विसाव्या शतकात स्वयंपाकघरातील मिक्सरची जागा फूड प्रोसेसरने घेतली. मिक्सरच्या मदतीने काही कामे जरूर करता येतात पण त्याला मर्यादा आहेत. त्यामुळेच पीठ मळणे, भाज्यांच्या चकत्या करणे, काही फळभाज्या किसणे, फळांचा ज्यूस करणे अशी अनेक कामे करणारे वेगवेगळ्या भांड्यांचे जोड असलेले एकच उपकरण असावे यातून फूड प्रोसेसर (अन्न संस्कारक) तयार करण्यात आला.
स्वयंपाकघरातील अनेक कामे इतकी वारंवार करावी लागतात की, ज्यात वेळ खूप लागतो व ती सफाईने होतही नाहीत, त्यामुळे यंत्रांचा वापर करून ती अधिक सफाईने करता येतात. यात मूळ तत्त्व हे मिक्सरचेच असते.
आता आधुनिक फूड प्रोसेसर हे अधिक आटोपशीर असतात व चांगल्या दर्जाची भांडी त्यात वापरलेली असतात.
अन्न संस्करणाच्या क्षेत्रात फूड प्रोसेसरने क्रांती घडून आली व स्वयंपाकघरात काम करणाऱ्या स्त्रियांचे कष्ट बरेच कमी झाले.
फूड प्रोसेसरमध्ये मिक्सरप्रमाणेच मोटर, बाऊलसारखे झाकण असलेले भांडे, फीड ट्यूब व जोड भांडी हे घटक असतात. यातील मोटर जड असते व ती तळाशी असते, तिचेच वजन ९ किलोच्या आसपास असते, त्यामुळे फूड प्रोसेसर स्थिर राहतो. त्यातून आलेला शाफ्ट हा ॲटॅचमेंटपर्यंत आलेला असतो. अॅटॅचमेंट करायचे भांडे शाफ्टवर योग्य प्रकारे बसते. अॅटॅचमेंटच्या भांड्यावर पक्के बसणारे झाकण असते, त्यामुळे बारीक करावयाचा पदार्थ बाहेर सांडत नाही.
बहुदा अॅटॅचमेंटची भांडी ही चांगल्या दर्जाच्या स्टील किंवा प्लास्टिकची असतात. या भांड्यांच्या तळाशी ब्लेड्स असतात, ती चांगल्या दर्जाची असतील तर अन्नपदार्थ सहज बारीक होतात.
आता अधिक आकर्षक स्वरूपातील फूड प्रोसेसर मिळतात. फूड प्रोसेसरची मोटर बिघडली किंवा अॅटॅचमेंट ज्या खटक्यामुळे शाफ्टवर बसतात ती बिघडली तर त्यांची दुरूस्ती करावी लागते.
साधारण चार ते सहा हजारापर्यंत चांगल्या दर्जाचे फूड प्रोसेसर मिळतात.
फूड प्रोसेसरची जन्मकथाही अशीच वेगळी आहे. फ्रेंच केटरिंग कंपनीत काम करणाऱ्या पिअर व्हेरड्यून या सेल्समनच्या असे लक्षात आले की, अनेक लोक स्वयंपाकघरात कापणे, चिरणे, किसणे, मळणे या क्रिया करण्यात जास्त वेळ घालवतात व त्यांच्यासाठी ते फार कंटाळवाणे असते. त्यामुळे त्याने एक मोटार व त्यावर शाफ्टवर बसवलेले गोल फिरणारे भांडे यांच्या मदतीने ही कामे करता येतील, असे यंत्र तयार केले.
१९६० च्या सुमारास शक्तिशाली इंडक्शन मोटार असलेला फूड प्रोसेसर बाजारात आला. १९७३ मध्ये उत्तर अमेरिकेतील बाजारपेठेत कार्ल सोन्थायमर या अभियंत्याने फ्रेंच इंडस्ट्रीयल ब्लेन्डर असलेला फूड प्रोसेसर सादर केला. तो अधिक प्रगत होता नंतर या यंत्रात आणखी सुधारणा होत गेल्या.
Leave a Reply