शिवानी पब्लिकेशनचे श्री. संतोष म्हाडेश्वर यांनी मला ‘प्रीतिगंध’ या शीर्षकाच्या, ‘प्रेम’ या विषयावरील काव्यसंग्रहासाठी प्रास्ताविक लिहायची विनंती केली, आणि मी ज़रा विचारात पडलो. मी कांहीं अनुभवी प्राध्यापक नव्हे, प्रतिथयश साहित्यिक नव्हे किंवा ज्ञानी समीक्षकही नव्हे. साहित्याशी माझा संबंध एक रसिक वाचक व हौशी कवि-लेखक, एवढाच आहे. माझें जीवन गेलें कॉर्पोरेट क्षेत्रात. तें क्षेत्र वेगळें आणि कवितासंग्रहाची प्रस्तावना लिहिणें वेगळें. पण, श्री. म्हाडेश्वर यांनी गळ घातली. त्यांचे आणि माझे संबंध परस्पर प्रेमादराचे आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रेमाग्रहाला मी होकार दिला. प्रेमाचा अनादर कसा करणार ? प्रेम ही गोष्टच अशी आहे.
प्रेम. पक्षी-प्राणी-इतर जीव आणि मानव यांच्यातला मूलभूत फरक हा आहे की, मानवाला निसर्गानें (वैज्ञानिक परिभाषेत बोलायचें तर,) प्रगल्भ मेंदू दिला आहे; (रोजच्या बोलचालीच्या भाषेत, आणि मानसशास्त्रीय परिभाषेत सांगायचें तर,) ‘मन’ दिलें आहे. म्हणून, मानव प्रेम करूं शकतो, तें व्यक्त करूं शकतो. प्रोक्रिएशनसाठी, रिप्रोडक्शनसाठी इतर जीवही एकत्र येतात ; पण मानवासाठी, ती केवळ नर-मादी अशी फक्त रिप्रोडक्शनसाठी, वंशवृद्धीसाठी आवश्यक असलेली अशी गोष्ट नसते ; तर माणसाचा मनोव्यापार प्रेम-प्रणयाच्या व्यवहारात इनव्हॉल्व्ह होतो, गुंततो, आणि तो मनोव्यापार खूपच मल्टीडायमेन्शनल व गुंतागुंतीचा असतो. त्यामुळे माणसासाठी प्रेम हा केवळ व्यवहार रहात नाहीं. भेट- घायाळ_होणें-प्रीती-हुरहुर-ओढ-इनसिक्युरिटी-नारी/प्रेयसीचे_सौंदर्यवर्णन-प्रेयसीनें_केलेला_साजशृंगार-अभिसार-मीलन-प्रणय-विरहाची_ भीती-प्रतारणा-विरह-चिरविरह वगैरे वगैरे, असे प्रेमाचे अनेकाविध डायनेन्शन्स आहेत; आणि त्यांतील प्रत्येकामुळे माणसाच्या मनावर खोल परिणाम हा होतोच. माणसासाठी प्रेम हें असें खूप काँप्लेक्स, गुंतागुंतीचें आहे.
प्रेमाची विविध रूपे आहेत ; प्रेमाला खूप भिन्नभिन्न असे आयाम आहेत. मातापित्यांचें आपल्या अपत्यांवर किती प्रेम असतें ! ‘प्रेमस्वरूप आई’ हें काय उगाच म्हटलेलें आहे ? वडिलांचेंही तेंच. ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’, तें काय प्रेम असल्याशिवाय ? शकुंतला आश्रम सोडून जातांना कण्व ऋषी (ज्यांना तिचा पालक-पिता, फॉस्टर फादर, म्हणायला हवें), पुत्रीवियोगाच्या दु:खात उद्गार काढतात, ‘ अर्थोऽहि कन्या परकीय एव ’, तेंही पुत्रीवरील प्रेमानेंच. प्रेम हें, बहिण-भावांचें असतें, मित्र-मित्रांचें असतें, गुरु-शिष्यांचें असतें, अपत्यांचें मातापित्यांवरील असतें, भक्ताचें ईश्वरावरील असतें; प्रेम हें माणसाचे देशावरील/मातृभूमीवरील, स्वातंत्र्यावरील आणि अखिल मानवजातीबद्दलही असूं शकतें. साने गुरुजी सांगतात, ‘जगाला प्रेम अर्पावे’. कुसुमाग्रज म्हणतात, ‘प्रेम कुणावरही करावं’. अशी प्रेमाची व्याप्ती फाऽर फाऽर वाइड आहे, विस्तीर्ण आहे ; आणि तशीच deep, खोलही आहे. ‘जन्मा यावे परि पहिले चुंबन घ्यावे’ या काव्यपंक्तीवरून, प्रेमाचे जीवनात किती महत्वपूर्ण स्थान आहे, याची कल्पना येईल.
संतांनीही प्रेमाची महती गाइली आहे. संत कबीरांचे हे वचन अतिशय प्रसिद्ध आहे :
‘ढाई अच्छर प्रेम का पढ़े सो पंडित होय’.
कबीर प्रेमाबद्दल असेही सांगतात –
जा घट प्रेम न संचरै , सो घट जानु मसान
जैसे खाल लुहार की, साँस लेत बिन प्रान ।
प्रेमाविणा माणूस स्मशानासारखाच आहे, यापेक्षा जास्त apt, सुयोग्य बोल प्रेमाबद्दल काय असतील बरं ?
गोस्वामी तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’मध्ये, सीतेचे अपहरण झाल्यावरची रामाची व्याकुळ अवस्था वर्ण केली आहे. विकल राम विचारत फिरतो आहे :
‘हे खग मृग हे तरुबर श्रेनी । तुम देखी सीता मृगनैनी’ ?
प्रत्यक्ष विष्णूचा अवतार, मर्यादापुरुषोत्तम, असे प्रभू श्रीरामचंद्र जर प्रियपत्नीच्या विरहाने व्याकुळ होतात, तर साधारण मानवाची काय कथा? संतकवी सूरदास यांचे आराध्यदैवत कृष्ण होते, दशावतारामधील एक, असे श्रीकृष्ण. सूरदासांनी कितीतरी पदांमध्ये गोपींची विरहिणी अवस्था वर्णन केलेली आहे ; खासकरून त्यांच्या ‘भ्रमरगीतां’मध्ये. पहा काही ओळी : ‘पिय बिनु नागिन काली रात’ ; ‘निसदिन बरसत नैन हमारे । सदा रहत पावस ऋतु हम पै जबसे स्याम सिधारे ।’ ; ‘हमतें हरि कबहूँ न उदास । रास खिलाइ, पिलाइ अधररस, क्यों बिसरत ब्रजबास ।’. मीराबाई तर, ‘मैं तो प्रेमदीवानी’ असे स्पष्टच म्हणते. तिचे काव्य श्रीकृष्णप्रेमावरच आहे. ‘मेरो तो गिरिधर गोपाल दूसरो न कोय । जाके सिर मोरमुकुट मेरो पति सोय ।’ सूफी औलिया-दरवेश, (संत), यांनीही पारलौकिक ईश्वर-प्रेमावर (इश्क़े हक़ीक़ी) काव्य लिहिलेले आहे. मराठीतील संतकवी विठ्ठलप्रेमावर तर लिहितातच, पण एकनाथांसारखे संत सामान्यजनांसाठी रचना करतात तेव्हां, राधेच्या वर्णनाबरोबरच राधाकृष्णाचे प्रेमही दाखवतात : ‘वारियाने कुंडल हाले । डोळे मोडत राधा चाले । राधा पाहून भुलले हरी …. ’ .
पण, साधारणपणे, साहित्यक, कवी, गझलगो, आणि तुम्ही-आम्ही, ‘प्रीती’ म्हणतो तेव्हां आपल्याला अभिप्रेत असते तें ईश्वरावरील प्रेम नव्हे, अवतारांच्या जीवनातील प्रेम नव्हे, मानवजातीवरील नव्हे, देशप्रेम नव्हे ; तर आपल्याला अभिप्रेत असते ते, केवळ, स्त्री-पुरुषाचें प्रेम, प्रियकर-प्रेयसीचें प्रेम, पति-पत्नीचें प्रेम, शारीर प्रेम (जिन्सी मुहब्बत), लौकिक प्रेम (इश्क़े मज़ाज़ी) . तसं म्हटलं तर, ‘प्रेम per se’, ही तर नोबल्, उच्च प्रतीची, श्रेष्ठ भावना आहेच, पण आपण वर उल्लेखलेली स्त्री-पुरुष-प्रीती (जिन्सी मुहब्बत) हीसुद्धा अतिशय नोबल्, श्रेष्ठ भावना आहे. ‘प्रेमाला उपमा नाहीं, हें देवाघरचें देणें’ असें एका सुप्रसिद्ध कवीनें म्हटलेलेंच आहे .
विविध संस्कृतींनी, ‘प्रेमाचा-प्रणयाचा देव’ मानलेला आहे. लॅटिनमध्ये त्याचे नांव आहे ‘क्यूपिड’ (Cupid), ग्रीकमध्ये आहे ‘इरॉस‘’(Eros). भारतीय संस्कृतीत त्याला विविध नांवे आहेत : मदन, काम, कामदेव, मन्मथ, अनंग, कुसुमशर, वगैरे. ज्याअर्थी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये असा देव आहे, त्याअर्थी मानव-संस्कृतीत प्रेमाला किती महत्व आहे, तें आपल्या हें ध्यानात येईलच.
प्रेम हें अपरिहार्य आहे, प्रेम हे शारीर-प्रेम असले तरीसुद्धा महान आहे. म्हणूनच, आपल्यापुढे, प्रेमाचे आदर्श अशी, अनेक उदाहरणें ठेवलेली आहेत. राधा-कृष्ण यांचा उल्लेख आपण आधीच केलेला आहे. त्याचप्रकारचे बरेच अन्य आदर्श-प्रेमीही आहेत उदा. उषा-अनिरुद्ध, पुरुरवा-ऊर्वशी,
रोमियो-ज्यूलिएट, लैला-मज्नू (मज्नू म्हणजे ‘दिवाणा’. त्याचे खरे नांव होते, क़ैस), शीरीं-फ़रहाद, सोहनी-महिवाल, हीर-रांझा, बाजीराव-मस्तानी, वगैरे. पहा, हे प्रेमी किती वेगवेगळ्या काळातील आहेत, वेगवेगळे भाषाभाषिक आहेत, वेगवेळ्या भूभागातील/प्रांतातील आहेत. प्रेम हें असे कालातीत आहे, भाषा-देश-प्रांत यांच्या पल्याड आहे.
साहित्यात शृंगार रसाला ‘रसराज’ म्हटलेलें आहे. कथा-कादंबरी-नाटक-काव्य, साहित्याचें कुठलेंही अंग बघा, त्यात प्रीती या विषयावरील लेखन समाविष्ट असतेंच. आजच्या आधुनिक युगातही, समाजाभिमुख-वास्तववादी-साहित्यावर कितीही जोर असला तरी, प्रीती हा विषय वर्ज्य समजला जातो आहे काय? पूर्वीच्या काळीं तर, माणसाच्या वागणुकीवर खूपच सामाजिक बंधनें असत. त्याकाळीं, साहित्यातील प्रेमाची-अभिव्यक्ती ही माणसाच्या मनाची एक महत्वाची गरज पूर्ण करत असे, आणि खरं म्हटलं तर, आजही करते. प्रस्तुतचें हें प्रास्ताविक, काव्यसंग्रहाबद्दल आहे, म्हणून आपण साहित्यातील प्रेमाबद्दलची, अगदी उडतउडत, वानगी म्हणून कांहीं उदाहरणें पाहूं या.
अनेक संस्कृत नाटकें व काव्यांमध्ये प्रेम हा एकतर मुख्य विषय आहे, किंवा त्याला स्पर्श तरी केला गेलेला आहे. अभिज्ञानशाकुंतलम् व मेघदूत या कविकुलगुरु कालिदासाच्या कृती जगातील श्रेष्ठ वाङ्मयामध्ये गणल्या जातात. मृच्छकटिक किंवा अन्य संस्कृत कृतींमध्येही प्रेम या विषयानें महत्वाची भूमिका बजावली आहे. मराठी नाटकाच्या अगदी सुरुवातीच्या काळींसुद्धा सौभद्र, शारदा या
व अशा नाटकांमधध्ये प्रेम हा विषय हाताळलेला आहेच. इंग्रजीतही ‘रोमियो-ज्यूलिएट’ हें शेक्सपियरचें एक श्रेष्ठ नाटक आहे. जयदेव याचे ‘गीतगोविंद’ राधा-कृष्ण प्रेमावरच रचलेले आहे. बिल्हणाच्या ‘चौरपंचाशिका’मधील एका चतुष्पदीचें भाषांतर बघा. (भाषातांरकार : Richard Gombrich). पहा, त्यात विरही पुरुषाला त्याच्या सुंदर प्रियेची आठवण येते; आणि तिचें तो कसे वर्णन करतो, ते.
Still I remember when I am alone
The jet-black eyes collyrium (काजळ) had kissed
Her braided hair, one mass of full-blown flowers
And golden bangles dangling from each wrist
Sweet betel-juice had tinged her teeth with red
A string of pearls smeared with vermilion lead.
(खरं तर, आपल्याच संस्कृत भाषेतील उतार्याचा अर्थ समजून घ्यायला आपल्याला दुसर्या एखाद्या भाषेचा आधार घ्यावा लागतो ! पण, तो एक वेगळाच विषय आहे. तूर्तास, आपण त्यात जाऊ या नको).
संस्कृतप्रमाणेंच, अशी प्राकृतमधील उदाहरणेंही कांहीं कमी नाहीत. हालाची ‘गाथासप्तशती’ (सतसई) हें जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीचे महाराष्ट्री प्राकृतमधील काव्य घ्या. साधारणजनांनी लिहिलेली काव्यें हालानें संग्रहित केली, असे म्हणतात. (म्हणजेच, हे तत्कालीन ‘लोककाव्य’ आहे). गाथासप्तशतीमध्ये साधारणजनांनी प्रेमावर लिहिलेल्या काव्याचें एक उदाहरण पाहू या. हेतुत: मूळ महाराष्ट्रीतील काव्य खाली दिलेले आहे, व नंतर त्यांचे मराठी रूपांतर :
महाराष्ट्री : रमिऊण पअं पि गओ उवऊहिउं पडिणिउत्तो
अहअं पउत्थ-वइअ व्व तक्खणं सो पवासि व्व ।।
मराठी रूपांतर : (राजा बढे यांचे) :
रमुनी संगे, निरोप घेती, प्रवासास ते निघती
उंबरठ्यावर पाउल अडलें, पुन्हां मागुती रिघती
पळाचाच तो प्रवास, पळभर विरह सोसते भारी
विरह संपला, प्रवास सरला, उंबरठ्याशेजारी ।।
(मागुती रिघती : मागे फिरतात)
इंग्रजीत गेली अनेक शतकें प्रेमकाव्याची परंपरा आहे. ही कांहीं उदाहरणें, मूळ इंग्रजीतीलच –
False though she be to me and love,
I’ll ne’er (नेव्हर) pursue revenge ;
For still the charmer I approve,
Though I deplore the change .
–
But when Night is on the hills,
And the great voices roll in from the sea,
By starlight and candlelight and dreamlight,
She comes to me .
–
Then seek not, sweet, the ‘If and ‘Why’,
I love you now until I die,
For I must love because I live,
And life in me is what you give .
फारसी व उर्दूमधील रिवायती (पारंपारिक) काव्यात प्रेमकाव्य भरपूर आहे. उदा. मध्ययुगीन फारसी कवी हफ़ीज पहा. [ हा मध्ययुगीन फारसी हफ़ीज वेगळा, आणि उर्दूतील शायर हफ़ीज जालंदरी किंवा हफ़ीज होशियारपुरी वेगळे ] . हफ़ीजच्या फारसी काव्याचा एक नमुना पहा (भाषांतर) :
‘A heart which is void of pains of love, is no heart
. . .
For, the world of love is a world of sweetness’.
उर्दूत प्रेमाची रेलचेल फारच आहे. आपण फक्त काही माणिकमोती उदाहरणादाखल पाहू या.
इश्क़ ने ग़ालिब निकम्मा कर दिया
वरना हम भी आदमी थे काम के ।
– मिर्झा गालिब
इश्क़पर ज़ोर नहीं, है ये आतिश ग़ालिब
जो लगाये न लगे, और बुझाये न बने ।
– मिर्झा गालिब
ये इश्क़ नहीं आसाँ इतना तो समझ लीजे
इक आग का दरिया है और डूब के मर जाना है ।
– जिगर मुरादाबादी
हफ़ीज अपनी बोली मुहब्बत की बोली
न उर्दू, न हिंदी, न हिंदोस्तानी ।
– हफ़ीज
हिंदी व तिच्या बोलीभाषांमध्येही प्रेमावर लेखन झालेले आहे, विशेषकरून ‘रीतिकाला’त. उदाहरण म्हणून बिहारीच्या सतसईमधील एक दोहा पहा :
इत आवति चली जाति उत, चली छ: सातक हाथ
बनी हिंडोरे-सी रहे, लगी उसासन साथ ।
विरहिणीचे अति उत्कृष्ट वर्णन !
अयोध्यासिंह उपाध्याय ‘हरिऔध’ यांचें ‘प्रियप्रवास’ हें काव्यच कृष्णाच्या गोकुळ-वृंदावनातून मथुरेला जाणें या विषयावर आहे. राष्ट्रकवी मैधिलीशरण गुप्त यांची ‘यशोधरा’ व ‘उर्मिला’ ही काव्ये विरहिणींवर आहेत, हें शीर्षकावरूनच लक्षात येते.
मराठीतील कवींनीही प्रेमानें, ‘प्रेम’ हा विषय हाताळलेला आहे. उत्तर-पेशवाईतील लावण्यांमधील बहारदार वर्णन बघा. ‘लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखर्याचं । बोलणं ग मंजुळ मैनेचं ।’ (ही पेशवाईतील मूळ लावणी ‘अमर भूपाळी’ सिनेमात घेतलेली आहे). ‘सुंदरा मनामधिं भरली । जराहि नाही ठरली । मोत्याचा भांग ….’ . आणखी एक पहा – ‘राधा सखि संवादीं छेकापन्हुती ही आयका । रसिक हो किती चतुर बायका । अंबरगतसम पयोधरातें हलवुन पळतो दुरी । काय हा धीट म्हणावा तरी । तो नंदाचा पोर काय गे सांग कन्हैया हरी । नव्हे गे, मारुत मेघोदरी ।’. शाहिराने किती चतुराईनें आणि रसिकपणें शृंगारिक वर्णन केलें आहे.
आधुनिक काळात, ‘प्रेम’ या विषयावर धीटपणें लिहिण्याचें श्रेय कवी माधव जूलियन यांनाच दिलें पाहिजे. त्याच्यावर फारसी व इंग्रजी काव्याचा परिणाम झालेला आहे. पाहू या त्यांचे कांही काव्यांश –
धनुष्यें-बाण घेवोनी खडे डोळे तुझे दोन्ही
म्हणूनी काय गे कोणी न यावें प्रीतीच्या गांवा ?
–
माझ्या-तुझ्यामधिं साचलें कित्येक वर्षाँचें धुकें
विसरुनि गेलो गान तें की जाहलो दोघें मुके ?
–
प्रेम कोणीही करीना, कां अशी फिर्याद खोटी ?
प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी कां स्वार्थ पोटीं ?
–
उमेदी धावत्या माझ्या तुझ्या प्रीतीविणा पंगू
न होशी तूंच मस्तानी, कसा गे होउं मी बाजी ?
ध्यानात घ्या, या काव्यांचा काळ आहे १९२० च्या दशकाचा पूर्वार्ध . हा काळ असा होता की, एखाद्याने अंगवस्त्र ठेवलें तरी चालत असे; श्रेष्ठांच्या विवाहबाह्य प्रकरणांबद्दल आक्षेप नसे ; पण प्रेमाच्याबद्दलच्या open लेखनाच्याबाबतील मात्र उच्चभ्रू मराठी समाज दकियानूसी, prude, जुनाट होता. संस्कृत, प्राकृत, फारसी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, वगैरे भाषांमध्ये भलेही माधव जूलियन यांच्या खूप आधीच्या काळची प्रेमकाव्यें आहेत, पण मराठीत लावणी-परंपरा सोडल्यास, तशी ती नाहींत. (आणि, बवन्नखणीमध्ये तत्कालीन ‘शालशिष्ट’, उच्चभ्रू मंडळी चवीनें लावणीचा आस्वाद घेत असली तरी, लावणी कधीच उच्च साहित्य मानली गेली नाहीं ). माधब जूलियन यांनी हा प्रेमाविष्काराचा प्रवाह आणल्यावर, भावकविता, भावगीतें वगैरेंमध्ये प्रेमाभिव्यक्ती सुरू झाली. याबद्दल खरे तर, आपण सर्वांनी माधव जूलियन यांचे आभार मानायला हवेत.
एकदा बांध फुटला की धबधबा वाहू लागतो. माधव जूलियन यांच्यानंतर तर मराठीत प्रेमकाव्याचें प्रचुर लिखाण झाले. कांहीं उदाहरणे –
सुरेश भट :
मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात लाभला निवांत संग .
–
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास कां रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास कां रे ?
–
कळले मला न केव्हां सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हां निसटून रात्र गेली .
–
मल्मली तारुण्या माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसांत माझ्या तू जिवाला गुंतवावे .
–
मंगेश पाडगांवकर :
तुला लाजलेली अशी पाहतो
सुखाच्या सुगंधात मी नाहतो .
–
एक इशारा नजरेचा हा तुझ्या पुरेसा
वार्याच्या ओठांवर गाणे जुळून येते .
–
तिने बेचैन होतांना कळ्यांनी श्वास टाकावे
तिनें होकार देतांना जिवाचे चांदणे व्हावे .
–
थंड जरि बाहेर, आतुन पेटलो इतुके पुरे
बोललो नाहीं तरीही भेटलो इतुके पुरे .
अशी विविध कवींची बरीच उदाहरणे पहाता येतील . पण इतके पुरे.
भावगीतांचा आपण मघाशी उल्लेख केला. गीतांमध्ये प्रेमाचा उल्लेख खूपदा येतो. लोककवी मनमोहन यांचं ‘कसा गऽ बाई झाला ? कोणी गऽ बाई केला ? राधे तुझा सैल अंबाडा’ ; गजाननराव वाटवे यांनी गाइलेलं ‘रानात सांग कानात आपुलें नातें । मी भल्या पहाटे येते ।’ ; सुरेश भटांचं ‘मी मज हरवुन बसले गऽ’ , पाडगांवकरांच्या गीतातील –
‘तू अशी डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा’ ;
या ओळी पहा. पाडगांवकरांच्याच, पु.ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या, ‘बिल्हण’ या नभोनाट्यातील गीताच्या कांहीं पंक्ती बघा –
आठवतें, पुनवेच्या रात्रीं
लक्ष दीप विरघळले गात्रीं
मिठीत तुझिया या विश्वाचें रहस्य मज उलगडलें .
माणिक वर्मा यांनी गाइलेल्या गीताच्या या ओळी पहा –
निळ्या नभातुन नील चांदणें निथळे मार्गावरी
स्वप्नरथातुन तुज भेटाया आले तव मंदिरीं .’
इंग्रजीत तर प्रेमगीतें आहेतच. कांहीं दशकांपूर्वीच्या pop-song मधील कांहीं ओळी पहा-
One and two, and I love you,
I love you,
Let’s play the game of love .
उदाहरणें द्यावी तेवढी थोडीच .
सिनेमातही प्रेमगीते यावीत, यात आश्चर्य नाहीं . मराठी सिनेमात अनेक प्रेमगीते आहेत. सिद्धहस्त कवी ग.दि. माडगूळकर यांचे ‘त्या तिथे, पलिकडे, तिकडे । माझिया प्रियेचें झोपडें ।’ , किंवा, ‘रूपास भाळलो मी । भुललो तुझ्या गुणांना । मज वेड लावलें तू । सांगू नको कुणाला ।’ अशी सुबक, मोहक गाणी घ्या ; किंवा दादा कोंडके यांच्या सिनेमातील ‘ये जवळ ये लाजू नको’ अशी धीट गाणी घ्या, अथवा सिनेमांमधील ‘बुगडी माझी सांडली गऽ’ यासारख्या अनेक लावण्या, म्हणजेच रंगेल गाणी घ्या, ती प्रेमाच्या विविध छटा घेऊन येतात.
हिंदी सिनेमात मोठेमोठे उर्दूचे शायर गीतलेखन करत होते. सिनेमांचा तत्कालीन विषय मुख्यत: होता, ‘प्रेम’ ; आणि उर्दूत रिवायती काव्याची प्रेमविषयक लेखनाची परंपराच असल्यामुळे, हिंदी सिनेमातील अनेक गीते म्हणजे उत्कृष्ट काव्यच आहे. पहा कांही उदाहरणे –
‘चाहे बना दो, चाहे मिटा दो,
मर भी गए तो देंगे दुआएँ
उड़ उड़ के कहेगी ख़ाक, सनम,
ये दर्दे मुहब्बत सहने दो ।’
–
‘लिक्खे जो ख़त तुझे, वो तेरी याद में हज़ारों रंग के तराने बन गए
सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए’
–
‘फूल तुम्हें भेजा है ख़त में, फूल नहीं मेरा दिल है’ .
–
‘बिखरा के ज़ुल्फें चमन में न जाना
क्यों ?
इसलिये, कि
शरमा न जाएँ फूलों के साये’ .
अशी अनेकानेक उदाहरणें सिनेगीतातील प्रेमकाव्याची . काय शब्द ! काय कल्पनांच्या भरार्या ! आपण यांच्या प्रेमातच पडावे, अशी ही गीतें. पण त्यातील अतिश्रेष्ठ उदाहरण आहे, ‘बरसात की रात’ सिनेमामधील. ‘ये इश्क इश्क है’ या कव्वालीत साहिर लुधियानवी प्रेमाबद्दलचे तत्वज्ञान सांगतात : ‘ईश्क़ आज़ाद है, हिंदु न मुसलमान है इश्क़ । आप ही धर्म है और आप ही ईमान है इश्क़ । ….. अल्ला ओ रसूल का फ़रमान इश्क़ है । … गौतम का और मसीह का अरमान इश्क़ है। … काइनात (सृष्टी) जिस्म है ओर जान इश्क़ है ।’ आणि एवढे म्हणून साहिर थांबत नाहीत, तर शेवटी ते म्हणतात की, ‘.. बंदे को ख़ुदा करता है इश्क़’ .
यानंतर, प्रेमाच्या महतीबद्दल अधिक काय सांगायचं ?
प्रेम-साहित्य हे महासागरासारखे आहे; आपण त्यातले ओंजळभर घेऊन त्याचा आस्वाद घेतला, आनंद घेतला, ‘शितावरून भाताची परीक्षा’ या उक्तीप्रमाणे प्रेमाची महती जाणून घेतली. या सर्वात माझा हिस्सा, केवळ, उदाहरणें पुढे ठेवणे, एवढाच आहे. मला आठवण होते तुकाराम महाराजांची.
ते म्हणतात – ‘फोडिले भांडार । धन्याचा हा माल । मी तो हमाल । भारवाही ।’ .तसा मी येथें फक्त एक ‘हमाल’ आहे. ’वेदांचा तो अर्थ आम्हांसीची ठावा’ असे ठणकावून सांगणारे तुकारामही स्वत:ला ‘दुसर्याचा माल वाहणारा हमाल’ म्हणतात ; मी तर फक्त एक रसिक, एक आस्वादक आहे ; आणि त्या भूमिकेतूनच मी हें प्रास्ताविक लिहिले आहे.
प्रेमाची महती अशी आहे की, प्रेमाचे नांव itself , व प्रेमावरील साहित्य सर्व वयातील जनांना आकृष्ट करते, भावते. तरुणांना तें आकृष्ट करते यात आश्चर्य नाहीं, पण वुद्धांनाही ते आवडतें. प्रेम वृद्धांनाही चिरतरुण करते. त्यासाठी प्रत्यक्ष प्रेम करायला पाहिजे, असे नव्हे, तर समरसून प्रेमकाव्य-साहित्य वाचले की पुरे. वृद्धत्वात शरीर क्षीण झालेले असते, जीवनातला रस कमी झालेला असतो, जनसंपर्क कमी झालेला असतो ; जग पुढे धावते आहे, हे दिसत असते, व ‘ I am being left behind, I am alone’ , अशी भावना मनाला विकल करत असते. असा परिस्थितीत, जर प्रेमकाव्याचा आनंद घेतला तर, ते नुसते ‘स्मरणरंजन’ न राहता, ‘स्मरणसंजीवनी’ बनते. ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ यातील ‘हिरवा’ या शब्दाचा मूळ गीतकाराला काय जो अर्थ अभिप्रेत असेल तो असो ; मी मात्र या ‘हिरवा’चा अर्थ असा घेतो :
“ बालकवी म्हणतात, ‘… हर्ष मानसीं, हिरवळ दाटे चोहिकडे ’.
हिरवा हा प्रत्ययकारी शब्द आहे ! आपल्याला ‘हिरवा’ रंग , हिरवळ , सुखद
वाटतात, आनंद देतात. ‘हिरवा’ म्हटल्यावर आपल्याला सुंदरता, कोमलता, सुख,
हर्षोल्हास, अशा सर्वांची अनुभूती होते ; आपण वृद्धत्व विसरून तरुण, उत्साही,
आनंदी होतो ” .
तरुणांना प्रेम-साहित्याचा आस्वाद घ्यायला सांगायला नकोच, ते तर तो घेणारच घेणार ; पण वृद्धांनीही आवर्जून तो घ्यावा, व मनानें तरुण व्हावे, आनंदी व्हावे, असें मला मनापासून वाटते.
‘प्रीतिरंग’ संग्रहातील, शामराव सुतार, आरती धारप, शरद अत्रे ( व ‘yours truly’, अस्मादिक ) यांचे काव्य आ-युवा-वृद्ध स्त्रीपुरुष, सर्वांना-आकृष्ट करेल, आनंद देईल, अशी मी आशा करतो.
या काव्यसंग्रहात माझ्याही काही कविता आहेत, या योगायोगाला काय म्हणावे ? या संग्रहाकरता मी माझें कांहीं काव्य दिले, तेव्हा मला सुतराम् कल्पना नव्हती की कांहीं काळानंतर या संग्रहासाठी श्री. म्हाडेश्वर हे मलाच प्रास्ताविक लिहायलाची विनंती करतील. ती मी का मानली याचे एक कारण मी आधी सांगितले आहेच, की त्यांचा प्रेमाग्रह आणि तसेंच, त्यांच्याबद्दल माझ्या मनात असलेला प्रेमादर. पण, आणखीही एक महत्वाचे कारण आहे. वर आपण म्हटले आहे, प्रेम हे वृद्धांना तरुण करते. अनेक दशकांच्या सहजीवनानंतर माझी प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे, तिच्या चिरविरहामुळे, माझ्या हृदयात एक उदासी, एक अवसाद दाटलेला होता, आहे. ‘प्रेम’ या विषयाचा विचार करून त्यावर लिहायचें, या activityचा परिणाम म्हणून, मी त्या खिन्नतेपासून कांहीं काळ दूर जाऊ शकलो. मनातील पोकळी, बोच कमी कशी होणार ? ; पण ती सहन करायची कांहींशी ताकद मला या ‘प़्रेमावरील लेखनाने’ दिली. त्यासाठी, श्री. म्हाडेश्वर यांना धन्यवाद.
अशीच रूहानी ताकद , रूमानी ‘प्रेम’ व ‘प्रेमकाव्य’ हें, सर्व वृद्धांना, व दु:ख-क्लेश-पीडा-वेदना सहन करत असलेल्या, उदास असलेल्या सर्वांना देईल; ते त्यांना आनंद देईल, बळ देईल, आधार देईल, याचा मला विश्वास वाटतो. ‘वृद्धत्वी निज शैशवास ज़पणे बाणा कवीचा असे’, याप्रमाणें जें काय तें, या संग्रहातील कवी, व इतर कवीही, करत असतीलच ; पण या पंक्तीला paraphrase करून, मी म्हणू इच्छितो की, ‘वृद्धत्वी निज तारुण्यास ज़पणें बाणा रसिकाचा असो’. मध्यमवयींनाही, प्रेमकाव्य प्रमुदित करेल, कामाचा ताण, संसाराचा शीण, पुढली चिंता, असुरक्षितता, इत्यादि गोष्टी कांही काळ का होईना, विसरायला लावेल, अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. आणि, युवक-युवतींचे काय सांगायचें ! ते तर प्रेमकाव्यामुळे उल्हसित होतीलच, हर्षोत्फुल्ल होतीलच, आनंदाची कारंजी त्यांच्या हृदयात थुईथुई नाचू लागतीलच, याची मला खात्री आहे.
अखेरीस एवढेच : ‘प्रीतिगंध’चा सुगंध सर्वत्र दरवळो ; व त्यामुळे, (बालकवींचे शब्द वापरून सांगायचें तर), ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे’, अशी उत्सवी अवस्था सर्व युवाथोरांची होवो.
तसें होण्यासाठी सर्वासर्वांना शुभेच्छा .
।। इति प्रेमानंदोत्सवस्य लेखनसीमा ।।
– सुभाष स. नाईक
Leave a Reply