टाऊन हॉल ते फाऊंटनचा परिसर हा इथला एक टप्पा. हा “टाऊन हॉल” म्हणजेच सध्या आपण बघतो ती “एशियाटिक लायब्ररी”ची सुंदर इमारत. ही इमारत “दोरिक” या जुन्या ग्रीक शैलीत बांधली असून तीला ३० पायर्या आहेत. आतमध्ये सभागारात मुंबईचे गव्हर्नर माऊंट स्टयुअर्ट एलफिन्स्टन यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. गोलाकार जिन्याच्या पायथ्याशी मुंबईचे दानशूर शिक्षणप्रेमी जगन्नाथ शंकरशेट, पहिले बॅरोनेट सर जमशेटजी जिजीभाई आणि सुप्रसिध्द संस्कृत पंडित भारतरत्न पां.वा. काणे यांचे पुतळे आहेत. हा टाऊन हॉल १८३३ मध्ये बांधून तयार झाला.
टाऊन हॉलच्या पहिल्या पायरीजवळ एक चौकोनी शिला आहे आणि त्यावर शून्य कोरलेले आहे. ही खूण म्हणजे मुंबई शहराची “शून्य पातळी” (zero level) आहे. याला डेटम किंवा बेंचमार्क म्हणतात.
टाऊन हॉलच्या जवळच “हॉर्निमन सर्कल” आहे, ज्याला पूर्वी एलफिन्स्टन सर्कल म्हणत, त्याची व्याप्ती जवळजवळ १२००० चौ. यार्ड असून ते १८७२ मध्ये बांधून तयार झाले असा उल्लेख आहे. याच परिसरात फ्लोरा फाऊंटन, मुंबई समाचार इमारत, सेंट थॉमस कॅथीड्रल, दादाभाई नवरोजी पुतळा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जुने गव्हर्नमेंट हाऊस, स्टेट बँक या वास्तू दिमाखात उभ्या आहेत. मत्स्यप्रेमींचे आवडते “महेश लंच होम” याच परिसरात आहे.
फोर्टमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे गेटवे परिसर. याच परिसरात अणुऊर्जा आयोग कार्यालय, याट क्लब, ताजमहाल हॉटेल, खुसरो बाग, वेसलीयन चर्च व रिगल सिनेमा वगैरे वास्तू आहेत.
“गेटवे ऑफ इंडिया” हे दक्षिण मुंबईतलं भव्य शिल्प. इंग्रज सम्राट पंचम जॉर्ज याच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ उभारलेले हे शिल्प जार्ज विटेट यांनी डिझाईन केले. याच्या कळसाचा घुमट ४८ फूट व्यासाचा आहे आणि टोकाला ते ८२ फूट उंच आहे. बरीच वर्षे “गेटवे”च्या वरच्या भागाची माहिती सामान्यांना नव्हती. कदाचित “ताजमहाल हॉटेल”मध्ये वास्तव्यासाठी किंवा कोणाला भेटायला गेलेल्यांनी ते बघितले असेल. मात्र १ डिसेंबर १९९६ रोजीच्या “महाराष्ट्र टाईम्स”च्या अंकाच्या पहिल्या पानावर विख्यात छायाचित्रकार गोपाळ बोधे यांनी एरियल फोटोग्राफीद्वारे काढलेले गेटवेचे छायाचित्र प्रकाशित झाले तेव्हा सामान्यांना गेटवेचे हे घुमट दिसले. मला हे तारिखवार आठवतंय कारण त्याच दिवशीच्या त्याच अंकात त्याच पहिल्या पानावर “मराठीसृष्टी”ची मुहूर्तमेढ ठरलेल्या माझ्या “मराठी इंटरनेट”ची बातमीही ठळकपणे छापली गेली होती.
समोरच “ताजमहाल हॉटेल” असून त्याचे बांधकाम १९०३ मध्ये पूर्ण झाले. जमशेटजी टाटा यांनी रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य यांच्या सहकार्याने डिझाईन केले. जुन्या ताजच्या डिझाईनवर रावसाहेब वैद्य व श्री डी मिर्झा यांच्या सह्या आहेत. जवळच अपोलो बंदर, कुलाबा कॉजवे, इलेक्ट्रिक हाऊस व वेसलियन चर्च या इमारती आहेत..
गेटवेपासून पूर्वेकडे चालत येताना दिसतं ते रिगल थिएटर आणि समोरच मॅजेस्टिक आमदार निवास. खवय्यांचे चोचले पुरवणारा “बडे मियॉ” याच रिगल सिनेमाच्या मागच्या बाजूला, तर “दिल्ली दरबार” रिगलच्या समोरच्या बाजूला आहे.
जवळच आहेत वेलिंग्टन कारंजे (सध्याचा शामाप्रसाद मुखर्जी चौक), महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, जुने विधानभवन वगैरे वास्तू.
प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचा पायाभरणी समारंभ १९०५ साली प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते झाला आणि १९२३ साली लेडी लॉईड या गव्हर्नरांच्या पत्नीच्या हस्ते तिचे उदघाटन झाले. या वास्तूची बांधणी इंडो सारसेनिक शैलीची आहे.
म्युझियमकडून पुढे आल्यावर दिसते जहांगिर आर्ट गॅलेरी. इथेच होतं प्रख्यात “समोवर कॅफे”. समोरच दिसतं मुंबई युनिव्हर्सिटी संकुल, जिथे सुप्रसिद्ध “राजाबाई टॉवर” आहे. जवळच आहे मुंबई हायकोर्टाची इमारत.
हायकोर्टाच्या इमारतीचं डिझाईन जे. ए. फुल्लर यांनी केलेलं असून ते र्हाईन नदीच्या काठावर पाहिलेल्या एका राजेशाही गढीवरून (castle वरून) आखलेले आहे. या इमारतीला त्याकाळ १६.५ लाख रुपये खर्च झाला आणि तिचं बांधकाम सात वर्षे सुरु होतं. १८७८ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply