महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर आर पाटील यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ अंजनी, तासगाव तालुका, सांगली जिल्हा येथे झाला.
आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व. रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील. लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणत. तीच होती त्यांची खरी ओळख. उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता, अशी आर. आर. पाटील उर्फ आबा यांची जनमानसात ओळख होती. आर आर पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र जपत श्रमदान करत शिक्षण घेतलं. शाळकरी वयातच प्राचार्य पी बी पाटील यांचं मार्गदर्शन आबांना मिळालं. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालयातून ते बीए झाले. पुढे एलएलबीही झाले.
गरिब शेतकरी कुटुंबातल्या या होतकरु तरुणाचे नेतृत्वगुण सुरवातीला हेरले ते वसंतदादा पाटलांनी. कोणतीही राजकीय पाश्वभुमी नसतांनाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबा पाटलांनी राजकारणात वाटचाल सुरु केली. वसंतदादांबरोबरच यशवंतराव चव्हाण यांचीही प्रेरणा आर आर पाटील यांना होती. आर आर पाटील हे पहिल्यांदा १९७९ साली सावळज मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. १९७९ ते १९९० पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते. मग १९९० ते २०१४ या काळात ते सतत विधानसभेवर निवडून आले.
तासगाव मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा १९९० साली पहिल्यांदा विधान सभेवर निवडून आले. आर आर पाटील हे १९९५ साली कॉंग्रेसच्या तिकिटावर दुस-यांदा आमदार झाले. तेव्हा भाजप-सेनेचं युती सरकार सत्तेत होतं. राजकीय आयुधांचा वापर करत आबांनी त्यावेळी विधानसभा दणादून सोडली आणि सत्ताधारी भाजप-सेनेला कोंडीत पकडलं. अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी सार्थ ओळख आबांनी निर्माण केली होती. नंतर शरद पवारांसोबत आबांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो १९९९च्या सुमारास. याच काळात शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी आर आर पाटील यांची ओळख निर्माण झाली. आबांनी २००४, २००९ आणि २०१४ ची आमदारकीची निवडणुक अटीतटीनं लढत जिंकली. सुरवातीला तासगाव आणि नंतर कवठेमहांकाळ मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आमदारकीबरोबरच त्यांची मंत्रीपदाची कारकिर्दही गाजली.
आर आर पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरवातीला ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आर आर पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली. पुढे राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी जबाबदारीनं सांभाळलं. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी वाद झाले आणि आबांना गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं. पण आबांची स्वच्छ प्रतिमा कायम राहिली.
गृहमंत्री असतांना डान्सबार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन आबांनी अनेक संसार सावरले. डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला विरोधही झाला पण आबा ठाम राहिले. गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी राबवलेलं महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही अभिनवं होतं. गाडगेबाबा, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून प्रेरणा घेत गरीब शेतकरी कुटुंबातले आर आर पाटील सत्तेच्या राजकारणात राहुनही साधेच राहिले. साधेपणा हेच त्याचं वैशिष्ट्य होतं. याच साधेपणातून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत. सत्ता येते आणि जाते पण सोबत राहतात ती जोडलेली माणसं हे आर आर पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष वाढवला.
आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण कुटुंबानं आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागिरथी यांनी वागण्या बोलण्यात सत्तेचा दर्प येऊ दिला नाही. आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात. तर दुसरे भाऊ राजाराम पोलीस दलात आहेत. आबा गृहमंत्री असतांना आबांचे भाऊ राजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते.
जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले.
आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply