारे मा.साहिर यांचे निधन २५ ऑक्टोबर १९८० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply