राजनारायण यांचे नाव जरी आज अनेकांना माहिती नसले तरी एकेकाळी देशाची लोकशाही वाचवण्यात त्यांनी फार फार मोलाची भूमिका बजावली होती!
जायंट किलर असे बिरुद मिरवणारे राजनारायण हे जनता पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांपैकी एक होते. राजनारायण वाराणसी जवळच्या एका श्रीमंत जमीनदार घराण्यात जन्माला आले. त्यांचा परिवार तिथल्या स्थानिक राजघराण्याशी संबंधित होता. प्रचंड धनसंपदा आणि ताकद ही राजनारायण यांच्या परिवाराची ओळख होती. परंतु राजनारायण यांना हे ऐश्वर्याचं काहीच कौतुक नव्हतं. त्यांचा समाजवादी विचारसरणीकडे कल होता. त्यांनी आपल्या वाट्याची बहुतांश मालमत्ता गरिबांना वाटली होती. त्यांच्या परिवाराकडून यासाठी प्रखर विरोध झाला. पण त्यांनी कोणाचेच ऐकलं नाही. इतकंच नाही त्यांनी आपल्या अपत्यांसाठी साधी मालमत्ता देखील सोडली नव्हती.
राजनारायण एक मुरब्बी नेते होते, त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षापर्यंत, ८० वेळा जेलची हवा खाल्ली होती. आयुष्यातील सतरा वर्षांचा काळ त्यांनी जेलमध्येच घालवला होता. राजनारायण हे समाजवादी नेते होते, इतर समाजवादी नेत्यांप्रमाणे १९६९ साली त्यांचा देखील इंदिरा गांधींच्या राजवटीमुळे भ्रमनिरास झाला होता. १९७१ साली इंदिरा गांधींच्या विरोधात संयुक्त समाजवादी पक्षाला प्रबळ उमेदवार उभा करायचा होता.
परंतु इंदिरा गांधींच्या विरोधात उभं रहायला ना चंद्रभानू गुप्ता तयार होते, ना चंद्रशेखर यांची हे धाडस करायची हिंमत होती. अशावेळी राजनारायण यांनी धनुष्य पेलत संयुक्त समाजवादी पक्षाच्या वतीने इंदिरा गांधींच्या विरोधात निवडणूक अर्ज भरला.
आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकीत राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा त्यांचा बालेकिल्ला असलेल्या “रायबरेली” मतदारसंघात मोठा पराभव केला. जनता पक्षाकडून निवडणुक लढवणाऱ्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा रुपात भारतातील सर्वात शक्तिशाली महिलेचा पराभव केला होता.
दिल्लीत वास्तव्यास असताना राजनारायण यांच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असायचे, कोणालाही त्यांच्या घरी जाऊन भरपेट जेवण करण्याची मुभा असायची. एखादं काम घेऊन त्यांच्या सरकारी बंगल्यावर कोणी आलंच तर त्याची व्यवस्था राजनारायण आपल्या घरीच करायचे. राजनारायण हे प्रखर समाजवादी होते, राममनोहर लोहिया यांच्या समवेत समाजवादी पक्षाच्या स्थापनेत त्यांनी फार महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते सदैव लोकांना मदत करायचे आणि सेवेस तत्पर असायचे. कालांतराने त्यांनी राजकारणातुन काढता पाय घेतला होता.
राजनारायण यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात दुहेरी लढा लढवला होता. एक जमिनीवर आणि दुसरा संसदेत, एक निवडणुकीच्या रिंगणात दुसरा न्यायालयात!
राजनारायण यांचे आयुष्य गरीबांच्या सेवेसाठी समर्पित होते, त्यांनी स्वतःसाठी काहीच ठेवले नाही. ते आयुष्यभर समाजकारण करत राहिले. त्यांना ना संपत्तीचा मोह होता राजसत्तेचा मोह होता, ज्यावेळी त्यांचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या बँक खात्यात फक्त ‘१४५० रुपये’ इतकी रक्कम होती.
राजनारायण यांचे ३१ डिसेंबर १९८६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply