भारताचे माजी तेज गोलंदाज रमाकांत देसाई उर्फ ‘टायनी’ देसाई यांचा जन्म २० जून १९३९ रोजी झाला.
रमाकांत देसाई आपल्या कमी उंचीमुळे क्रिकेट विश्वात ‘टायनी’ देसाई म्हणून ओळखले जात असत.१९६०च्या दशकात भारतात वेगवान गोलंदाज शोधूनही सापडत नव्हते, अशा काळात रमाकांत देसाई यांच्या भन्नाट वेगाने अनेक नामवंत फलंदाजांची झोप उडवली. वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीत पदार्पणात त्यांनी ४ विकेट्स घेतल्या आणि मग ते भारताचे प्रमुख गोलंदाज बनले. १९५९ ते १९६८ या दरम्यान २८ कसोटी सामन्यांत ७४ बळी घेणारे देसाई यांची उंची केवळ ५ फूट ४ इंच होती, पण त्यांचा वेग भन्नाट होता.
रमाकांत देसाई हलकाच रनअप घेऊन क्रीझपाशी आल्यावर आपली करामत दाखवत असत. हनीफ मोहम्मद यांच्यासारख्या नावाजलेल्या फलंदाजाला एकाच मालिकेत देसाईंनी चार वेळा तंबूत धाडले होते. १९६०-६१च्या त्या मालिकेत पाकिस्तानच्या गोटात देसाईंनी खळबळ उडविली होती. एवढेच नव्हे तर हनीफ यांना ‘देसाईंचा बकरा’ म्हणून हिणवले जाऊ लागले. पण गुणवत्ता असूनही देसाई जागतिक क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीचे आदर्श म्हणून ओळखले गेले नाहीत. कदाचित, दुसऱ्या टोकाकडून त्यांना कुणाची तेवढीच तोलामोलाची साथ लाभली नाही म्हणून असे झाले असावे.
त्यांच्या एकट्यावर मोठी जबाबदारी असे. एका कसोटीत तर त्यांनी एकाच डावात तब्बल ४९ षटके गोलंदाजी केली होती. एवढ्या षटकात एकाच लयीत गोलंदाजी करणे केवळ अशक्य होते. लगेचच इंग्लंड दौ-यात लॉर्ड्स कसोटीत त्यांनी ८९ धावांत ५ विकेट्स घेतल्या. पण त्यांची झुंज अनेकदा एकाकी ठरायची. २८ कसोटींमध्ये ७८ बळी ही कामगिरी ते इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाकडून खेळते, तर खूपच सुधारलेली दिसली असती.
रमाकांत देसाई यांचे २७ एप्रिल १९९८ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply