करसन घावरी यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.
आज पन्नाशीच्या पुढे अथवा आसपास वय असलेल्या साऱ्या क्रिकेटप्रेमींच्या तरुणपणीच्या काळातील पोस्टरबॉय म्हणजे करसन घावरी. करसन घावरी आपल्या परिचितांना ते कदुभाई म्हणूनही ओळखले जात असत. अतिशय आकर्षक असं व्यक्तिमत्त्व, नैसर्गिक वेगळेपण लाभलेली डावरी फलंदाजी आणि त्याहीपेक्षा प्रभावी अशी डावखुरी वेगवान गोलंदाजी यासाठी तत्कालीन क्रिकेटजगतात करसन घावरी ओळखले जात. शिवाय दोन वेळा कसोटीत आपल्या डावऱ्या फिरकीची कमालही करसन घावरी यांनी दाखवली होती. करसन घावरी यांचे सारं बालपण गेलं ते राजकोटमध्ये. तिथं त्यांची भारतीय शालेय क्रिकेटसंघात निवड झाली ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी. त्यांचे संघातील इतर सहकारी होते मोहिंदर अमरनाथ, ब्रिजेश पटेल आदी. मुंबईविरुद्ध सौराष्ट्र रणजी सामन्यात घावरींनी दिलीप सरदेसाई, अजित वाडेकर यांच्यासह मुंबईच्या चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर मुंबई संघाचे तत्कालीन व्यवस्थापक पॉली उमरीगर यांनी सौराष्ट्राचे कर्णधार व विकेटकीपर इंद्रजितसिंह यांच्याकडे घावरींना मुंबईत आणण्याविषयी विचारणा केली. इंद्रजितसिंह भारतीय संघातर्फे १९६७च्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यासाठी सेकंड विकेटकीपर म्हणून निवडले गेले होते. इंद्रजितसिंह त्यावेळी मुंबईत एसीसीकडून खेळायचे. या दोघांमुळे घावरींचं मुंबईत येण्याचं निश्चित झालं. ऑफर होती मुंबईत एसीसी कंपनीत रुजू होण्याची! पगार दरमहा ८०० रुपये! त्याकाळी टाइम्स शिल्ड स्पर्धेतील एक बलाढ्य क्रिकेट संघ अशी एसीसीची ओळख होती. ऑफर स्वीकारून करसन घावरी मुंबईत आले आणि त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीनं निर्णायक वळण घेतलं. मात्र घावरींना पाठवण्यास त्यांचे कुटुंबीय तयार नव्हते. विशेषत: आजोबांनी नकार दिला होता. त्यावेळी राजकोट न सोडल्यामुळे उच्च दर्जाचे क्रिकेट खेळू न शकलेले करसन घावरी यांचे काका जीवाभाई मदतीला आले. त्यांच्या ठाम पाठिंब्यामुळे करसन घावरी यांचं मुंबईत येणं झालं ते कायमचंच!
आपल्या १५९ फर्स्ट क्लास मॅच मध्ये करसन गावरी यांनी ४५२ विकेट घेतल्या व ४५०० रन केल्या. १९७८ मध्ये कपिल देव यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध फैसलाबाद मध्ये डेब्यू केला तेव्हा त्यांचे बॉलिंग पार्टनर करसन घावरी होते. करसन घावरी हे फास्ट बॉलर असून ते लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग ही करत असत. करसन घावरी आपल्या करीयर मध्ये ३९ कसोटी व १९ वनडे खेळले. १९७४ ते १९८१ पर्यत आपल्या क्रिकेट करियर मध्ये दोन वेळा १९७५ व १९७९ वर्ल्ड कप पण खेळले. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्यांनी चार वेळा ५ हून अधिक विकेट घेतल्या. १९७८ साली वेस्टइंडीज ची टीम भारत दौऱ्यावर आली असताना ६ टेस्ट मध्ये घावरी यांनी २७ विकेट घेतल्या होत्या. २००४-०५ मध्ये घावरी बंगाल रणजी टीम चे कोच होते.
आपल्या डावखुऱ्या गोलंदाजीनं कसोटी क्रिकेट गाजवणारे करसन घावरी सध्या बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फ्रीलान्स कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. करसन घावरी यांच्या म्हणण्यानुसार ही अकादमी जागतिक पातळीवरील सर्वोत्तम क्रिकेट आस्थापनांपैकी एक आहे.
करसन घावरी क्रिकेटमधून निवृत्त होऊन तीन दशकं उलटली, तरी अजूनही क्रिकेटला वेगवेगळ्या स्वरूपात काही देत आहे, हा बाब त्यांना खूप समाधान देऊन जाते. या आधी निवड समितीचे अध्यक्ष तसंच प्रशिक्षक म्हणूनही ते मुंबई क्रिकेटशी जोडले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply