नवीन लेखन...

फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको

तुमाले तो माया पुणेवाला सोबती पवन्या आठवते, तो नाही मले नागपूरले ‘ते का करुन रायली असन बा’ पिक्चर पाहाले घेउन गेलता तोच. त्यान मले सांगतल फुटबॉलचा वर्ल्ड कप हाय, मॅचगिच पायजो. मले सारेत असल्यापासूनच फुटबालचा शौक होता. लाथा माराले कोणाले नाही आवडत जी. भेटला बॉल का मारा लाथा. साऱ्या दुनियेचा राग बॉलवरच काढाचा. मास्तरन वर्गाभायेर काढल मारा लाथा, पाउस नाही आला मारा लाथा, कापसाले भाव नाही भेटला मारा लाथा, तूर अळीन खाल्ली मारा लाथा. अशा लाथा माराच्या गेमचा वर्ल्डकप पायलाच पायजे. पण का माणूस ठरवते आन पाउस पाणी फेरते अस झाल. अमदा पाऊस हात धुवुन मांग लागला का काही सुधरु देल नाही. किती काम रायली होती. सारे फाडाचे होते, पऱ्हाटी टोबाची होती, तुरीची लावण कराची होती, सोयाबीन पेराच होत. या साऱ्यातून फुरसद भेटली तर आमच्या घरची भवानी तिच्या सिरियली पाहत रायते. म्या ठरवल काहीबी झाल तरी फायनल पाहाचीच, येक मिनिट सोडाची नाही. पेपरात वाचल का फ्रांस आन कोणचा का देश याची मॅच हाय. अधूनमधून मॅच पायल्या तवा दोनचार गडयाचे नांव मालूम होते.
आदितवार होता तवा म्या बराबर आठ वाजता पासूनच टिव्ही लावून मॅच पाहाले बसलो. तशी बायको बोंबलली.
“आज तुम्हाले बरा फु़टबॉल आठवला आजवरी तर कधी पायताना दिसले नाही.”
“फुटबॉलचा वर्ल्डकप फायनल हाय. तो का दरसाली येते का? दोन चार वर्षातून येखांद डाव.”
“मायी सिरियल?”
“तशी तू रोजच सिरियल पायते ना येखाद्या दिवशी म्या मॅच पायली तर का बिघडल?”
“मले वाटलच, माया टिव्ही तुमच्या डोऱ्यात खुपला हाय ते.”
“अव तस नाही.”
“राहू द्या तुमाले बायकोच सुख पाहावणच होत नाही. बायको घऱात राब राब राबते, ते नाही दिसत पण तिच टिव्ही पायन दिसते. तरी बर तो टिव्ही मायाच मामान लग्नात आंदण म्हणून देलंता. तुमच्या मामान का देलतं फुटकी कवडी.”
“आता लग्नाले धा बरस झाले तरी तुया मामान लग्नात आंदण दिलेला टिव्हीच काढशीन का?”
“तुम्ही असे धंदे करान तर मी काढीनच. कोण तुमच्या येवढ वळखीच लागून गेल तेथ. का मॅच पाहून रायले. देण ना घेण फुकट कंदील लावण.”
“वळखीच कस नाही म्हणते हा बाप्या आपल्या हिंगणघाटचाच हाय.” त्या टायमाले कस सुचल कोणास ठाउक. तो टिव्हीवर बाप्या दिसला आन म्या दिली ठोकून.
“खरच का, दाखवा बर कोण व्हय तो” अस म्हणत बायको माया बाजूलेच मॅच पाहाले येउन बसली. तिले खरच वाटल होत. मी तरी का करु म्या अशी ठोकून देल्ली नसती तर ते काही मले सुखान मॅच पाहू देत नव्हती.
“हा पाय.”
“गडी लय तगडा दिसते. कोठ राय हिंगणघाटात?”
“जुन्या वस्तीत.”
“तरी म्हटल कोठतरी पायल्यासारख वाटते. दुसऱ्या देशात राहून बदलला नाही.”
“म्हणूनच तुले वळखू नाही आला नाहीतर जुन्या वस्तीतला कुत्रबी तुया नजरेतून सुटत नाही.”
मले मोकाच भेटला. आता बायकोबी बाप्या बाप्या करत टिव्ही पाहत होती. रेफ्रीन शिट्टी मारली आन मॅच सुरु झाली. समदे पराले लागले.
“कसे परुन रायले जी, पोळ्याच्या बैलावाणी”
“अव बॉल पकडाले पराच लागते.”
“कायले जीवाचे येले करुन घ्याचे म्हणते मी. आपल्याकड बॉल आला का माराचा.” तिले तेथ पडनाऱ्याची चिंता, मले म्हणे
“अहो पाडल पाहा त्याले, पायात टांग टाकून पाडल त्याले. म्या म्हणत नव्हती जास्त परान तर पडान.”
“अव असच रायते. नुसत पाडतच नाही तर पार कुस्त्या खेळते पायजो तू आता, शर्ट फाडून टाकते.”
“ह्या तो बाप्याच व्हय ना. कसा परते जी. आपल्या गोल्यावाणीच हाय, गोल्या नाही शेपटाले हात लावला का असा परते का थांबाच नावच घेत नाही.” आता खेळ रंगात आलता. तिकडून कोण का किक मारली आन इकडून तो डोस्क्यान बॉल माराले गेला पण त्याचा लागलाच नाही भलत्याच डोस्क लागल आन गोल झाला.
“गोSSSल” म्या जोरात ओरडलो
“काहून वरडून रायले जी?”
“गोल झाला”
“का गोल झाल, ते खांब तर चौकोनीच दिसून रायले.”
“त्या खांबच्या फुड लाइन मारली हाय पाय, त्याच्याफुड जालाचा मांडव हाय. त्याच्यात बॉल गेला का गोल होते.”
“काही शिकवता काजी, तो बॉल अंदर जाच्या अगुदरपासूनच गोल होता. म्या पाहूनच रायली ना.”
“मायमाझे तो बॉल गोलच रायते आन तो मांडव चौकोनीच रायते पण जवा बॉल जालाच्या अंदर जाते तवा गोल झाला अस म्हणते.”
“काहून?”
“ते काजीनकाबा”
“अस्स उद्या जर डाल्यात कोंबड पकडल तर गोल असच वरडाच का?”
“तुले का वरडाच ते वरड.” काही संबंध हाय का जी डाल्यातल्या कोंबड्याचा आन फुटबॉलच्या गोलचा. समजे उमजे काही नाही चालली अक्कल शिकवाले. माणूस परेसान झाल बायकोपायी.
“काजी हा टिव्हीतला बुवा अधी मधी पास पास अस काहून वरडून रायला. कोणाची परिक्षा चालू हाय येथ?”
“मायीच दुसरी कोणाची.” कोठून दु्र्बुद्धी झाली आन हिले घेउन मॅच पाहाले बसलो अस झालत. धड मॅच पाहू देत नव्हती, दर मिनिटाले काहीनाकही इचारत होती. हे अस काहून हे तस काहून, हा कोण व्हय, तो कोण व्हय. त्यायच्या नावाच्या स्पेलींगा केवढ्या मोठ्याल्या रायते जी, त्या कुठ मले वाचाले जमनार होतं. बर मी म्हणतो गपचुप मॅच पाहाची का स्पेलींगं वाचाचे. म्या तिच्याकड लक्षच देण बंद केल मॅच पाहात होतो. आता मॅच रंगात आलती. येक येक गोल दोन्ही बाजूले झालता. फ्रांसवाले बॉल घेउन परत होते, ते दुसरेवाले त्यायले टांगा टाकून पाडत होते. अशातच रेफ्रीन पेनाल्टी दिली तसे बंदे लागले भांडाले.
“कायची बाचाबाची चालली जी?”
“पेनाल्टी देल्ली ना म्हणून,” पुन्हा काही इचारन म्हणून म्या पयलेच सांगतल “पेनाल्टी म्हणजे दंड.”
“बाप्पा येथ दंड बी भऱा लागते का? ते तुमच्यावाणीच दिसते तुम्ही नाही वर्धेले गाडी नेली का दंड भरुनच येता सिग्नल मोडला म्हणून. आपल्याले जमत नाही तर माणसान गाडी चालवाचीच कायले. पोलीसवाला कोठ हाय जी?”
“तो पाय मंगानपासून शिट्ट्या मारुन रायला”
“असा अर्ध्या चड्डीतला पोलीस”
“फुटबॉलचे पोलीस तसेच रायते.”
“हा पोलीस असा मैदानाभायेर टिव्हीत का पाहून रायला?”
“ते हाताले बॉल लागला का नाही ते तपासून पायते.”
“काहून?”
“फुटबॉलमंधी हाताले बॉल लागला का पेना.. दंड भरा लागते, चालत नाही.”
“इचित्रच कारभार म्हणाचा, मंगानपासून त्या बॉलले नुसत्या लाथा हाणून रायले ते चालते, डोस्क्यान मारुन रायले तेबी चालते, दुरुन दुरुन तो बॉल फेकून रायले ते चालते, येकमेकाच्या पायात तंगड्या टाकून पाडून रायले ते चालते, येकमेकाच्या उरावर बसून बॉल मारुन रायले ते चालते पण उलीसा हात लागल्याच चालत नाही.”
“मले का मालूम मी गेलतो का तेथ नियम बनवाले.” इचाराच म्हणून काहीही इचारते जी. त्या रेफ्रिन पेनाल्टी देल्ली आन बॉल बराबर जागी आणून ठेवला.
“हा तर इतक्या जवरुन मारुन रायला, मंधी कोणीच नाही. तो एकलाच गडी हाय. बाकीचे तेथ तोंड पाहात उभे हाय नुसते. तेथ खंब्याच्या तेथ उभ राहान, बॉल तेथून धसन न जालात. साधी अक्कल नाही.” म्या नुसता तिच्या तोंडाकडे पाहत होतो. त्यान पेनाल्टी मारली आन गोलबी झाला. हीच मात्र यायले खेळाची अक्कल नाही ते चालल होत. सारे बेअक्कल भरले हाय म्हणे. आता कोणाले अक्कल नाही हे सांगून मी कायले माया पायावर धोंडा मारुन घेउ. बोंबल किती बोंबलाच ते. ते अशी बडबडतच होती आन हाफटाइम झाला माया जीव भांड्यात पडला.
“तुम्ही काहीही म्हणा यायले अक्कल नाही.”
“जाउ दे ना तू कायले लोड घेते. ते आता आराम करते धा पंधरा मिनट. तू मायासाठी भाजीभाकरी घेउन ये.” हे अशी भाकरी आणाले उठली मले लय बरं वाटल. परेसान करुन सोडल होत हिन. येक होत ते सोबतीले बसली म्हणून मॅच पाहात होतो नाहीतर तिन तिच्या सिरियलपायी माय टकूरं फिरवल असत मले मॅच काही पाहू देल्ली नसती. बाप्प्या तुन वाचवले रे बाप्पा. बायको भाजीभाकरी घेउन आली. आम्ही दोघबी भाकरी खातच होतो तर मॅच पुन्हा सुरु झाली.
“बाप्पा मायी भाकरी अजून संपलीच नाही यायची मॅच पुन्हा सुरु झाली.”
“मंग ते का तुयी भाकरी संपाची वाट पाहनार हाय का?” आतावरी तोंडात भाकरीचे घास होते तर तोंडाचा पट्टा बंद होता. मॅच सुरु झाली तसा तोंडाचा पट्टा पुन्हा सुरु झाला. आता तर मॅच लयच रंगात आलती. जशी जशी मॅच रंगात येत होती तसा हिच्या तोंडाचा पट्टा जोऱ्यात चालू झाला होता.
“तो पराला पाहा बॉल घेउन, त्यान कोणाले बॉल देल्ला, आता ह्या कोठ घेउन चालला, यान कोणाले बॉल देल्ला, अर राजा जाल मोरं रायते त्याच्यात माराच सोडून तुन मांगच्या गड्याले कायले बॉल देल्ला, अकलाच नाही. त्यान मारला, हाततिच्यात खंब्यालेच लागला, जरा अंदर माराचा ना गड्या, आर पुन्हा मारला, अजी कोंबड गेल जी डाल्यात, ते तुमचा गोल झाला.”
हे तर कॉमेंट्रीच करुन रायली होती. हिच हेच चालल होत हा पऱ्हाला, तो पऱ्हाला तो पडला पायन,
“चांगलच लागल हो त्याले”
“अव काही सांगता येत नाही कवा कवा नाटक करते लेकाचे”
“बाप्पा याच्यात नाटक बी रायते का. लय खासच हाय जी तुमचा फुटबॉल याच्यात लोक मारामाऱ्या का करते, एकमेकाच्या उरावर बसुन कुस्त्या का खेळते, नाटकं का करते.”
“मंग हाय ना मज्जा”
तिन तोंडच हालवल, तिले आता मॅच पाहाले मजा येउन रायली होती हे नक्की म्हणूनच ते डोये फाडून टिव्ही पाहात होती.
“अजी बाप्प्याकड बॉल आला, दोन गड्याले चकवून त्यान बराबर मारला. तो गडी तर भलतीकडच कुदला त्याले पत्ताच लागला नाही कोठ बॉल मारला ते. बाप्प्या हायेच तसा गुणाचा. येकदम माया गोलूवाणी हाय.”
असा बाप्प्यान गोल मारला आन फ्रांस जितला. दुसरे दिवशी सकाळीच बंद्या गावात बातमी पसरली का हिंगणघाटच्या बाप्प्यामुळ फुटबॉलची मॅच जितली. बाकी मॅच कोण जितल याचा पता नाही पण बाप्प्यामुळे जितली हे गावात पसरल. बाप्प्यामुळच म्या मी मॅच पायली. लय खासच रे बाप्प्या तू.

लिहिणार
जानराव जगदाळे
ता. हिंगणघाट, जि. वर्धा

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

Avatar
About मित्रहो 7 Articles
“मित्रहो” (mitraho.wordpress.com)
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..