ब्रेड, नुडल्स, पास्ता इत्यादि गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत असे म्हणणे असेल तर परदेशातील लोक अशाच गोष्टी खाऊनही निरोगी कसे असतात?’ अशा काहीशा आशयाचा प्रश्न काल-परवा विचारला गेला. खरं तर यावर त्या त्या देशातील खाद्यसंस्कृती आणि पदार्थ यांवर सविस्तरपणे एखादे पुस्तक लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. तरी यावरील स्पष्टीकरण थोड्क्यात देतो.
१. वरील पदार्थ वाईट आहेत असे विधान सरसकट नसून ते आपल्या देशातील वातावरण, लोकांच्या पूर्वापार चालत आलेल्या सवयी इत्यादी लक्षात घेता ‘आपल्या देशात खाण्यासाठी अयोग्य आहेत’. जिथे जे पिकतं तिथे ते खावं हा सर्वमान्य सिद्धांत आहे. जिथे भुईमूग, तीळ यांचं तेल उपलब्ध होतं तिथे ऑलिव्ह ऑइल वा सोयाबीन ऑइलची आवश्यकता नाही. कोकणात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गहू खाण्याची सुरु झालेली प्रथा आणि त्यामुळे वाढलेले रोग यांबद्दल जुन्या जाणत्या लोकांना विचारून पहा. मी काय म्हणतोय ते सहज लक्षात येईल. एक अमेरिकन माणूस वर्षभरात सरासरी जितके चीज खाऊन फस्त करेल तितकं चीज आपणही वर्षभरात खाल्लं तर पचन बिघडून रोग कसे निर्माण होतात हे प्रयोग म्हणून आपापल्या जबाबदारीवर करून पहावा! ताहिनी ही गोष्ट इस्राईल, लेबनन यांसारख्या देशांत आवर्जून खाल्ली जाते. आपल्या देशात खाल्यास मात्र त्याने रक्तपित्त नावाचा रोग होतो असे आयुर्वेद सांगतो. इतका अभ्यास आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे.
२. आम्ही भारतीय परदेशी गोष्टींचे आपल्या सोयीने अनुकरण करण्यात पटाईत आहोत. इटलीत बनवला जाणारा पास्ता हा बहुतांशी ताजा बनवलेला तर आमच्याकडे मिळणारा पॅकेटबंद असतो. युरोपीय देश वा मध्य आशियामधील देशांत मिळणारा ब्रेड हा पदार्थ कोरडा खाणे अपशकुन मानले जाते! त्याला बटर वा ऑलिव्ह ऑइल लावूनच खावे असा प्रघात आहे. आपल्याकडे मात्र ब्रेड खाणे हे स्टेट्सचे लक्षण मानले जाते; मात्र आम्ही ‘ऑइल फ्री; घी फ्री’ आहार घेण्यात धन्यता मानतो. फ्रान्ससारख्या देशांत जेवणासह वाईन घेण्याची पद्धत आहे. ही वाईन नशा करण्यासाठी घेण्याचा उद्देश नसून प्रामुख्याने मांसाहार पचण्यास तिचा उपयोग होतो. आमच्याकडे मात्र ‘बसणे’ हा प्रमुख कार्यक्रम असतो. पिणं हे झिंगण्यासाठी नसेल तर त्यात मजाच काय? असा होरा असतो. दारूसोबत जमलंच तर आम्ही काहीतरी खातो; तेदेखील चटपटीत आणि तेलकट!!
३. याशिवाय असे कित्येक परदेशी पदार्थ आहेत जे मुळातच वाईट आहेत; ते कोणत्याही देशात खाल्ले गेले तरी दुष्परिणाम दाखवणारच. उदाहरणार्थ किण्वीकरण करून तयार केलेला ब्रेड किंवा चायनीज पदार्थांत वापरले जाणारे व्हिनेगर, सोया सॉस, अजिनोमोटो यांसारखे पदार्थ. ही यादीदेखील बरीच वाढवता येईल; मात्र विस्तारभयास्तव थांबतो. त्या त्या देशांतदेखील हे पदार्थ खात असलेल्या लोकांना कोणत्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते हे जाणून घ्यायचे असल्यास त्या देशांतल्या आरोग्य विभागाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचना वा WHO शी संलग्न संशोधने अवश्य पहावीत.
बहुतांशी पारंपरिक आहार संस्कृती ही त्या त्या देशातील वातावरणासाठी पोषक आहे. त्यामुळे आपल्या मातीत जे पिकतं तेच शक्यतो खावं; हाच आरोग्याचा मूलमंत्र जगातील प्रत्येक देशासाठी आहे. याकरताच अमेरिका नामक तुलनेत नव्याने जन्माला आलेल्या देशाने जी स्वतंत्र खाद्यसंस्कृती निर्माण केली ती सर्वाधिक घातक मानली जाऊन जगभरातील खाद्य संस्कृतीबद्दल सजग असणाऱ्या देशांत अमेरिकन आहार पाहून तोंड मुरडले जाते. आम्ही भारतीय मात्र देशी गायींचे दूध, तूप सोडून टेबल बटर आणि देशी जव सोडून पिवळ्या-गुलाबी पाकिटातील ओट्ससारख्या निकृष्ट पदार्थांचा आस्वाद (?) मिटक्या मारत घेत आहोत हे दुर्दैव.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply